पुळण : लाटांच्या भरणकार्यामुळे निर्माण झालेला समुद्रकाठचा भाग. त्यास ‘पुलिन’, ‘वेला’ अशाही इतर संज्ञा रूढ आहेत. लाटांमुळे पुळणीवर वाळू, गारगोट्या, शंख-शिंपले, दगड इत्यादींचे संचयन होत असते. समुद्राला भरती येते, त्यावेळची पाण्याची वरची मर्यादा व ओहोटीच्या वेळची खालची मर्यादा या दोहोंमधील पट्टा म्हणजे पुळण होय. या पट्ट्यावर साठणाऱ्या वाळू, दगड, गारगोट्या इत्यादींचे स्वरूप मूळ खडक, गतकालीन हिमानी क्रिया तसेच सागरातील प्रवाह यांसारख्या गोष्टींवर अवलंबून असते. गारगोटीयुक्त व फेल्स्पारयुक्त खडकांमुळे पुळणीचा रंग अनुक्रमे करडा व तांबूस बनतो, तर खाडीच्या मुखाजवळील पुळण काळसर असते कारण तेथे नदीने वाहून आणलेल्या मातीचे कण मिसळलेले असतात. काही ठिकाणी पुळणीचा काळा रंग मूळ काळ्या ज्वालामुखी खडकांपासून प्राप्त झालेला असतो. हवाई व ताहिती बेटे यांच्याभोवती आढळणाऱ्या पुळणी याच प्रकारच्या आहेत. पुळण जेव्हा वाळूऐवजी दगडाच्या छोट्याछोट्या कपच्यांनी बनलेली असते, तेव्हा तिला ‘शिंगलयुक्त पुळण’ असे म्हणतात. अर्जेंटिना आणि लॅब्रॅडॉर येथील पुळणींमध्ये २०–३० सेंमी. व्यासाचे गोटे आढळतात.
पुळण सर्वसाधारणपणे जमीन व समुद्र यांच्या संपर्कपट्ट्यात आढळत असल्याने, तिचे स्थान सागरजलाच्या चढत्या-उतरत्या पातळीवर अवलंबून असते. सागरपातळी वाढल्यावर नवीन तयार होणारी पुळण आक्रमक समुद्राबरोबर वरवर चढत असते अशा वेळी जुनी पुळण समुद्राच्या पाण्याखाली व पर्यायाने चिखलाखाली गाडली जाते. याउलट समुद्र मागे हटला, तर जुनी पुळण उंचउंच होत जाऊन खालच्या बाजूला नवीन पुळण तयार होते. काठेवाडच्या समुद्रकिनाऱ्यावर असे उंचावलेले पुळणपट्टे आढळतात.
पुळणींवरून लाटांमुळे प्रतिवर्षी सरासरी १,५०,००० ते ६,००,००० घ.मी. वाळू स्थलांतरित होते. अमेरिकेतील अनेक पुळणींवर वालुकादींचा पुरवठा कमी पडून किनारी भागाची धूपही होते. यासाठी वालुकादी द्रव्यांचा कृत्रिम पुरवठा करावा लागतो.
विशाल सागराच्या काठावरील पुळणी मोठ्या आकर्षक असतात. फिरावयासाठी, समुद्रस्नानासाठी, पोहण्यासाठी किंवा निसर्गशोभा पाहण्यासाठी पुळणीवर जाणे, हा मोठा आनंद असतो. लहान मुलांना शंख-शिंपले गोळा करण्यास व मुक्तपणे खेळण्यास तेथे खूप वाव असतो त्यामुळे पुळणींना लागूनच खाद्यपदार्थांची तात्पुरती दुकाने उभी केली जातात. फेरीवाल्यांची वर्दळ तेथे असते. मिआमीसाऱख्या जगप्रसिद्ध पुळणी व भारतातील कळंगूट, कोवलम् येथील पुळणी किनारी पर्यटन केंद्रे म्हणून विकसित झाल्या आहेत.
फडके, वि. शं.
“