खोटे, दुर्गा : (१४ जानेवारी १९०५– ). मराठी रंगभूमीवरील व भारतीय चित्रपटसृष्टीतील एक श्रेष्ठ अभिनेत्री. जन्म मुंबई येथे. पूर्वाश्रमीचे आडनाव लाड. महाविद्यालयात शिकत असतानाच बॅ. विश्वनाथ खोटे यांच्याशी विवाह. मोहन भवनानींच्या फरेबी जाल या मूक चित्रपटात त्यांना पहिल्यांदा भूमिका देण्यात आली. या चित्रपटातील काही भाग बोलका होता. प्रभात फिल्म कंपनीच्या अयोध्येचा राजा (१९३१) या पहिल्याच बोलपटात त्यांनी तारामतीची भूमिका केली. दुर्गाबाईंनी अयोध्येचा राजा, मायामच्छिंद्र या प्रभातच्या चित्रांतील आपली गाणी स्वतःच म्हटली होती. त्यांनी अयोध्येचा राजा मध्ये गायिलेली ‘बाळा का झोप येईना’, ‘आनंद दे अजि सुमन लीला’, ‘बाळ रवि गेला’ ही गाणी त्या वेळी अतिशय लोकप्रिय झाली होती. पुढे कलकत्त्याच्या न्यू थिएटर्स या प्रख्यात संस्थेने त्यांना राजारानी मीरा या चित्रपटासाठी पाचारण केले. तेथे त्यांना देवकी बोससारखा आणखी एक श्रेष्ठ दिग्दर्शक लाभला. कॅमेऱ्यासमोर अभिनय कसा करावा याचे शिक्षण दुर्गाबाईंना प्रभात फिल्म कंपनीत मिळाले, तर हळुवार व सहजसुंदर अभिनय त्या न्यू थिएटर्समध्ये शिकल्या. त्यानंतर त्या सीता, पृथ्वीवल्लभ, अमरज्योति, लाखाराणी, हम एक हैं, तसेच मुगले आझम, नरसीभगत, बावर्ची, खिलौना, बॉबी आदी विविध हिंदी चित्रपटांत चमकल्या. तसेच गीता, विदुर, जशास तसे, पायाची दासी, मोरूची मावशी, सीता स्वयंवर, मायाबाजार यांसारख्या मराठी चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या. पायाची दासी या चित्रपटात खाष्ट सासूची भूमिका करून त्यांनी आपल्या अभिनयाचा एक वेगळा पैलू दाखविला.
१९४८ पासून दुर्गाबाईंचा मराठी रंगभूमीशी संबंध आहे. बेचाळीसचे आंदोलन, कीचकवध, भाऊबंदकी, शोभेचा पंखा, वैजयंती, खडाष्टक, पतंगाची दोरी, कौंतेय, संशयकल्लोळ इ. नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या तर वैजयंती, कौंतेय, पतंगाची दोरी, द्रौपदी इ. नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. अखिल भारतीय नाट्यस्पर्धेत भाऊबंदकी हे नाटक सर्व भाषांतील नाटकांत सर्वोत्तम ठरले होते. दुर्गाबाईंनी त्यात आनंदीबाईंची अत्यंत प्रभावी भूमिका केली होती.
वाटवे, बापू
“