पुलिकत सरोवर : दक्षिण भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांच्या सरहद्दीजवळचे खाऱ्यापाण्याचे सरोवर. लांबी ५० किमी. आणि रुंदी ३ ते १८ किमी. यांदरम्यान आहे. श्रीहरिकोटा या लांबट आकाराच्या बेटामुळे ते बंगालच्या उपसागरापासून अलग झाले आहे. या बेटाच्या पश्चिम काठावरून बकिंगहॅम कालवा जातो. बेटाच्या दक्षिण टोकाजवळ एक छोटासा मोकळा भाग असून, तेथूनच सरोवरातील पाण्याचा समुद्राच्या पाण्याशी संपर्क येतो. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी सरोवरात शिरते. पाण्याचा खारटपणा उन्हाळ्यात वाढतो. सरोवरातून मीठ व प्रॉन

मासे यांचे उत्पादन होते. यात अनेक बेटे असून दक्षिण तीरावर पुलिकत हे शहर आहे.

खांडवे, म. अ.