कोडईकानल : तमिळनाडू राज्याच्या मदुराई जिल्ह्यातील हवा खाण्याचे प्रसिद्ध ठिकाण. लोकसंख्या १६,४७६ (१९७१). मदुराईच्या उत्तरेस ४० किमी. वर दक्षिण रेल्वेचे कोडईकानल रोड (अमय्यनाय-क्कनुर) स्थानक आहे.

निसर्गरम्य कोडईकानल सरोवर

या स्थानकापासून कोडईकानलला ८० किमी. मोटारने जावे लागते. कोडईकानल पलनी टेकडीवर समुद्रसपाटीपासून २,१३५ मी. उंचीवर वसले असून मोटाररस्ता वळणावळणांचा, निसर्गरम्य वनश्रींनी नटलेला आणि निलगिरी व गुलाबाच्या सुवासाने दरवळलेला असतो. कोडईकानलवर एक सुंदर सरोवर बांधलेले असून, त्याभोवतीचा पाच किमी. चा वृक्षाच्छादित रस्ता म्हणजे प्रवाशांचे खास आकर्षण होय. याशिवाय येथे शोला, ग्लेन, सिल्व्हर, फेअरी इ. अनेक सुंदर धबधबे असून प्रॉस्पेक्ट, डॉल्फिन्स नोज, पिलर रॉक, पेरूमल शिखर, वबाडी शिखर इ. पॉइंट्‌स आहेत. १८९९ मध्ये येथे स्थापन झालेली वेधशाळा प्रसिध्द असून, तेथे हवामान आणि ग्रह, तारे यांवरील महत्त्वाचे कार्य चालते. कोडईकानलहून कर्नाटक व केरळातही मार्ग जातात.

शाह, र. रू.