पाते फ्रॅर : पाते फ्रॅर किंवा पाथे कंपनी ही फ्रेंच चित्रपटनिर्मिती संस्था १८९६ साली स्थापन झाली. शार्ल पाते व त्याचे अन्य तीन भाऊ हे या संस्थेचे मूळ संस्थापक, पॅरिसजवळील व्हिर्न्सेझच्या पंचक्रोशीत हिंडून व लोकांना ग्रामोफोनवर गाणी ऐकवून या कामासाठी शार्ल पातेने पैसा गोळा केला. पुढे विद्युत् मोटार तयार करणारा क्लोड ग्रिव्होलस हा १८९७ मध्ये त्याला येऊन मिळाला व त्यानेच चित्रपटनिर्मितीसाठी पातेला प्रवृत्त केले. लारिव्हे दँ त्रँ आं गार द् व्हँ सॅन  हा त्याचा पहिला चित्रपट. १९०० साली फॅर्दिनां झेक्का याला पाते फ्रॅर या कंपनीने दिग्दर्शक म्हणून घेतले. चित्रपटनिर्मितिगृहेही उभारली व १९०२ साली को वादीससारखा २० मिनिटांचा एक चित्रपट सादर केला. फ्रान्समधील चित्रपटाचे आद्यप्रवर्तक ल्यूमेअर बंधू यांनाही पाते फ्रॅरने मागे टाकले. शार्ल पाते मोठा महत्त्वाकांक्षी होता. कच्चा माल, कॅमेरा व प्रक्षेपक (प्रोजेक्टर) देखील त्याने स्वतःच बनवायला सुरुवात केली. पुढे त्याने स्वतःची चित्रपटगृहेही बांधली आणि चित्रपट भाड्याने द्यायला प्रारंभ केला.  

दर्जेदार नाट्यकृती पडद्यावर आणण्यासाठी १९०६ साली एस्. सी. ए. जी एल्. अर्थात ‘सोसियेते सिनेमातॉग्राफीक दे झोतर ए जां दू लॅत्र’ ही संस्था पाते फ्रॅरने स्थापन केली तर इंग्लंड, स्पेन, जर्मनी, रशिया, अमेरिका या देशांत चित्रपटनिर्मितिगृहे उभारून संस्थेचा प्रचंड व्याप त्याने वाढविला. १९०९ मध्ये पातेने सर्वांत पहिली प्रदीर्घ फिल्म ले मिझेराब्ल  तयार केली.

ल्युसिआं नाँगॅ, गास्ताँ व्हॅल, लुई गास्तिल हे दिग्दर्शक पाते फ्रॅरमध्ये होते. अभिनेता आंद्रे दीद हा दिग्दर्शक झेक्काप्रमाणेच मिलीकडे होता. त्याच्या पाते फ्रॅरकडील भूमिका खूपच लोकप्रिय झाल्या होत्या. त्यानंतर आलेल्या माक्स लिंडर या हुशार व विनोदी नटाची ‘माक्स मालिका’ प्रेक्षकांना फार आवडली.

पाते फ्रॅरचे एक फार मोठे वैशिष्ट्य म्हणजे १९०९ साली तिने पाते गाझॅत म्हणून  सुरू केलेले वार्तापट. १९१० साली इंग्लंड, १९११ साली अमेरिका व १९१४ साली रशिया येथे वार्तापट-निर्मिती तसेच १९०७ साली भारतात तिने पहिले चित्रपट-वितरण सुरू केले.

पहिल्या जागतिक युद्धाच्या अगोदर पाते फ्रॅर म्हणजे चित्रपट जगतात मोठे प्रस्थ होते. त्यानंतर अमेरिकेत चित्रपटांनी आक्रमण सुरू केले. १९१७ साली स्थानिक चित्रपटनिर्मिती ३० टक्क्यांवर आली, तर १९१८ साली ती अवधी १० टक्क्यांवर घसरली त्यामुळे पातेला परराष्ट्रांतील आपली कार्यालये बंद करावी लागली. १९३९ साली ही संस्था मोठ्या संकटात सापडली. त्यातून ती कशीबशी सावरली गेली. १९४४ पासून या संस्थेने आपले लक्ष वितरणाकडे केंद्रित केले.

वाटवे, बापू