गंध ग्रंथि : बऱ्याच पतंगांमध्ये व फुलपाखरांमध्ये अशा ग्रंथी असतात. अशा ग्रंथींतून स्रवणाऱ्या पदार्थामुळे मादीस नर आकृष्ट करून घेतो. पुष्कळ नर फुलपाखरांच्या विशिष्ट खवल्यांवर (अँड्रोकोनिया) ह्या ग्रंथी असतात. त्यांमधून लैंगिक आकर्षक द्रव्य बाहेर पडते. अशा ग्रंथी इतर कीटकांच्या पायावर, पोटावर अगर पोटाच्या इतर शेवटच्या खंडावर असतात. काही पतंगांच्या बाबतीत अशा ग्रंथी मादीच्या शरीरावर असतात व त्यामुळे नरास मादी आकृष्ट करून घेते [→ गंध].

काही कीटकांच्या अशा ग्रंथीमधून स्रवणाऱ्या पदार्थामुळे स्वतःचे संरक्षण करणे शक्य होते. स्रवणाऱ्या पदार्थास अतिशय दुर्गंधी येत असल्यामुळे त्याचे शत्रू दूर राहतात. उदा., ढेकूण.

लैंगिक आकर्षणाशिवाय मधमाशी विशिष्ट खुणेचा गंध स्रवते. त्यामुळे पोळ्यातील व्यक्तिगत माशी ओळखता येते व घरट्याची दिशा कळते. फॉर्मायका रूफा  ही मुंगी आपल्या मार्गाची खूण करण्यासाठी ग्रंथीतून ब्युटिरिक अम्ल स्रवते. 

गर्दे, वा. रा.