रॉय, हिमांशु : (? १८९२–? १९४०). ‘बॉम्बे टॉकीज’ या सुप्रसिद्ध चित्रपटनिर्मिती संस्थेचे संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने चित्रपटनिर्मिती करणारे आद्य भारतीय निर्माते. कलकत्ता विद्यापठाची कायद्यातील पदवी घेतल्यानंतर ते १९२१ च्या सुमारास उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. तेथेच थोर देशभक्त बिपिनचंद्र पाल यांचे चिरंजीव निरंजन पाल यांच्याशी त्यांची भेट झाली. निरंजन पाल यांच्या द गॉडेस नावाच्या नाटकात हिमांशु रॉय एक भूमिका करीत. निरंजन पाल यांनी एडविन आर्नल्ड यांच्या लाइट ऑफ एशिया या काव्यग्रंथाच्या आधारे गौतम बुद्धाच्या जीवनावर एक चित्रपटकथा तयार केली होती आणि ‘एमेल्का’ या सुप्रसिद्ध जर्मन फिल्म कंपनी तर्फे त्या कथेवर हिंदुस्थानात चित्रपट तयार तयार करण्याचे त्यांचे प्रयत्न चालू होते परंतु चित्रपटनिर्मितीवर हिंदुस्थानात होणारा खर्च हिंदी कंपनीने करावा अशी अट असल्यामुळे त्यात पुढे काही हालचाल होत नव्हती. हिमांशु रॉय यांना ही गोष्ट कळल्यावर त्यांचे सर्व सूप्त संघटनाकौशल्य जागे झाले. तोपर्यंत रॉय यांनी कायद्याचा अभ्यास सोडून देऊन चित्रपटनिर्मिती हेच जीवितकार्य ठरविलेही होते. त्यामुळे लाहोर हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती मोतीसागर यांच्या साहाय्याने जरुर ते भांडवल जमवून हिमांशु रॉय यांनी ‘ग्रेट ईस्टर्न कॉर्पोरेशन’ नावाची कंपनी दिल्लीत उभी केली आणि एमेल्का कंपनीचे तंत्रज्ञ हिंदुस्थानात आणवून लाइट ऑफ एशिया हा चित्रपट १९२६ साली पुरा केला. या चित्रपटात सिद्धार्थची प्रमुख भूमिका रॉय यांनीच केली होती. दोन देशांनी संयुक्तपणे निर्माण केलेला व यूरोपातील अनेक देशांत दाखविला गेलेला हा पहिलाच भारतीय मुकपट होय. पुढे १९२८ साली ‘उफा’ या जर्मन कंपनीच्या सहकार्याने शिराझ आणि १९३० साली एका ब्रिटिश कंपनीच्या मदतीने अ थ्रो ऑफ डाइस असे आणखी दोन भारतीय मूकपट हिमांशु रॉय यांनी तयार केले. या चित्रपटांच्या निमित्ताने त्यावेळेस लंडनमध्ये असलेल्या रवींद्रनाथ टागोरांच्या नातीशी म्हणजेच देविकाराणीशी त्यांची गाठ पडली आणि त्याचे पर्यवसान १९२६ साली त्यांच्या विवाहात झाले. तोपर्यंत बोलपटांचा जमाना सुरू झाला होता, त्यामुळे १९३३ साली कर्म नावाचा इंग्रजी व हिंदी भाषांतला पहिला बोलपट हिमांशु रॉय यांनी लंडनच्या ‘स्टोल स्टुडिओ’त तयार केला. त्यांत हिमांशु−देविकाराणी पती-पत्नींनी प्रथमच मुख्य भूमिका केल्या होत्या. कर्मच्या लंडन प्रकाशनानंतर हिमांशु आणि देविकाराणी यांच्यावर समीक्षक व रसिक यांनी स्तुतिसुमनांचा वर्षांव केला. रॉय यांना अमाप प्रसिद्धी कर्ममुळे मिळाली. आपले सर्व भारतीय चित्रपट आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असले पाहिजेत, अशी हिमांशु रॉय यांची पहिल्यापासून धारणा होती. तथापि बोलपटामुळे भाषेचे बंधन आपोआपच पडले होते. त्यामुळे रॉय यांनी भारतात चित्रपटनिर्मिती करण्याचे ठरविले चित्रपट-व्यवसाय तेव्हा उपेक्षित व अप्रतिष्ठितही होता. तरीही हिमांशु रॉय यांनी आपल्या मूकपटांनी मिळविलेल्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या व स्वतःच्या संघटनाचातुर्याच्या बळावर १९३४ साली मुंबईत बाँबे टॉकीजची स्थापना केली. सर चिमणलाल सेटलवाड, सर कावसजी जहांगीर, सर फिरोज सेठना, एफ्. ई. दिनशा, सर चुनिलाल मेहता असे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर बाँबे टॉकीजच्या संचालक मंडळावर होते आणि उत्तम करमणूकप्रधान चित्रपट काढून हिमांशु रॉय यांनी आपल्या कंपनीला ⇨प्रभात फिल्म कंपनी आणि ⇨न्यू थिएटर्स या त्यावेळच्या नावाजलेल्या कंपन्यांबरोबरच स्थान प्राप्त करून दिले. पुढील सहा वर्षांत हिमांशु रॉय यांनी बाँबे टॉकीजचे सोळा बोलपट निर्माण केले. अछूतकन्या (१९३९) आणि सावित्री (१९३७) हे त्यांपैकी उल्लेखनीय चित्रपट होत. १९३३ मध्ये रॉय यांनी टागोर टॉकी नावाचा लघुपट रवींद्रनाथ टागोरांवर बनविला होता. त्यात टागोरांच्या काही कविता होत्या. बाँबे टॉकीजशी निगडित असे अशोकुमार, राज कपूर, दिलीपकुमार, सुबोध मुखर्जी, के. ए. अब्बास यांसारखे उत्कृष्ट अभिनेते आणि दिग्दर्शक उल्लेखनीय आहेत. हिमांशु रॉय यांचे वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी अकाली निधन झाल्यामुळे, आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे भारतीय चित्रपट काढण्याचे त्यांचे स्वप्न अपुरेच राहिले.

धारप, भास्करराव बोराटे, सुधीर