पेच : (१) (प्राचीन पेस्कियम). यूगोस्लाव्हियाच्या सर्बीया प्रजासत्ताकातील शहर. लोकसंख्या ४२,१०० (१९७१ अंदाज). हे कॉसॉव्हॉ-मेटोहीया या स्वायत्त विभागात, प्रीश्टिनाच्या पश्चिमेस सु. ७२.४ किमी. वर नॉर्थ अल्बेनियन आल्प्स व मोक्रा गोरा पर्वतांच्या दरम्यान, बेली ड्रीम नदीच्या उपनदीवर वसलेले आहे. हे दळणवळणाचे केंद्र असून नीशहून येणाऱ्या लोहमार्गाचे अंतिम स्थानक आहे. पेच यास धार्मिक केंद्र म्हणूनही महत्त्व आहे. येथे सर्बीयन ऑर्थोडॉक्स चर्चचे मुख्य पीठ होते परंतु तुर्की अंमलात १७६६ मध्ये हे पीठ कॉन्स्टँटिनोपल (इस्तंबूल) येथील ग्रीक धर्मगुरूंच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले होते. पेच धर्मपीठाच्या चार चर्चमधून सुंदर भित्तिलेपचित्रे आढळतात. याच्या दक्षिणेस चौदाव्या शतकातील देकनी धर्मपीठ असून तेथील वास्तुकला व वास्तुसजावट हे सर्बीयन कलेचे उत्तम नमुने समजले जातात. तुर्कांच्या अंमलात हे शहर ‘आयपेक’ या नावाने ओळखले जात होते. मशिदी, अरुंद रस्ते व जुनी तुर्की घरे यांमुळे यास पौर्वात्य नगराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथे चर्मोद्योग, अन्नप्रक्रिया, हस्तोद्योग इ. उद्योग विकसित झाले असून ही अन्नधान्याची बाजारपेठ आहे.