खोजा : एक मुसलमानी जात. खोजा हा शब्द फार्सीतील ‘ख्वाजा’ (म्हणजे ‘सरदार’ किंवा ‘ठाकूर’) या शब्दावरून आलेला आहे. इ.स. ९५० च्या सुमारास ईजिप्तच्या शिया पंथीय फातिमी खलिफाच्या (इमाम) सेनापतीने उत्तर सिंध आणि मुलतान काबीज करून तेथे इस्माइली राज्य स्थापन केले. त्या अगोदर तेथे एक इस्माइली ‘दावा’ (मठ) स्थापन झाला होता आणि अनेक लोहाणा हिंदूंनी इस्माइली पंथ स्वीकारला होता. पुढे गुजराती व कच्छी लोहाणांनीही इस्माइली पंथाची दीक्षा घेतली. असे असले, तरी या लोहाणांनी वारसा, विवाह इ. बाबतींत पूर्वीचे हिंदू रिवाजच कायम ठेवले होते. मुलतानची इस्माइली राजवट ३० वर्षेच टिकली. महंमद गझनीने (सु.९७१–१०३०) अबुल फुतू या इस्माइली राजाचा १००५ च्या सुमारास पराभव करून त्याला कैद केले. पुढे मुलतानी लोहाणांपैकी बऱ्याच जणांनी इस्माइली पंथ सोडून सुन्नी किंवा शिया पंथ स्वीकारला. त्यामुळे सध्या खोजांचे तीन भेद आढळतात : (१) खोजा म्हणून ओळखले जाणारे व आगाखानांचे अनुयायी असलेले बहुसंख्य निझारी इस्माइली (२) सुन्नी खोजा. हे प्रामुख्याने मुंबईत आहेत पण त्यांची संख्या अगदीच कमी आहे आणि (३) इथ्ना अशारी खोजा. हे प्रामुख्याने मुंबई व झांझिबार येथे आहेत. यांतील शेवटच्या दोन जाती आगाखानांच्या अनुयायी नाहीत. इस्माइली लोकांपैकी, पीर सदर अल्-दीन ह्या इस्माइली पंथांच्या इराणी मिशनऱ्यांमुळे चौदाव्या शतकात धर्मांतर केलेले कच्छी आणि गुजराती लोहाणाच आज खोजा म्हणून ओळखले जातात. त्यांची मातृभाषा गुजराती आहे. चालू शतकाच्या सुरुवातीस आगाखानांच्या प्रयत्नाने इस्माइली खोजांनी मुसलमानी कायदा मान्य केला. इस्माइली पंथाचे ⇨ आगाखान हे प्रमुख आहेत. खोजा लोक अन्यधर्मीयांस आपल्यात समाविष्ट करून घेत नाहीत तथापि खोजा पुरुषांच्या अन्यधर्मीय बायकांची संतती मात्र खोजा मानली जाते. खोजा लोक आपल्यात जमातखान्याचा (सार्वजनिक दिवाणखान्याचा आणि इमारतीचा) उपयोग मशिदीसारखा करतात. त्यांची सामाजिक संघटना एकजिनसी असून तीवर आगाखानांचे नियंत्रण असते. या संघटनेच्या संचालकांत काही प्रतिनिधी लोकनियुक्त, तर इतर काही आगाखानांनी नेमलेले असतात. मुंबई, कच्छ, सौराष्ट्र, दक्षिण सिंध, गुजरात, झांझिबार आणि पूर्व आफ्रिकेत खोजांची वस्ती असून मुख्यत्वे ते व्यापारधंद्यात आहेत. खोजांची एकूण जागतिक संख्या सु. २,५०,००० (१९६८) आहे.

पहा : इस्माइली पंथ.

करंदीकर, म. अ.