लोकोत्तर बुद्धिमत्ता : सर्वसामान्य जीवनात माणसे एका विशिष्ट घडीत वागत असतात. त्यातून एखादी व्यक्ती असामान्य गुण दाखवते. हे असाध्य ते साध्य करणारी व्यक्ती कशामुळे असे शिखर गाठू शकते ? हा मनोविज्ञानातील एक फार जुना प्रश्न आहे. हे दैवी देणगीमुळेच घडते, मनुष्य निमित्तमात्र असतो, ही कल्पना आपल्याकडे आहे. प्राचीन ग्रीकही तसे समजत असत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून या प्रकारच्या ‘खास’ किंवा ‘अपवादात्मक’ व्यक्तींचा अभ्यास एकोणिसाव्या शतकापासून चालू आहे. या अभ्यासाला एक नवे परिमाण जागतिक स्पर्धेच्या संदर्भातही प्राप्त झाले. नैसर्गिक साधनसंपत्तीच्या जोरावर प्रगती साधण्यासाठी विशिष्ट विचारसरणी, नवे उपक्रम, मानवी शक्तींचा विकास हेच निर्णायक ठरणार हे लक्षात आल्यामुळेही लोकोत्तर बुद्धिमत्तेच्या अभ्यासाला चालना मिळाली. एखाद्या विशिष्ट समाजाने स्वतःला फायदा मिळविणे, मिळवलेला पुढावा कायम ठेवणे यासाठी वापरण्याचे एक साधन या दृष्टीने मानवी क्षमतांकडे बघायला सुरुवात झाली. त्यामुळे या प्रकारच्या व्यक्ती ओळखण्यासाठी चाचण्या, अशा व्यक्तींचे विशेष प्रशिक्षण, ह्या प्रशिक्षणाच्या पद्धती आणि आशय, विशेष प्रशिक्षण न देता त्यांच्या जीवनाचा निरीक्षणात्मक अभ्यास इ. अभ्यासक्षेत्रे विकसित झाली.

संकल्पना व इतिहास : ‘लोकोत्तर’, ‘असामान्य’, ‘अलैकिक’ या विशेषणांनी ज्या व्यक्ती ओळखल्या जातात त्यांमागची संकल्पना तपासली असता चांगले, उत्तम, श्रेष्ठ इ. विशेषणे एकापुढे एक सलगपणे येतात त्यानंतर एकदम बऱ्याच पायऱ्या टाकून ‘लोकोत्तर’ ही कोटी येते, असे दिसेल. म्हणजे मंदमती व्यक्ती, सामान्य व्यक्ती आणि चांगल्या, उत्तम, श्रेष्ठ व्यक्ती यांची मांडणी एका सलग आयामावर, तर ‘लोकोत्तर’ व्यक्ती एका स्वतंत्र वर्गात, अशी संकल्पना आपल्याला दिसते. अशा प्रकारे या व्यक्तींना वेगळ्या वर्गात टाकल्यावर हे वेगळेपण कशात असते हा पुढचा प्रश्न निर्माण होतो. ‘ईश्वरी देणारी’ म्हटल्याने उलगडा होत नाही. ते आपण आपल्या अज्ञानाला दिलेले एक नाव ठरते. परंतु पूर्वापार ही संकल्पना वापरून विचाराला पूर्णविराम दिला जातो. या संकल्पनेप्रमाणेच पूर्वापार लोकोत्तर व्यक्ती आणि मनोवृकृती यांच्यात काही नाते आपल्याला समजही रुढ आहे Genius is akin to madness’ या वाक्यात ही संकल्पना व्यक्त केली जाते. मॉरो द तूर,⇨ चेझारे लोंब्रोसो, क्रेश्मर इ. मनोवैज्ञानिक या संकल्पनेचा प्रत्यक्ष अभ्यासाने पाठपुरावा करत होते. मॉरो द तूरच्या मते लोकोत्तर बुद्धिमत्ता ही विशष्ट प्रकारच्या बुद्धिभ्रंशाची परिणती असते. लोंब्रोसोने शारीरिक विशेषतः मेंदूच्या वैशिष्ट्यांच्या आधारे म्हटले, की ही एक आपस्मारिक वर्गातील विकृती आहे. मनोविकृतीच्या सीमारेषेवर असण्यांचे प्रमाण सामान्य व्यक्तीसमूहांपेक्षा असामान्य व्यक्तींच्या समूहात जास्त आढळते असे मत क्रेश्मरने आपल्या संशोधनांती मांडले. मनोविकृतीचा कल सर्जनशीलतेकडे झुकलेला असतो. त्यामुळे मनोविकृतीच्या सीमारेषेवर असणाऱ्या व्यक्ती सर्वसामान्य परिस्थितीशी समरस होऊ शकत नाहीत. त्यातूनच काहीतरी अलौकिक करण्याची प्रेरणा त्यांना मिळते. लँग आइशबॉम यालाही अशाच प्रकारची आकडेवाडी मिळआली. लोकोत्तर बुद्धिमत्ता असलेल्या दोनशे स्त्री पुरुषांचा त्याने अभ्यास केला. परिस्थितीशी विषमायोजन, त्यातून ताण आणि त्या ताणातून मुक्त होण्यासाठी चारचौघांपेक्षा वेगळे, सृजनशील काहीतरी करणे असा त्यांच्या वर्तनाचा क्रम असतो. त्यांच्यासारख्या व्यक्ती त्यांच्याभोवती नसतात. त्यामुळे त्यांना मानासिक स्थिरता लाभत नाही. वास्तवात नसलेल्या गोष्टी कल्पनाशक्तीच्या राज्यात मिळवण्याच्या प्रयत्नातून त्यांच्या कृती उद्‌‌‌‌‌‌‌भवतात. या संकल्पनेचा प्रभाव दीर्घकाळ टिकलेला दिसतो. ॲरिस्टॉटलपासून विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत संकल्पनेचा पाठपुरावा चालू होता.

मनोविश्लेषणवादी विचारवंतांनी उन्नयन, दमन, प्रतिपूरण इ. यंत्रणांच्या आधारे लोकोत्तर बुद्धिमत्तेचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. ॲड्लरच्या मते अन्य क्षेत्रातील न्यूनतेवर सृजनशील कृतीने मात करण्याचा हा आविष्कार असतो. फ्रॉइडने प्रतिपादन केले, की  वास्तव आणि कल्पिते यांच्यामधील एका सूक्ष्म भेदरेषेवरून या व्यक्ती जात असतात आणि कल्पिताकडची भरारी मानसनसीय (सायकोन्यूरॉटिक) विकृतीत परिणत होण्याची शक्यताही असतेच. संघर्षग्रस्त मानसिक अवस्थेतील असमतोलाला तोंड देण्यासाठी सृजनशील कृती अवलंबली जाते. या दोन्ही संकल्पना विकृतीशी नाते सांगणाऱ्याच होत. रांकने मात्र इच्छाशक्ती आणि प्रतिकारी इच्छाशक्ती या दोन्हींच्या आधारे आपली कल्पना मांडली. या परस्परविरुद्ध शक्तींचा आदर्श समतोल उत्पन्न झाला, की त्यातून ध्येयनिश्चिती करणारी ध्येयपूर्तीसाठी झटणारी प्रेरणा निर्माण होते. या शक्तींची पूर्ण विकसित अवस्था म्हणजेच तो मनुष्य स्व – स्थ, स्वतःशी संवादी होणे, शक्ती आणि आदर्श यांच्यातील एकमेळ. नंतर क्रिसनेही विकृतिसंबद्ध संकल्पना नाकारून लोकोत्तरत्त्व हे ‘अहं’ च्या अबाधित स्वरुपाचे लक्षण होय, असे मत मांडले. स्टॉरने या व्यक्तींच्या वैशिष्ट्यांमध्ये अमूर्तीकरणक्षमता आणि वास्तवाशी संपर्क टिकवण्यासाठी शक्ती यांचा समावेश केला.

लोकोत्तर व्यक्तींचे अभ्यास : निरीक्षणात्मक अभ्यास आणि मापनात्मक अभ्यास अशा दोन्ही प्रकारचे अभ्यास आतापर्यंत झालेले आहेत. त्यांपैकी ⇨ सर फ्रान्सिस गाल्टन यांचा ब्रिटनमधील श्रेष्ठींचा अभ्यास हा निरीक्षणात्मक अभ्यासात प्रसिद्ध आहे. गॉल्टन यांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस हा अभ्यास सुरु केला. प्रथमतः निरीक्षणात्मक असलेल्या या अभ्यासाला त्यांनी मापनपद्धतींची जोड दिली आणि  व्यक्तिविशेषांचे मापन व संख्याशास्त्रीय सामान्यीकरणाच्या तंत्रांचा विकास केला. या अभ्यासातून लोकोत्तर बुध्दिमत्तेचे उगमकारण, विकास आणि व्यक्तिविशेष यांविषयी माहिती मिळाली. गॉल्टन यांच्या मते लोकोत्तर व्यक्तींना अनुवंशाने बीजगुण प्राप्त होत असतात. एकेका घराण्यात श्रेष्ठींचे प्रमाण जास्त आढळते, हा गॉल्टन यांचा एक महत्त्वाचा अनुवंशवादी निष्कर्ष होय. ज्या व्यक्तींनी विशेष कर्तृत्व गाजवून प्रत्यक्षात आपले श्रेष्ठत्व दाखवले त्यांच्या निरीक्षणांवर हा अभ्यास आधारलेला होता यापुढचा टप्पा म्हणजे अशी व्यक्ती प्रत्यक्ष कर्तृत्व गाजवण्याआधीच हेरता येईल का ? या प्रश्नावर येतो. अशी  कर्तृत्ववान माणसे उच्च बुद्धिगुणांकाची असतील यावर लेविस टर्मन आणि एम्. एच्. ओडेन यांचा वैकासिक अभ्यास सुरु झाला. १९२१ साली सरासरी ११ वर्षे वयाची उच्च बुद्धिगुणांकाची सरासरी १५० मुले निवडून त्यांचा १९३० सालापर्यंत विविध अंगांनी अभ्यास करण्यात आला. १९४७ साली पुन्हा एकदा याच मुलांचा जीवनेतिहास तपासण्यात आला. त्यात असे दिसून आले, की उच्चतर बुद्धिगुणांकाची मुले शारीरिक दृष्ट्या अधिक सुदृढ, शैक्षणिक दृष्ट्या अधिक प्रगत, वैयक्तिक गुणांबाबत अधिक इष्ट गुणांनी युक्त होती. याच समूहाचा १९५५ साली तिसरा अभ्यास झाला, तेव्हा त्यांचे समायोजन उच्च कोटीचे दिसून आले. त्यांच्यामधून ६७ पुस्तके लिहिणारे तयार झाले होते, १,४०० वैज्ञानिक लेख, १५० पेटंट्स मिळवणारे आढळून आले. मुलींपैकी मात्र निम्म्यापेक्षा कमी संख्येने घराबाहेर पडून काम करताना आढळल्या.


कॉनिट्झ, पॉल विटी, गेटझेल्स, जॅक्सन, टॉरन्स यांचे बुद्धिमत्ता आणि सृजनशीलता यांच्या वैशिष्ट्यांचा एकत्रितपणे अथवा स्वतंत्रपणे विचार करणारे अभ्यासही महत्त्वाचे आहेत. डनलॅप यांनी बुद्धिमत्ता आणि विशेष क्षमता यांचे सहवर्तित्व तपासले आणि त्यातून तीन गट दाखवून दिले. (१) उच्चकोटिक बुद्धिमत्ता आणि विशेष क्षमता असणारे. (२) उच्चकोटिक बुद्धिमत्ता आहे परंतु विशेष क्षमता नाही, आणि (३) विशेष क्षमता आहे परंतु उच्चकोटिक बुद्धिमत्ता नाही. यामुळे कला, नेतृत्व, अवकाशातील चलन यांतील श्रेष्ठ व्यक्ती श्रेष्ठ बुद्धिमत्तेच्या असतीलच असे मानण्याचे कारण राहिले नाही. यामुळे टर्मनसारख्याच्या अभ्यासातील मूळ निवडीच्याच मर्यादा स्पष्ट झाल्या. सर्वसाधारणपणे अमूर्त विचारक्षमता, तर्कप्रक्रिया, चिकाटी, सावधानता, सूक्ष्म निरीक्षण, आपण होऊन पुढे येण्याची वृत्ती, समीक्षक निर्णयक्षमता आणि इतरांच्या उपयोगी पडण्याची इच्छा ही वैशिष्ट्ये लोकोत्तर व्यक्तींमध्ये आढळतात, यावर अभ्यासकांचे एकमत दिसते. जेम्स डनलॅप यांनी लोकोत्तर व्यक्तींच्या गुणांप्रमाणेच दोषांचेही वर्णन केले आहे. अस्वस्थ, लक्ष न देणारी, भोवतालच्या माणसांना तापदायक वाटणारी, वर्गातील नेमून दिलेला अभ्यास कसा तरी उरकणारी, एकंदरीत पुन्हा पुन्हा सरावाने पाठ करण्याच्या ठोकळेबाज कवायतींना कंटाळणारी, स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल टीकाटिप्पणी करणारी व्यक्तीही उत्तम किंवा लोकोत्तर मानसिक क्षमतेची असू शकते.

या सर्व अभ्यासांमधून अनेक चाचण्याही तयार झाल्या. गेसेलची विकासक्रम चाचणी, मेरियन चाचणी, टॉरन्सची चाचणी, अनेक विशिष्ट क्षमतांच्या आणि आस्थांच्या (इंटरेस्ट्स) चाचण्या मुलांची निवड करण्यासाठी तयार करण्यात आल्या आणि उच्च बुद्धिगुणांक आणि सृजनशीलता यांतील एकत्रितता आणि भिन्नताही स्पष्ट होण्यास मदत झाली.

शिक्षण आणि उपयोजन :लोकोत्तर बुद्धिमत्ता किंवा प्रतिभा असलेली मुले वेगळी काढल्यानंतर त्यांचे शिक्षण कसे असावे, त्यांचे शिक्षक, शिक्षणपद्धती, प्रशासन या प्रत्येक बाबतीत काही ‘वेगळेपण’ कसे साधावे याबद्दलही प्रयोग सुरु झाले. त्या प्रयोगांशी काही विचारप्रणाली किंवा सामाजिक भूमिकाही निगडित झाल्या. शासनाचा हस्तक्षेप, राष्ट्रीय गरजा व व्यक्तीची निवड या प्रत्येक बाबतीत उहापोह करण्याची आवश्यकता लक्षात आली. उदा., एखादी व्यक्ती पुढे कोण व्हावी ही निवड व्यक्तीची स्वतःची की शासनाची ? शिक्षणाने विवेचक शक्ती वाढीस लावून पर्यायांची जाण वाढवण्याचे कार्य करावे की विशिष्ट पर्यायांचे ठसे उमटवण्याचे काम करावे ? प्रतिभावंतांना शिकवणाऱ्या व्यक्ती स्वतः कशा असाव्यात ? त्यांच्याकडून मुलांना काय मिळत असते ? अशा मुलांना वेगळे काढल्यामुळे काही  धोके उत्पन्न होतात काय ? असे प्रश्न वारंवार उपस्थित केले गेले. यामध्ये जगांतील महासत्तांची शस्त्रास्त्रस्पर्धा चालू ठेवण्यासाठी अजाण वयातच मुलांना वळवणे योग्य की अयोग्य हा नैतिक प्रश्नही या संदर्भात उपस्थित झाला. परंतु विविधांगी शिक्षण, अधिक गतीने शिक्षण, मुलांना स्वातंत्र्य आणि प्रयोगशीलतेला संधी देणारे शिक्षण, लवचिकतेवर भर देणारे शिक्षण अशा अनेक नव्या वाटा प्रतिभावंतांच्या शिक्षणासाठी वापरल्या जातात.

या शैक्षणिक प्रयोगातून आणि उपक्रमातून फक्त ‘खास’ मुलांसाठीच खास सोयी करण्याऐवजी एकूणच शिक्षणात अशा लवचिकतेचा वापर असावा ही कल्पना पुढे आली व ठोकळेबाजपणावरचा भर कमी करणाऱ्या पद्धतींचा शोध घेतला गेला.

प्रवाह आणि प्रश्न : विषयशिक्षणाच्या एकूण विचारावर या क्षेत्रातील संशोधनाचा परिणाम दिसून येऊ लागला आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेवर भर देणारे उपक्रम अधिक मोठ्या संख्येने होऊ लागले. मुलांची जिज्ञासा, त्यांनी घेतलेला शोध आणि लावलेला छडा यांना महत्त्व देणारी विचारधारा बळकट होऊ लागली.

प्रगत देशांमध्ये व्यक्तीच्या गरजेनुसार अभ्यासक्रमाची आखणी शक्य झाली. आपापला अभ्यास स्वतंत्रपणे करण्याची मुभाही स्वयंप्रज्ञ मुलांना मिळू लागली. या मुलांना शिक्षकांखेरीज अन्य तज्ञांचे मार्गदर्शन घेणे शक्य झाले. फ्रिट्झ यांच्या अभ्यासात (१९५९) सामान्य चौकटीत ठेवलेल्या विशेष मुलींपेक्षा स्वतंत्र्य दिलेल्या विशेष मुलांची प्रगती सर्व विषयांत अधिक चांगली दिसून आली. मूर यांच्या अभ्यासातून (१९६१) अशा मुलांसाठी सुजाण परिसर निर्माण करणे या शैक्षणिक कार्यावर भर निर्माण झाला. मुलांची नैसर्गिक जिज्ञासा व सुजाण परिसर यांतून अध्ययन शक्य करणारे जास्तीत जास्त अनुभव उपलब्ध करून देणे हेच संस्थांचे उचित कार्य होत, असा हा विचार आहे. त्याला अनुलक्षून मुलांच्या विकास पातळीनुसार या परिसराची निर्मिती करण्याविषयी एकूणच जास्त जागरुक प्रयत्न होऊ लागले. विशेष क्षमतेच्या मुलांना बोद्धिक खाद्य पुरविणे यात शिक्षकांचे कौशल्य आहे हाही विचार शिक्षकांच्या तयारीच्या अनुषंगाने पुढे आला.

याच अभ्यासांमध्ये विशेष क्षमता असणारी मुले आणि त्यांचे खास प्रश्नही लक्षात आले. ही मुले अनेकदा ‘विक्षिप्त’, ‘छांदिष्ट’ असे शिक्के मारून ओळखली जाऊ लागतात. त्यांना समजून घेतले जात नाही. इतर काहींच्या भोवती  उदो उदो करणारी माणसे असतात, तर काहींना भोवतालचे लोक चक्क भितात. त्यामुळे ‘या मुलांचे काय करावे ?’ असा भावविवश प्रश्न अनुत्तरित राहतो.

या ठिकाणी एक दीर्घकालीन विवाद निर्माण झाला आहे. अशा मुलांच्या शिक्षणातून त्यांची घडण कोणत्या प्रकारची व्हावी याविषयी तज्ञांत एकमत नाही. बौद्धिक कौशल्ये, सामाजिक प्राविण्य, नैतिक मूल्ये यांबाबत उचित, स्पष्ट आणि नेमकी उत्तरे मिळत नाहीत, तोवर हे शिक्षण दिशाहीन राहते. शिवाय या मुलांच्या शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्याचा प्रश्नही सर्वसामान्य शिक्षक-प्रशिक्षणाच्या व्यापात मागे पडलेला आहे. अशा मुलांना उत्तरे झटकन कळतात, पण मांडणीची कटकट वाटते, एका जागी बसून अथपासून इतिपर्यंत सर्व काही नीटनेटके सादर करण्याचा ती कंटाळा करतात, धरसोड करतात. स्वतःच्या क्षमता आणि मर्यादा यांचा डोलारा त्यांना आवरायला शिकावे लागते.  एका गोष्टीच्या मागे लागून इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करणे हाही त्यांच्या मार्गात मोठाच आंतरिक अडसर असतो. अशा ‘खास’मुलांच्या ‘खास’ प्रश्नांचा परिणाम शेवटी ही  मुले मागे पडण्यात होतो. त्यांच्या क्षमतेच्या मानाने त्यांची प्रत्यक्ष निर्मिती थिटी राहते. त्याचबरोबर व्यवसायांची निवड आणि तेथील समायोजन यांतही प्रश्न उद्‌भवत राहतात. सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लोकोत्तर बुद्धिमत्तेच्या व्यक्ती शिक्षणक्षेत्राकडे वळतात की नाही हाच आहे. शैक्षणिक क्षेत्रात उच्चकोटिक व्यक्ती नसतील तर या मुलांसाठी होणारे प्रयत्नही चालकांच्या मगदुराशी थांबतील, कदाचित त्या मुलांना अर्थाअर्थी लाभकारकही होणार नाहीत.

पहा : कला- २ बुद्धिमत्ता बुद्धिमान मुलांचे शिक्षण मानसिक कसोट्या सुर्जनशीलता.

संदर्भ : 1. Ellis, Havelock, A Study of British Genius, Boston, 1926.

           2. Galton, Francis, Hereditory Genius, London, 1869.

           3. Gruber, H.E. and others, Ed. Contemporary Approaches to Creative Thinking, New York, 1962.

           4. Hirsh, N. D. M. Genius and Creative Intelligence, Cambridge  (Mass.),1931.

           5. Kenmore, D. The Nature of Genius, Westport, 1960.

           6. Lombroso, Cesare, Trans. The Man of Genius, 5 Vols.,  Stanford (Calif.), 1925 – 59.

वनारसे, श्यामला