पुसाळकर, अच्युत दत्तात्रेय : (२२ नोव्हेंबर १९०५ – ६ जून १९७३). विख्यात भारतविद्यावंत. जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील डोंगर ह्या गावी. शिक्षण एरंडोल, जळगाव आणि पुणे येथे. बी. ए. (१९२७, संस्कृतमध्ये सर्वप्रथम) एम्. ए. (१९२९) ह्या परीक्षांत त्यांना अनुक्रमे अनसूया संस्कृत पारितोषिक आणि मीमांसा विषयाचे जयकर सुवर्णपदक मिळाले. १९३० साली ते एल्एल्.बी. झाले. भास ह्या संस्कृत नाटककारावर प्रबंध लिहून त्यांनी पीएच्.डी. मिळविली (१९४१). शिक्षणोत्तर संन्यास घेऊन धर्मप्रचारास वाहून घेण्याचा त्यांचा संकल्प, त्यांच्यावरील कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांना सिद्धीस नेता आला नाही परंतु अविवाहित राहून सर्व आयुष्य त्यांनी ज्ञानसाधनेत वेचिले.
अल्पकाळ वकिली केल्यानंतर संस्कृत विद्याव्यासंगाच्या ओढीने ते मुंबईच्या ‘भारतीय विद्या भवन’ ह्या संस्थेत आले आणि तेथील सेवाकालात (१९३९-५७) भागवतधर्म ह्या विषयाचे व्याख्याते, भारतीय विद्या ह्या शोधपत्रिकेचे सहसंपादक, उपनिदेशक अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. ह्या संस्थेतर्फे, ख्यातकीर्त भारतविद्यावंत रमेशचंद्र मुजुमदार ह्यांच्या संपादकत्वाखाली निघालेल्या द हिस्टरी अँड कल्चर ऑफ द इंडियन पीपल ह्या महाग्रंथाच्या पहिल्या सहा खंडांचे ते साहाय्यक संपादक होते. ह्या खंडांच्या लेखनातही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. पुढे कलकत्त्याच्या ‘रामकृष्ण मिशन’ ने कल्चरल हेरिटेज ऑफ इंडिया ह्या ग्रंथाच्या (नवी आवृत्ती) पहिल्या दोन खंडांचे (१९५८, १९६२) संपादन त्यांच्याकडे सोपविले. १९६०–१९७१ ह्या कालखंडात पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्यामंदिरात पदव्युत्तर संशोधन विभागाचे संचालक, हस्तलिखित विभागाचे अभिरक्षक (क्युरेटर) आणि सन्माननीय प्राध्यापक अशा विविध नात्यांनी त्यांनी सेवा केली. ह्या संस्थेच्या ॲनल्स ह्या शोधपत्रिकेचे ते सहसंपादक होते. ह्या संस्थेतून निवृत्त झाल्यानंतरही, तिच्या कार्यकारी मंडळावर सरकारनियुक्त सदस्य ह्या नात्याने ते १९७२ पासून होते. अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद, अखिल भारतीय इतिहास परिषद, महाराष्ट्र शासनाची संस्कृत सल्लागार समिती आणि भाषा संचालनालय, गॅझिटियर ऑफ इंडिया, इंडियन सोशॉलॉजिकल सोसायटी आदी संस्थांशी त्यांचा पदाधिकारी वा सदस्य ह्या नात्यांनी निकटचा संबंध होता.
लेखन, संपादन आणि संशोधन असे पुसाळकरांच्या कर्तृत्वाचे त्रिविध रूप आहे. मास : ए स्टडी हा पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेला (१९४०) त्यांचा डॉक्टरेटचा प्रबंध, आणि स्टडीज इन एपिक्स अँड पुराणाज (१९५५) हे पुसाळकरांचे विद्वन्मान्य ग्रंथ त्यांच्या सखोल अभ्यासाची आणि बौद्धिक परिश्रमांची साक्ष देणारे आहेत. द हिस्टरी अँड कल्चर ऑफ द इंडियन पीपल ह्या ग्रंथाचे पहिले सहा खंड त्यांच्या जागरूक आणि चिकित्सक संपादकीय कामगिरीचे द्योतक आहेत. ह्या ग्रंथाच्या काही खंडांतून त्यांनी जी स्वतंत्र प्रकरणे लिहिली आहेत, त्यांतून त्यांच्या चतुरस्त्र व्यासंगाचा प्रत्यय येतो. त्यांनी लिहिलेल्या शोधनिबंधांची संख्या दोनशेच्या जवळपास आहे.
त्यांच्या संशोधनपर लेखनाबद्दल त्यांना मंडलिक सुवर्णपदक (१९३२) भगवान इंद्रजी सुवर्णपदक आणि पारितोषिक (१९३४) मुन्शी सुवर्णपदक (१९४४) मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे रजतजयंती सुवर्णपदक (१९५६) असे सन्मान वेळोवेळी प्राप्त झाले.
१९७१ साली भारत सरकारने ‘संस्कृत पंडित’ म्हणून त्यांचा गौरव केला त्यांना आजीवन मानधन चालू केले. ते स्वतः मात्र प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहिले.
अल्पकालीन आजाराने ते मुंबई येथे निवर्तले.
भट, गो. के.
“