श्रीधरस्वामी-१ : ( सु. १६५८१७२९). लोकप्रिय मराठी कवी. श्रीधरस्वामी, श्रीधर ब्रह्मानंद ह्या नावांनीही ते ओळखले जातात. जन्म पंढरपुराजवळील नाझरे ह्या गावी. त्यांच्या वडिलांचे नाव ब्रह्मानंद आईचे सावित्री आणि उपनाव देशपांडे. त्यांचे घराणे मूळचे मराठवाडयातील खडकी ( जुने औरंगाबाद ) ह्या गावचे. त्यामुळे खडके ह्या नावानेही ते ओळखले जातात. ह्या घराण्यातील राघोपंतनामक पुरूषाने विजापूरच्या दरबारात घोडदळावरचे अधिकारपद मिळविले. त्यामुळे खडके ह्या नावाऐवजी घोडके ह्या नावाने हे घराणे ओळखले जाऊ लागले. पुढे ह्याच राघोपंतांना नाझरे महालाचे देशकुलकर्णीपण मिळाल्यामुळे ते नाझऱ्यास राहू लागले आणि ह्या घराण्यास नाझरेकर हे नाव मिळाले. श्रीधरांच्या घराण्यात गंथरचनेची आणि विदयाव्यासंगाची परंपरा होती. आनंद संप्रदायी कवी आणि ⇨दासपंचायतना तील एक साधू रंगनाथस्वामी निगडीकर हे श्रीधरांचे चुलतचुलते. श्रीधरांचे वडील ब्रह्मानंद ह्यांनी आत्मप्रकाश हा अव्दैत वेदान्तावरील सुबोध गंथ लिहिला. गुरूपरंपरेने श्रीधर हे भक्तिमार्गी आनंद संप्रदायातले. त्यांचे वडील हेच त्यांचे गुरू होते. त्यांची गुरूपरंपरा अशी : रामानंद &gt अमलानंद &gt सहजानंद &gt पूर्णानंद &gt दत्तानंद &gt ब्रह्मानंद &gt श्रीधर.१६७८ च्या सुमारास ब्रह्मानंद पंढरपुरास आले आणि नंतर त्यांनी संन्यासदीक्षा घेतली. ब्रह्मानंदांसह पंढरपुरास आलेले श्रीधर आयुष्यभर तेथेच राहिले.

श्रीधरांच्या प्रमुख गंथरचनेत हरिविजय(१७०२), रामविजय (१७०३), पांडवप्रताप (१७१२) आणि शिवलीलामृत (१७१८) ह्या गंथांचा समावेश होतो. ह्यांपैकी शिवलीलामृत हा गंथ बारामतीच्या शिवमंदिरात लिहिला असून अन्य गंथ पंढरपुरास रचिलेले आहेत. हरिविजयासाठी  ( ओवीसंख्या ५,१३९) भागवता च्या दशमस्कंधाचा व हरिवंशातील कृष्णचरित्राचा आधार मुख्यत: घेतलेला आहे. अनेक राक्षसांचा नाश करून कृष्णाने साधूंचे केलेले रक्षण हा त्याचाविषयआहे.श्रीरामानेरावणावर कसा विजय मिळविला, हे रामविजया त (ओवीसंख्या ९,१४७) सांगितले आहे. त्यासाठी वाल्मीकिरामायणा बरोबरच हनुमन्नाटक, अग्निपुराण, अध्यात्म-रामायण अशा गंथांचे आधारही त्यांनी घेतले आहेत. पांडवप्रतापात ( ओवीसंख्या १३,३९७) पांडवांचा पराकम आणि त्यांनी कौरवांवर मिळविलेला विजय निवेदिला आहे. मात्र पांडवांची कृष्णभक्ती आणि कृष्णाने वेळोवेळी केलेले त्यांचे संरक्षण दाखवून कृष्णाचे ईश्वरी माहात्म्य वाचकांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला आहे. शिवलीलामृतात ( ओवीसंख्या २,४५०) शिवभक्तीचा महिमा सांगणारी महानंदा, राजा श्रियाळ, शिवनिंदक व्याध इत्यादींची आख्याने आहेत. मांडणी मात्र व्रतकथेसारखी असून गंथश्रवण-पठणाची फलश्रूतीही त्यात दिलेली आहे.

कीर्तनकार वा पुराणिक ह्यांच्यासारखी भूमिका घेऊन श्रीधरांनी सर्वसामान्यांसाठी हे गंथ सुबोध भाषेत रचिले आहेत. रंजनाबरोबरच उपदेशाचीही दृष्टी त्यांनी ठेवली आहे. संत एकनाथांचा प्रभाव त्यांच्या वर्णनपद्धतीवर आणि शब्दयोजनेवर अनेकदा आढळतो. सर्वसामान्यांच्या अनुभवांतलेच दृष्टान्त ते समर्पकपणे देतात. त्यांची कथनशैली ओघवती आणि श्रवणसुभग अशा शब्दकळेने नटलेली आहे. आवश्यक तेथे संक्षेप-संयमाचे धोरण ते कटाक्षाने पाळतात. रचनेतला सफाईदारपणा हे त्यांचे आणखी एक लक्षणीय वैशिष्टय. मात्र संस्कृत गंथांच्या प्रभावातून काही वेळा त्यांच्या शब्दयोजनेत क्लिष्टपणा आलेला दिसतो. श्रीधरांचे हे गंथ अतिशय लोकप्रिय झाले घराघरांतून वाचले गेले. भाविक मराठी कुटुंबांतून त्यांच्या गंथांची-विशेषतः शिवलीलामृत, हरिविजय  यांची-पारायणे दीर्घकाळ होत आलेली आहेत.

पंढरीमाहात्म्य, ज्ञानेश्वरचरित्र, मल्हारीविजय, अंबिका-उदय असे इतरही छोटे गंथ त्यांनी लिहिले आहेत. वेदान्तसूर्य हा त्यांचा गंथ आध्यात्मिक स्वरूपाचा आहे पण अशा प्रकारच्या लेखनात रमण्याची त्यांची वृत्ती नव्हती. जैमिनि-अश्वमेध हा गंथही त्यांच्या नावावर घातला जातो पण तो त्यांनीच लिहिला असावा याबद्दल मतभेद आहेत. त्यांची स्फुट काव्यरचना शंभराच्या आसपास भरेल. श्रीधरस्वामी गृहस्थाश्रमी होते. त्यांच्या पत्नीचे नाव पार्वतीबाई. त्यांना दत्तात्रेय, मनोहर आणि रंगनाथ असे तीन पुत्र होते आणि मित्रपरिवार मोठा होता. त्यांचे वृद्धापकाळाने पंढरपुरातच देहावसान झाले. तिथे चंद्रभागेच्या तीरावर पित्याच्या समाधीशेजारीच त्यांची समाधी आहे.

पहा : मराठी साहित्य.

संदर्भ : १. जोग, रा. श्री. संपा. मराठी वाङ्मयाचा इतिहास, खंड तिसरा, पुणे, १९७३.

            २. जोशी, चिं. नी. श्रीधर-चरित्र आणि काव्यविवेचन, १९५१.

            ३. वाटवे, के. ना. श्रीधर : पंडित-कवी, १९५२.

कुलकर्णी, अ. र.