खैबर खिंड : पाकिस्तान व अफगाणिस्तान यांना जोडणारी पाकिस्तानच्या वायव्य सरहद्दीवरील सुप्रसिद्ध खिंड. ही हिंदुकुश पर्वताच्या सफेद कोह श्रेणीत पेशावरपासून सु. १७ किमी. असून तिच्यातून लमाणमार्ग, पक्की सडक व जामरूद ते लंडीखाना लोहमार्ग गेले आहेत. तिच्या दोहो बाजूंस १८० मी. ते ३०० मी. उंचीचे शेल व चुनखडक असून त्यांच्यामागे त्याहीपेक्षा उंच डोंगर आहेत. पेशावरपासून सु. ११ किमी. जामरूदचा भक्कम किल्ला आहे. तेथून ५ किमी. वर सुरू होऊन ही खिंड ५३ किमी. वायव्येस काबूल नदीकाठच्या लोह डाक्काच्या उजाड मैदानापर्यंत जाते. जामरूदचा किल्ला रणजितसिंगाचा सेनापती हरिसिंग नलवा याने बांधला. ९६७ मी. उंचीवर अली मस्जिद किल्ला आहे. येथून पुढे खिंड अगदी अरुंद, काही ठिकाणी केवळ ४·५ मी., झाली आहे. येथून १६ किमी. पश्चिमेस १,०७२ मी. उंचीवरील लंडीकोटल किल्ला आहे. हे या खिंडीतील सर्वांत उंच ठिकाण होय. येथून शिनवारी प्रदेशातून लंडीखाना येथे एका निदरीतून जावे लागते. लंडीकोटलच्या पश्चिमेस ९·५ किमी. वर ७०० मी. उंचीवरील तोर्खम येथे अफगाणिस्तानची हद्द सुरू होते.
“