कोप, एडवर्ड ड्रिंकर : (२८ जुलै १८४०–१२ एप्रिल १८९७). अमेरिकन प्राणिशास्त्रज्ञ आणि प्रकृतिवैज्ञानिक. यांचा जन्म फिलाडेल्फिया येथे झाला. त्यांचे शिक्षणही तेथेच झाले. १८५९ साली वॉशिंग्टन येथील स्मिथ्सोनियन इन्स्टिट्यूटमध्ये प्रसिद्धप्राणिशास्त्रज्ञबेअर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील सरीसृप (सरपटणाऱ्या प्राण्यांच्या) संग्रहाचा त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील प्रकृतिवैज्ञानिक जोसेफ लीडी यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला. १८६४–६७ मध्ये ते हॅवरफोर्ड कॉलेजमध्ये तुलनात्मक प्राणिशास्त्राचे प्राध्यापक होते व १८६५–७३ मध्ये फिलाडेल्फिया ॲकॅडेमी ऑफ सायन्सच्या संग्रहालयाचे अध्यक्ष होते. १८७१–७७ या कालखंडात त्यांनी कॅनझसमधील क्रिटेशस(सु. १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) स्तरांचे आणि कोलोरॅडो व वायोमिंगमधील तृतीय (सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या) स्तरांचे समन्वेषण (संशोधन) केले. तसेच १८७४–७७ या काळात त्यांनी माँटॅना, न्यू मेक्सिको आणि टेक्सस या राज्यांत युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हेचे भूवैज्ञानिक आणि जीवाश्मविज्ञ (पुरातन जीवसृष्टीच्या अवशेषांच्या अभ्यासातील तज्ञ) म्हणून काम केले. १८८९ मध्ये ते पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात भूविज्ञान आणि खनिजविज्ञानाचे प्राध्यापक झाले आणि १८९१ मध्ये लीडी यांच्या मृत्यूनंतर प्राणिशास्त्राच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली.
लुप्त पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या इतिहासाविषयीचे त्यांचे कार्य अतिशय महत्त्वाचे समजले जाते. सरीसृपविज्ञान (सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अभ्यासाचे शास्त्र) आणि मत्स्यविज्ञान या दोन विषयांवरील आपल्या संशोधनाने त्यांनी उत्तर अमेरिकेतील मासे, उभयाचर (जलचर व स्थलचर प्राणी) आणि सरीसृप यांच्या आधुनिक वर्गीकरणाचा पाया घातला. नव-लामार्कवादाचे [→ क्रमविकास] ते पुरस्कर्ते होते व या विषयावरील त्यांची मतेद ऑरिजिन ऑफ द फिटेस्ट (१८८६) आणिप्रायमरी फॅक्टर्स इन ऑर्गॅनिक इव्होल्यूशन (१८९६) या दोन ग्रंथांत त्यांनी पुढे मांडली आहेत. लंडनच्या जिऑलॉजिकल सोसायटीचे बिग्सबी पदक, हेडेन स्मारक पदक, हायड्लबर्ग विद्यापीठाची डॉक्टरेट इ. बहुमान त्यांना मिळाले. ते १८७८ सालापासून मृत्यूपर्यंत अमेरिकन नॅचरॅलिस्ट या नियतकालिकाचे मालक आणि संपादक होते. अमेरिकेतील लुप्त पृष्ठवंशी प्राण्यांच्या जीवाश्मांविषयी बरीच महत्त्वाची पुस्तके त्यांनी लिहून प्रसिध्द केली. ते फिलाडेल्फिया येथे मरण पावले.
जमदाडे, ज. वि.