कोटा – १ : मुख्यत: कर्नाटकातील एक अनुसूचित जमात. तमिळनाडू आणि केरळमध्ये यांची थोडी वस्ती आढळते. यांचा धंदा निलगिरीत राहणाऱ्या तोडा जमातीप्रमाणे म्हशी पाळण्याचाच होता. तोडा व कोटा यांच्यात बरेच साम्य आहे. कोटा लोकांनी मृत म्हशीचे मांस खाल्ले, म्हणून तोडांनी त्यांना हाकलून दिले असे म्हणतात. कोटागिरी, कील कोटागीरी, तोडानाड, शोलूर, गुडलूर वगैरे ठिकाणी यांची वस्ती आहे. १९६१ च्या जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या ९२२ होती.

हे लोक कन्नडमिश्रित तमिळ भाषा बोलतात. तोडा जरी त्यांना कमी लेखित असले, तरी कोटा हे उत्कृष्ट कारागीर आहेत. त्यांच्यात सोनार, सुतार, लोहार तसेच भांडी करणारे तांबट, कातडी कमावणारे व दोऱ्या वळणारे कारागीर आहेत. ते शेतीही करतात.

यांच्यात विवाह गोत्रांवरून होत नाहीत. एका गावात राहणारी कुटुंबे आपापसांत लग्ने करीत नाहीत. त्याचप्रमाणे कोटा लोकांत एकाच केरीत किंवा रस्त्यात राहणारी कुटुंबे आपापसांत लग्नसंबंध जोडीत नाहीत. यांच्या पुजाऱ्याला मुंथकन्नान म्हणतात. तो गृहस्थाश्रमी असावा लागतो. बायको मेली की त्याचे पुजारीपण जाते. कुंभम्‌ हा फेब्रुवारी-मार्चमध्ये येणारा सण आहे. ह्या सणात मंगळवारी किंवा शुक्रवारी ते धान्याची पेरणी करतात. या वेळी आठ दिवस पुजारी आणि त्याची बायको मांस खात नाहीत. तो गाईचे दूध काढतो त्यानंतर आंघोळ करून एका मुलाला बरोबर घेऊन शेतात अगर जंगलात जातो. तिथे देवांची पूजा करून झाल्यावर जमिनीत एक अळे करतो. त्यात थोडी नाचणी पेरतो. तोपर्यंत कोटा लोक गावाच्या देवळात जाऊन ते साफ करतात. मग पुजारी आणि मुलगा येतात व पुजारी ग्रामदेवतेची पूजा करतो.

निलगिरीतले कोटा कामतरायाचा व कालीकाईचा उत्सव करतात. त्यामुळे पिक येते अशी त्यांची समजूत आहे. हा उत्सव बारा दिवस चालतो. केरळातही कोटा आहेत. ते म्हणजे गुडलूरचे कोटा. वेंकटस्वामी, अदिराल व उदिराल यांची ते पूजा करतात. कोटा लोक हिंदू देवतांना भजतात. यांच्यात लग्न ठरविताना नियुक्त वधू व वर यांना रात्रभर एकत्र ठेवतात. सकाळी वधूला वर पसंत आहे का ते विचारतात. तिन हो म्हटले तरच लग्न होते. मुलगी आई-बाप पसंत करतात. सोयरिक व लग्न मंगळवार, बुधवार किंवा शुक्रवार या दिवशी होते. यांच्यात बहुपत्नीत्व नाही. मात्र काही ठिकाणी बहुभर्तृत्वाची प्रथा रूढ आहे. बायकोच्या गरोदरपणी नवरा केस व नखे कापीत नाही. ती प्रसूत झाल्यावर जी पहिली प्रतिपदा येते, त्या दिवशी तो केस कापतो. स्त्रियांना मासिक रजोदर्शन काळात तसेच बाळंतपणी  वेगळी झोपडी बांधलेली असते.

गावाच्या पंचायतीमार्फत घटस्फोट, चोरी व इतर गुन्हे यांचा निवाडा होतो.

मृताची अंत्ययात्रा ते गाडीतून मिरवीत काढतात. गाडीला तीन बैल वा रेडे जुंपतात. त्यावेळी वाद्ये वाजवतात. त्या वाद्यांत मृतासाठी खास असे विलापिकांचे शोकसंगीत वाजवितात. स्मशानात मृताच्या नावाने एक बैल वा रेडा मारतात व उरलेले दोन बैल वा रेडे सोडून देऊन गाडी जाळून टाकतात. वर्षातून दोनदा श्राध्द करतात.

संदर्भ : Thurston Edgar, Castes and Tribes of Southern India, Vol, III , New York, 1965.

देशपांडे, सु. र.