पूर्वग्रह : (प्रेजुडिस). विशिष्ट जातीच्या वस्तू किंवा विशिष्ट समूहातील व्यक्ती यांच्यासंबंधी यथार्थ माहिती न मिळवता प्रथमपासूनच काहीएक भावनात्मक ग्रह बाळगणे व त्यानुसार त्यांच्या बाबतीत वागणे, हा ‘पूर्वग्रह’ या संज्ञेचा अर्थ होय. पूर्वग्रह हा अभिवृत्तीचाच एक प्रकार होय कारण पूर्वग्रहामध्ये काहीएक समजूत (बिलीफ), भावनेचा अंश आणि कृती हे अभिवृत्तीतील तिन्ही घटक अंतर्भूत असतात. पूर्वग्रह अनुकूल स्वरूपाचाही असू शकतो तथापि ‘पूर्वग्रह’ या शब्दप्रयोगात सामान्यतः प्रतिकूल अभिवृत्तीच अभिप्रेत असते. समाजशास्त्राच्या व सामाजिक मानसशास्त्राच्या संदर्भात, पूर्वग्रह ही संज्ञा पुढील अर्थाने वापरण्यात येते : ‘पूर्वग्रह म्हणजे वंश, धर्म, मूळ वसतिस्थान, संस्कृती इ. दृष्ट्या भिन्न असलेल्या समूहांविषयी प्रतिकूल ग्रह व वैमनस्यदर्शक वागणूक’. वा प्रतिकूल अभिवृत्तीतील बौद्धिक घटक म्हणजे काही एक साचेबंद समजूत, भावनिक घटक म्हणजे तिरस्कारभाव आणि वर्तनात्मक घटक म्हणजे दुराव्याची व असहिष्णुतेची वागणूक. इतर समूह आपल्यापेक्षा गुणदृष्ट्या कमी प्रतीचे समजणे, त्यांचे ते तथाकथित (अव-) गुण म्हणजे त्यांचा ‘जातिस्वभाव’च (क्लास इसेन्स) होय, असे गृहीत धरणे व अशा कलुषित दृष्टीने त्या समूहातील प्रत्येक व्यक्तीकडे पाहणे आणि ‘ती व्यक्ती अमुक समूहाची आहे, त्याअर्थी तिच्या ठिकाणीही तो जातिस्वभाव असणारच’, असा निगमनात्मक निष्कर्ष गृहीत धरून तिच्याशी दुराव्याने अथवा साक्षात वैरभावाने वागणे, हे सामाजिक पूर्वग्रहाचे स्वरूप होय. गोऱ्या अमेरिकनांची निग्रो लोकांबाबतची साचेबंद कल्पना आणि वागणूक, सर्वसामान्य अमेरिकन माणसाची ज्यू, इटालियन, जपानी इ. परराष्ट्रीयांबाबतची कल्पना व वागणूक, सर्वसामान्य उच्चवर्णीय हिंदूंची कनिष्ठ वर्णीयांशी असलेली अनुदार वागणूक ही सामाजिक पूर्वग्रहाची उदाहरणे होत. पूर्वग्रहांचे परिणाम : (१) सामाजिक पूर्वग्रहापायी समाजामध्ये वर्चस्व गाजविणारा समूह इतर समूहांना वा वर्गांना वस्ती, बाजार, उपहारगृहे, शिक्षणसंस्था, व्यवसाय, नोकऱ्यांचा दर्जा इ. बाबतींत अलग ठेवतो व स्वतःस मिळणाऱ्या संधी व सुविधा यांना मात्र नाकारतो. साहजिकच त्या प्रतिष्ठित समूहाच्या वर्तनविषयक मानदंडांपासून हे समूह वंचित राहतात. परिणामी त्या समूहातील (वर्गातील) व्यक्तींच्या बौद्धिक व इतर क्षमता विकास पावत नाहीत. मग, ‘आपली पायरीच खालची’, असा लघुताभाव त्यांच्या मनात निर्माण होऊन उत्कर्ष करून घेण्याची आकांक्षा त्यांच्या ठिकाणी उद्‌भवेनाशी होते. सामाजिक वर्तनाचे त्यांचे मानदंडही असंस्कृतच राहतात. (२) याचा परिणाम म्हणजे वर्चस्व गाजवणाऱ्या समूहाचे पूर्वग्रह रास्तच आहेत असे वाटावे, अशी परिस्थिती त्या पूर्वग्रहांमुळेच अस्तित्वात येते व ती टिकून राहते. (३) व्यापक समाजाच्या पोटसमूहांमधील अशा अलगपणामुळे एकंदर समाजाचा उत्कर्ष व प्रगती इष्ट त्या वेगाने होत नाही व एकंदर समाजाच्या बौद्धिक-आध्यात्मिक गुणवत्तेची पातळीही उंचावत नाही. (४) परंतु औद्योगिक प्रगती, समाजसुधारकांचे प्रयत्नक, शिक्षणाचा प्रसार, इतर देशांतील सामाजिक परिवर्तनाचे ज्ञान इत्यादींमुळे अलग ठेवण्यात आलेल्या समूहांना जेव्हा प्रगतीची शक्यता दिसू लागते, त्यांच्या आकांक्षांना वाचा फुटते व त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू होतात, त्या वेळी समाजातील वर्चस्व गाजवणारा समूह वा वर्ग अशा प्रयत्नांना खीळ घालू लागतो व परिणामी संघर्ष निर्माण होतो किंवा अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या १८९६ सालच्या निर्णयानंतर निग्रोंना ‘समान पण निराळे’ (ईक्वल बट्‌ सेपरेट) वागवण्यात येऊ लागले, तसा प्रकार सुरू होतो. त्यामुळे त्या समुहांची स्थिती विचित्र होते. स्वतःचे नक्की स्थान त्यांना समजेनासे होते. आकांक्षांच्या बाबतीत त्यांच्या ठिकाणी बराचसा विफलताभाव येऊ लागतो. आंतरिक संघर्षाचा परिणाम म्हणून सौम्य मनोविकृतीची लक्षणे व क्वचित्‌ मानसमूलक शारीरिक व्याधी उत्पन्न होण्याचाही संभव असतो, असे अमेरिकेतील अभ्यासकांनी म्हटले आहे. हे समूह वर्चस्वधारी वर्गाच्या मार्गात अडचणी आणण्याचे छुपे प्रयत्नही करू लागतात व एक प्रकारे समाजातील समस्यारूप समूह (प्रॉब्लेम ग्रुप्स) होऊन बसतात. पूर्वग्रहांचे मूळ : परक्या समूहांना कमी लेखण्याची वृत्ती निसर्गसिद्ध असते, असे म्हणता येत नाही. पूर्वग्रह हा व्यक्ती समाजाकडून संपादन करीत असते, असे दिसते. कारण, अमेरिकेतील विविध ठिकाणच्या विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी राष्ट्र व संस्कृतिदृष्ट्या भिन्न असलेल्या एकूण पंधरा समूहांचा सामाजिक जवळीक ठेवण्याच्या दृष्टीने जो क्रम लावला, तो जवळजवळ सारखाच असल्याचे दिसून आले (गिल्फोर्ड यांच्या पाहणीचा निष्कर्ष). यावरून पूर्वग्रह हा एकंदर समाजातच फैलावलेला असतो, असे म्हणता येते. बोगार्डस्‌ या मानसशास्त्रज्ञाने अमेरिकन विद्यार्थ्यांची कॅनेडियन, चिनी, इंग्लिाश, फ्रेंच, जर्मन व हिंदू यांविषयीची अभिवृत्ती ‘सामाजिक दुरावा-श्रेणी’ (सोशल डिस्टन्स स्केल) वापरून १९२६ मध्ये व पुन्हा एकदा १९४६ मध्ये अभ्यासली असता, या दीर्घ कालावधीनंतरही तीत फारसा फरक पडला नव्हता, असे आढळून आले. परकीय समूहांच्या साक्षात संपर्कात मुळीच न आलेले समूहही त्यांना अनुदार विशेषणे लावतात, यावरूनही पूर्वग्रह हे त्या त्या समाजात खोलवर रूजलेले असतात व व्यक्ती ही त्या त्या समाजाची घटक असल्याने ते पूर्वग्रह आत्मसात करीत असते, हे म्हणणे साधार वाटते. समाजात फैलावलेला पूर्वग्रह मुलांच्या मनात मूळ धरीत असतो तो मातापित्यांचे अन्य समूहांतील व्यक्तींबाबतचे वर्तन पाहून, त्यांचे उद्‌गार ऐकून तसेच त्यांच्या शिकवणुकीने व अन्य समूहांच्या लोकांत मिसळल्याबद्दल मातापित्यांकडून झालेल्या शिक्षेमुळे. शिक्षक, शेजारीपाजारी, स्नेहीसोबती यांचाही हातभार त्यास लागत असतो. समाजात पूर्वग्रह का निर्माण होतो, या प्रश्नाचे उत्तर समाजशास्त्रीय भूमिकेवरून काही मानसशास्त्रज्ञांनी पुढीलप्रमाणे दिले आहे : स्वतःचे आर्थिक, राजकीय किंवा सांस्कृतिक वर्चस्व राखू पाहणारा समूह स्वतःला श्रेष्ठ व इतर समूहांना कमी प्रतीचे समजत असतो व आपल्या वर्चस्वाखाली ठेवू पहात असतो परंतु जेव्हा त्याची बरोबरी ते समूह करू लागतात, तेव्हा वर्चस्वधारी समूहाच्या ठिकाणी त्यांच्याविषयी प्रतिकूल अभिवृत्ती निर्माण होते. या उपपत्तीस इतिहासाचा आधार मिळतो. अमेरिकेत निग्रोंना गुलाम या नात्याने सुरुवातीस आणलेले होते परंतु जेव्हा कायद्याने त्यांची गुलामगिरी नष्ट केली, तेव्हा निग्रोंविषयी पूर्वग्रहाची अभिवृत्ती व निग्रो-समस्या निर्माण झाली. ब्राझीलमध्ये तसे झाले नाही कारण तेथे ‘निग्रो म्हणजे गुलाम’ हे समीकरण कधीच नव्हते. अमेरिकेत जपान्यांविषयी पूर्वग्रह निर्माण झाला, तो त्यांनी पश्चिम किनाऱ्यावर शेती, मासेमारी व व्यापार सुरू केला तेव्हापासून. जेव्हा अमेरिकेत स्थायिक असलेले परकीय लोक अमेरिकेचे नागरिकत्व पूर्णत्वाने मिळवण्याचा प्रयत्न करू लागतात, तेव्हा त्यांच्या बाबतीतही पूर्वग्रह दिसू लागतो. शेरीफ या मानसशास्त्रज्ञाच्या प्रयोगाने या समाजशास्त्रीय उपपत्तीस पुष्टी मिळाली आहे. प्रयोगासाठी म्हणून मुद्दाम एकत्र आणलेल्या विद्यार्थ्यांमध्ये दोन गट पडल्यानंतर जेव्हा त्यांच्यामध्ये बक्षिसासाठी स्पर्धा उत्पन्न करण्यात आली, तेव्हा या दोन गटांनी एकमेकांना ‘नावे’ ठेवण्यास प्रारंभ केला, असे दिसून आले.


पूर्वग्रह टिकवून धरणारे घटक : प्रत्यक्ष वस्तुस्थितीमुळे पूर्वग्रह टिकून रहाण्यास मदत होत असते. परंतु पूर्वी म्हटल्याप्रमाणे, ही वस्तुस्थिती निर्माण होण्यास खुद्द पूर्वग्रहच कारणीभूत असू शकतो. इतर समूहांना अलग ठेवल्याने त्यांची राहणी, कृती व विचारसरणी वेगळी बनते व त्यांना संधी व सुविधांपासून वंचित ठेवल्याने त्यांची बौद्धिक विकासाची तसेच सामाजिक नीतिमत्तेची पातळीही कमी रहाते. याचा परिणाम असा होतो, की त्यांच्याविषयीच्या प्रतिकूल अभिवृत्ती साधार व रास्तच आहेत असे वाटू लागते व त्यामुळे पूर्वग्रह टिकून रहातो. अलग वस्त्या, अलग शिक्षणसंस्था, अलग वाहनव्यवस्था, अलग पाणवठे इत्यादींमुळेही ‘‘ते लोक आपल्याहून निराळे व एकपरी ‘अस्पृश्य’ आहेत’’ अशी समजूत दृढ होऊन ती चालू रहाते. अन्य समूहांविषयीच्या भिन्नतेवर भर देणारे वाङ्मय, त्यांच्या विषयीचे विनोदाच्या नावाखाली करण्यात येणारे अनुदारवृत्तीनिदर्शक उल्लेख इत्यादींमुळेही पूर्वग्रह टिकून रहाण्यास मदत होते. पूर्वग्रहाला व्यक्तीच्या गरजाही आधार पुरवित असतात. काही गरजांच्या तृप्तीसाठी माणसाचा पूर्वग्रह तिला उपयोगी पडत असतो, हे काट्‌झ या मानसशास्त्रज्ञाचे विधान पटण्यासारखे आहे. ‘निग्रो हे स्वभावतःच उधळे व बेजबाबदार’, हा पूर्वग्रह त्यांच्याकडून अल्प मोबदल्यात सेवाचाकरी करून घेण्यास गोऱ्या अमेरिकनांना उपयोगी पडतो. नोकरचाकर मिळत रहावेत म्हणून निग्रोंना शिक्षणादी सवलती न देणेच बरे, ह्या स्वार्थी इच्छेचे समर्थन करण्यास त्यांच्याविषयीचा पूर्वग्रह सोयीचा ठरतो. प्रतिष्ठा, वर्चस्व, सुरक्षितताभाव, लैंगिक सुख इ. गरजांच्या संबंधात आलेल्या विफलतेमुळे निर्माण होणाऱ्या क्रोधभावनेस जेव्हा वाट हवी असते, त्या वेळी पुष्कळदा भावविस्थापन (डिस्‌प्लेसमेंट) होण्याचा संभव असतो. या भावविस्थापनाच्या कामी ‘बळीचा बकरा’ म्हणून इतर समूह उपयोगी पडत असतात. या प्रकारात कधीकधी सामान्यीकरणाचाही भाग असतो. तो असा, की जर इतर समूहातील एखादी व्यक्ती त्या वैफल्यास कारणीभूत असेल, तर ती ज्या समूहाची, जातीची, धर्माची वा राष्ट्राची असेल तो समूहच, ती जातच, तो धर्मच किंवा ते राष्ट्रच मुळी वाईट, असा ग्रह करून घेतला जातो. कधीकधी काही व्यक्तींच्या अप्रशस्त प्रवृत्तींना सोयीचा म्हणून पूर्वग्रह टिकवून धरला जातो कारण सामाजिक जीवनात पूर्वग्रहापायी दुर्बल ठेवल्या गेलेल्या समूहांतील व्यक्तींच्या संबंधांत हिंसाचार, लैंगिक अत्याचार इ. गोष्टी बिनदिक्कत करणे सोपे जाते. कधीकधी ‘अहं’ रक्षणार्थही पूर्वग्रह उपयोगी पडत असतो. स्वतःच्या अप्रशस्त प्रवृत्तींचे प्रक्षेपण (प्रोजेक्शन) व्यक्तीकडून नकळत दुसऱ्यावर होत असतो. ज्या समूहांविषयी पूर्वग्रह असतो, ते समूह अशा प्रक्षेपणार्थ उपयोगी पडत असतात. अडोर्नो व त्याचे सहकारी यांच्या संशोधनावरून हे दिसून आले आहे. सेमिटिक लोकांविषयी ज्यांचे पूर्वग्रह तीव्र होते, अशा काही अमेरिकन विद्यार्थिनींना चित्रावबोध चाचण्या व शाईच्या ठिपक्यांच्या चाचण्या ह्या प्रक्षेपण-चाचण्या देण्यात आल्या असता, त्यांतील चित्रांमध्ये व शाईच्या डागांमध्ये त्या विद्यार्थीनींना ‘खुनाचे प्रसंग’, ‘शिक्षेचे प्रसंग’, ‘खालच्या वर्गाच्या व्यक्ती व त्यांचे कामुक वर्तन’ वगैरे दिसले व त्या ‘कामुक’ वर्तनाचे त्यांनी असे काही वर्णन केले होते, की जणू त्यांना चित्रांतील व्यक्तींचा हेवाच वाटत होता. स्वतःच्या समूहाचे दडपणही पूर्वग्रह टिकून राहण्यास कारणीभूत असते. त्या समूहात आपल्याला स्थान मिळावे व ते टिकावे, त्याच्या मान्यतेला व पसंतीला आपण मुकू नये, या इच्छेमुळेही व्यक्ती पूर्वग्रह सोडून द्यावयास धजत नाही. या दृष्टीने पाहता, पूर्वग्रह हे एक प्रकारे समूहसदस्यत्वाचे प्रवेशपत्रच ठरत असते. पूर्वग्रहनिर्मूलन : पूर्वग्रह नष्ट करण्यासाठी, निदान त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी, लहान गटांवर करून पाहिलेल्या प्रयोगांच्या यशस्वितेच्या आधारे मानसशास्त्रज्ञांनी पुढील तंत्रांची शिफारस केली आहे : (१) मातापिता व शिक्षक यांना उपदेश व आवाहन करणे आणि त्यांच्याकडून मुलांच्या मनात पूर्वग्रह उत्पन्न होऊ न देणे. (२) अन्य समूहांविषयीची यथार्थ माहिती प्रसृत करणे. ती देताना संस्कृतिभिन्नतेवर भर न देता संस्कृतिसादृश्यावर भर देणे. (३) संस्कृति-संस्कृतींत भिन्नता का असते, हे लोकांना समजावून सांगणे. (४) पूर्वग्रह हे व्यापक सामाजिक उद्दिष्टांच्या आड येतात, हे लोकांना पटवून देणे. (५) भिन्नभिन्न समूहांमध्ये सक्रिय सहभागात्मक संपर्क घडवून आणणे. (६) कथा, कादंबऱ्या व चित्रपट यांमध्ये अलग ठेवल्या गेलेल्या समूहांतील व्यक्तींना सन्मानाची वागणूक दिल्याचे प्रसंग दर्शविणे. (७) समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींनी पूर्वग्रहप्रेरित वर्तनाबद्दल नापसंती व्यक्त करणे. (८) व्यक्तिविकासास व सामाजिक विकासास प्रतिबंध करणाऱ्या भेदभावास कायद्याने बंदी करणे. मात्र यांतील प्रत्येक उपाय हमखास यशस्वी ठरतोच असे नाही, हेही मानसशास्त्रज्ञांनी नमूद केले आहे. 

संदर्भ : 1. Allport, G. W. The Nature of Prejudice, Reading Mass., 1954.

             2. Clark, K. B. Prejudice and Your Child, Boston, 1955.

             3. Hartley, E. L. Problems in Prejudice, New York, 1946.

            4. Krech, David Crutchfield, R. S. Bellachey, E. L. Individual in Society: A Textbook of Social Psychology, New York,    1962.           5. Saenger, Gerhart, The Social Psychology of Prejudice, New York, 1953. 6. UNESCO, Race   as News, New York, 1974.

       

अकोलकर, व. वि.