पुलाबंडी : तमिळनाडू राज्याच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील आधुनिक कालव्यासाठी उल्लेखनीय असलेले ठिकाण. लोकसंख्या १२,२१० (१९७१). मद्रास-तिरुचिरापल्ली या कॉर्ड-रेल्वेमार्गावर हे ठिकाण मद्रासच्या नैर्ऋत्येस सु. ३०० किमी. असून तिरुचिरापल्ली प्रस्थानकाच्या ईशान्येस सु ३३ किमी. आहे. कावेरी त्रिभुज प्रदेशाच्या शिरोभागी असणाऱ्या अपर ॲनिकट या बंधाऱ्यापासून निघणारा डाव्या बाजूचा कालवा पुलांबडीवरून जातो त्याला ‘पुलांबडी कालवा’ असे म्हणतात. पुलांबडी कालवा प्रकल्पाचे काम १९५८–५९ साली सुरू करण्यात आले व दुसऱ्या योजनेतच पूर्ण झाले. या कालव्याची लांबी ८३ किमी. असून त्याद्वारे एकूण सु. ८,६९२ हे. जमिनीस जलसिंचनाचा फायदा होतो. या प्रकल्पात वीज निर्मितीचा समावेश नाही. पुलांबडीच्या आसमंतात आढळणाऱ्या जिप्सम खनिजावर आधारित सिमेंट कारखाना येथून जवळच असणाऱ्या दालमियापुरम् भागात आहे. या कारखान्यामुळे पुलांबडीचे महत्त्व वाढत आहे.
फडके, वि. शं.
“