कोचाव्हांबा : बोलिव्हियातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आणि याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकवस्ती १,४९,९०० (१९७० अंदाज). हे ला पासच्या आग्नेयीस २२४ किमी., रोचा नदीकाठी, एका सुपीक खोर्यात, २,५७१ मी.उंचीवर वसले आहे. वसाहतकालीन इमारती व शिल्पे आणि शीतल हवा यांबद्दल याची ख्याती असून, येथे १८३२ मध्ये स्थापन झालेले विश्वविद्यालय आहे. चामड्याच्या वस्तू, कापड, साबण, गालिचे, सिगारेट, चॉकोलेट इत्यादींचे कारखाने यांमुळे आणि परिसरातील उत्पादनाच्या बाजारपेठेमुळे यास समृद्धी आलेली आहे. येथे आंतरदेशीय व आंतरराष्ट्रीय विमानातळ आहे. याचे मूळचे ‘ओरोपेसा’नाव १७८३ मध्ये बदलले.
शहाणे, मो. ज्ञा