न्यूयॉर्क राज्य : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी एक संपन्न राज्य. अमेरिकेतील तेरा मूळ वसाहतींपैकी हे एक राज्य आहे. त्याचा अक्षवृत्तीय विस्तार ४०° ३१ उ. ते ४५° उ. व रेखावृत्तीय विस्तार ७१° ५० पश्चिम ते ७९° ४६ पश्चिम असा आहे. विस्तार पूर्व–पश्चिम ५०७ किमी., दक्षिणोत्तर ४८३ किमी. या राज्याच्या आग्नेयीस अटलांटिक महासागर, न्यू जर्सी व पेनसिल्व्हेनिया राज्ये, पश्चिमेस पेनसिल्व्हेनिया, ईअरी सरोवर व कॅनडाचा आँटॅरिओ प्रांत उत्तरेस आँटॅरिओ सरोवर, आँटॅरिओ व क्वीबेक हे प्रांत, सेंट लॉरेन्स नदी आणि पूर्वेस व्हर्‌माँट, मॅसॅचूसेट्स व कनेक्टिकट ही राज्ये आहेत. राज्याचे क्षेत्रफळ १,२८,८९८ चौ. किमी. असून यांपैकी ४,२५६ चौ. किमी. भाग जलाशयांनी व्यापलेला आहे. लोकसंख्या १,८१,२०,००० (१९७५). ऑल्बनी (१,०७,६९० १९७४) ही राज्याची राजधानी आहे.

भूवर्णन : राज्याच्या ईशान्येस साधारणतः ६२० ते १,५५० मी. उंचीचे ॲडिराँडॅक पर्वत असून त्यांत मौंट मार्सी हे सर्वोच्च शिखर १,६५८ मी. उंचीचे आहे. आग्नेयीकडे कॅटस्किल पर्वत असून त्यात स्लाइड हे सर्वोच्च शिखर आहे. त्याच्या दक्षिणेस ६८८ मी. उंचीचे शांगम पर्वत असून पूर्वेकडील पठारी प्रदेशात टॅकॉनिक पर्वतांची ओळ आहे. तिच्या दक्षिणेस हडसन नदीकाठचा तुटलेल्या कड्यांचा उंच प्रदेश आहे. आग्नेय कोपऱ्यात हिमोढसंचयित सखल व सपाट लाँग आयलंड बेट आहे. ॲलेगेनी पठार राज्याच्या दक्षिण भागात असून त्याची सरासरी उंची ४०० मी.वर आहे. वायव्येस ३१० मी. उंचीचे हेल्डरबर्ग डोंगर असून ॲडिराँडॅक पर्वत व ॲलेगेनी पठार यांच्या दरम्यान मोहॉक नदीचा सखल प्रदेश आहे. त्याच्या पूर्वेस हडसन नदीचे खोरे असून ॲडिराँडॅकच्या वायव्येस अरुंद सेंट लॉरेन्स दरी आहे. आँटॅरिओ सरोवराकाठचे सखल दलदलीचे मैदान २५६ किमी. पूर्व–पश्चिम पसरलेले असून त्याच्या व ॲलेगेनी पठाराच्या दरम्यान बोटासारखी चिंचोळी सरोवरे (फिंगरलेक्स) आहेत. मॅनहॅटन, गव्हर्नर्झ व लिबर्टी ही बेटे न्यूयॉर्क उपसागरात असून सेंट लॉरेन्समध्ये थाउजंड आयलंड्स व शँप्लेन सरोवरात व्हॅलकुर ही बेटे आहेत.

मृदा : न्यूयॉर्क राज्यात अनेक ठिकाणी हिमगाळाची सुपीक जमीन आहे. पठारांच्या पायथ्याशी वाहित जमीन असून नद्यांच्या खोऱ्यांत व सरोवरांकाठी सुपीक गाळमाती आहे. राज्यातील ६६% जमीन शेतीला योग्य आहे.

खनिजे : राज्यातील खनिजे विविध प्रकारची असून एमरी, गार्नेट, सैंधव या खनिजांचे उत्पादन देशात सर्वाधिक समजले जाते. यांशिवाय संयुक्त संस्थानांतील ७०% लोहधातुक, ६०% टिटॅनियम ही खनिजे प्रामुख्याने येथे असून दगड, जिप्सम, रेती, वाळू आणि चिकणमाती ही खनिजेसुद्धा मिळतात.

नद्या : राज्यात नऊ प्रमुख नद्या व ८,००० सरोवरे आहेत. हडसन व मोहॉक या दोन नद्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे. जेनेसी आणि ऑस्वीगो या उत्तरेकडे वाहणाऱ्या व आँटॅरिओ सरोवराला मिळणाऱ्या नद्याही महत्त्वाच्या समजल्या जातात. मोहॉक नदी कालव्याने ईअरी सरोवराला मिळते. सेंट लॉरेन्स नदी राज्याच्या उत्तर सीमेवर आहे. डेलावेअर, सस्क्वेहॅना व ॲलेगेनी या दक्षिणवाहिनी नद्या अटलांटिक महासागराला मिळतात. न्यूयॉर्क शहराचा बराचसा पाणीपुरवठा या तीन नद्यांमार्फत भागविला जातो. लाँग आयलंड साउंड व न्यूयॉर्क बे यांना सांधणारी, तर लाँग आयलंड व मॅनहॅटन यांना विभक्त करणारी नदीमुखखाडी ‘ईस्ट नदी’ म्हणून ओळखली जाते.

हवामान : मध्य कटिबंधाच्या खालच्या पट्ट्याच्या सीमेवर राज्याचे स्थान (४०° ते ४५° उ.) असल्याने सर्वसाधारण हवामान सौम्य, आरोग्यदायक व उत्साहवर्धक असते. किनाऱ्यावर ते दमट असून अंतर्गत भागात कोरडे व विषम आढळते. डोंगराळ भागात हिवाळे अतिथंड असून उन्हाळे मात्र आल्हाददायक असतात. वार्षिक पर्जन्यमान १०७ सेंमी. असून हिवाळ्यात हिमवर्षावही होतो. सबंध राज्याकरिता सर्वसाधारण वार्षिक सरासरी तपमान सु. ७·२° से. असून, ॲडिराँडॅक विभागाचे ४·४° से.च्याही खाली, तर न्यूयॉर्क शहराचे ११·७° से. आहे. ॲडिराँडॅकमध्ये सर्वाधिक कडक थंडी आढळते. सबंध राज्यामध्ये उन्हाळ्यात ३७·८° से. एवढे तपमान आणि हिवाळ्यात शून्याखाली तपमान असणे या गोष्टी अपवादात्मकच आहेत. सबंध राज्यात वार्षिक अवक्षेपण प्रमाण भरपूर आहे.

वनस्पती : राज्यातील ४६% भूमी वनाच्छादित असून वनस्पतींच्या सु. १५० विविध जाती आहेत. ॲडिराँडॅक पर्वतप्रदेशात कठीण कवचाची शेवाळी व दगडफूल वृक्ष, तर यापेक्षा खालच्या भागात तसेच कॅटस्किल व टॅकॉनिक पर्वतराजींत स्प्रूस, व्हाइट पाइन, फर व हेमलॉक यांसारख्या सदाहरित वृक्षांच्या तसेच मॅपल, बर्च, बीच या वृक्षांच्या जाती आढळतात. हडसन-मोहॉक क्षेत्रात कठीण काष्ठवने असून त्यांमध्ये रेड सीडार, व्हाइट पाइन व हेमलॉक हे वृक्षप्रकार दिसून येतात. राज्याच्या दक्षिणेकडील भागात ओक, लघुपर्ण पाइन, बर्च, ट्यूलिप, मॅपल, स्वीट गम, लॉरेल यांसारखे वृक्षप्रकार आहेत. बेरी, द्राक्षे, चेरी, सफरचंद, पीच, अलुबुखार इ. फलवृक्षही येथे आहेत.

पाणी : प्राणिसंपदा विविध प्रकारची आहे. शिकारीमुळे जवळजवळ नामशेष झालेल्या जातींमध्ये वाइल्ड टर्की, बिबळ्या वाघ, ऊद मांजर, लांडगा, वुल्व्हरीन, एल्क व सांबर यांचा समावेश होतो. कोल्हा, साळिंदर, रॅकून, चिचुंद्री, ससे, खारी इ. प्राणी विपुल आहेत. सुमारे २६५ जातींचे पक्षी वर्षातील काही काळ या राज्यात राहतात, असा अंदाज आहे. इंग्लिश स्पॅरो, कावळा, सुतारपक्षी व बहिरी ससाणे या पक्ष्यांच्या जाती येथे वर्षभर वास करतात. उन्हाळी पक्ष्यांमध्ये रॉबिन, कॅटबर्ड, ब्लू बर्ड, रेन, चंडोल, ऑरिओल इत्यादींचा, तर शिकारीच्या पक्ष्यांमध्ये अनेक जातींची बदके, तितर, महोका, पाणलावा, वुडकॉक यांचा समावेश होतो. राज्यात माशांच्या सु. ४०० जाती आहेत. यलो पर्च, सनफिश, बॅस, ब्रुक ट्राउट हे ओढे, प्रवाह आणि सरोवरे यांतून आढळतात. पोलक, फ्लाउंडर, ब्लू फिश, ट्यूना, शॅड, तलवार मासा हे समुद्रात आढळतात. लाँग आयलंड हा भाग कालव, खेकडे इत्यादींसाठी विख्यात आहे. पशुपक्ष्यांचे संवर्धन व परिरक्षण यांच्या अनेक योजना कार्यवाहीत आहेत.


इतिहास व राज्यव्यवस्था : येथे आदिवाशी इरोक्वायन इंडियनांच्या पाच जमाती होत्या. इटालियन मार्गनिर्देशक जोव्हान्नी दा व्हेर्रात्सानो (१४८५ ?—१५२८) याने न्यूयॉर्क बंदराचा भाग व हडसन नदीच्या मुखाकडील प्रदेश १५२४ मध्ये प्रथम पाहिला. हडसन नदीप्रदेशाची प्रत्यक्ष पाहणी १६०९ मध्ये डच वेस्ट इंडिया कंपनीसाठी हेन्‍री हडसन या इंग्रजाने केली. त्याच वर्षी साम्युएल द शांप्लँ (१५६७—१६३५) या फ्रेंच समन्वेषकाने उत्तर भागातील, आता त्याचे नाव असलेल्या सरोवराचा शोध लावला. डचांनी १६१४ मध्ये फोर्ट नॅसॉ येथे व्यापारी ठाणे वसविले. ते पुराने उद्‌ध्वस्त झाले. तेव्हा १६२४ मध्ये फोर्ट ऑरेंज हे दुसरे ठाणे स्थापन केले. डचांच्या वसाहतीला ‘न्यू नेदर्लंड्स’ हे नाव होते व तीत लाँग आयलंड आणि मॅनहॅटन बेटांवरच्या तसेच डेलावेअर व कनेक्टिकट नद्यांकाठच्या वस्त्यांचाही समावेश होता. डचांनी १६२९ मध्ये वसाहतीची ‘पट्रून पद्धती’ प्रस्थापित केली. तीनुसार वसाहतकालीन न्यूयॉर्कमध्ये भूधारण उमरावशाही हे एक मोठे वैशिष्ट्य ठरले. ही वसाहत काही फार काळ नीट चालली नाही. १६६४ मध्ये इंग्रजांनी न्यू ॲम्स्टरडॅम बळकावले. या वसाहतीला ब्रिटिशांनी ड्यूक ऑफ यॉर्कवरून ‘न्यूयॉर्क’ हे नाव दिले. न्यूयॉर्क राज्याला १६८९–१७६३ या काळात फ्रेंचांशी व इंडियनांशी अनेक युद्धांमध्ये गुंतावे लागले. परिणामी अठराव्या शतकात पश्चिम न्यूयॉर्क हा भाग म्हणजे ओसाड प्रदेशच राहिला. यांमुळे स्टँप ॲक्ट संमत झाल्यावर न्यूयॉर्कने आपला पहिला विरोध दर्शविला. स्टँप ॲक्ट काँग्रेस १७८५ मध्ये न्यूयॉर्क येथे भरविण्यात आली. न्यूयॉर्क राज्यातील पहिल्या लढाईत ईथन ॲलेन याने टीकाँडरोगा व तेथील किल्ला सर केला. लाँग आयलंडच्या लढाईत मात्र ब्रिटिश सेनापती विल्यम हो याच्याकडून जॉर्ज वॉशिंग्टनला हार सोसावी लागली. हार्लेम हाइट्स (१६ सप्टेंबर) व व्हाइट प्लेन्स या लढायांतही वसाहतवाल्यांना माघार घ्यावी लागली. युद्ध संपेपर्यंत न्यूयॉर्क ब्रिटिशांकडेच राहिले. न्यूयॉर्क राज्याने स्वातंत्र्य घोषित करून किंग्स्टन येथे राजधानी उभारली जॉर्ज क्लिंटन हा या राज्याचा पहिला गव्हर्नर नियुक्त करण्यात आला. सॅराटोगाच्या लढाईने मात्र यशाचे पारडे अमेरिकेकडे झुकले. १६७३ मध्ये डचांनी वसाहत परत जिंकली होती पण पुढच्याच वर्षी ब्रिटिशांनी ती परत जिंकून घेतली. न्यूयॉर्कच्या भौगोलिक स्थानामुळे ब्रिटिशांच्या ११० वर्षांच्या राजवटीत अमेरिकेच्या स्वामित्वासाठी फ्रेंचाशी झालेल्या अनेक लढायांची झळ या प्रदेशाला सोसावी लागली. क्राउन पॉइंट, फोर्ट नायगारा, फोर्ट ऑस्वेगो येथे महत्त्वाच्या लढाया झाल्या. १७६३ मधील पॅरिसच्या तहानंतर राज्याला विकासाची संधी मिळाली. स्वातंत्र्ययुद्धात पुन्हा न्यूयॉर्क रणक्षेत्र बनले. १०२ पैकी ९२ लढाया या राज्यात झाल्या. जॉन्‌स्टनच्या शेवटच्या लढाईने युद्ध संपले. न्यूयॉर्कचे कित्येक वसाहतकरी ब्रिटिशांचे पक्षपाती होते, ते नंतर राज्य सोडून गेले. १७७७ मध्ये राज्यघटना संमत झाली व १७७८ साली न्यूयॉर्क राज्यसंघात प्रविष्ट झाले. नंतरच्या काळात राज्यसंघवादी पक्षाच्या बळामुळे राज्याला राष्ट्राच्या राजकारणात महत्त्व आले. १८१२ साली ब्रिटिशांशी झालेल्या युद्धात भूमीवरच्या बहुतेक लढाया राज्याच्या उत्तर सीमेवर कॅनडाकडे झाल्या. त्या युद्धानंतर वाहतूक सुधारणेच्या निकडीमुळे १८२५ पर्यंत ईअरी कालवा खोदण्यात आला. त्याच्या कडेने होणाऱ्या नव्या वस्तीमुळे आणि लवकरच टाकण्यात आलेल्या लोहमार्गांनी व्यापार अधिक प्रमाणावर होऊ लागला. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस सार्वत्रिक लोकशाहीसाठी चळवळ सुरू झाली. १८२४ मध्ये केवळ मालमत्तेवर आधारलेली मतदानपात्रता घटनादुरुस्तीने रद्द झाली. १८३९–४६ च्या साराविरोधी चळवळीनंतर १८४६ साली मोठ्या अधिकारस्थानांसाठी प्रत्यक्ष निवडणुका चालू झाल्या. व्हॅन ब्यूरेनच्या अध्यक्षीय कारकीर्दीत ‘ऑल्बनी रीजंट्स’ या राजकीय गटाचा उदयास्त घडून आला. ‘मेसन’ या गुप्त संघटनेच्या विरोधी आंदोलने (कोठार जाळणे इ.), नोनयिंग (न जाणे) पक्ष असे राजकीय पंथ काही काळ देशाच्या राजकारणात गाजून गेले. यादवी युद्धप्रसंगी जरी लष्करभरतीविरुद्ध दंगे झाले, तरी सरकारपक्षाला न्यूयॉर्क राज्याने मनुष्यबळ व द्रव्य भरपूर पुरविले. ‘ट्‍वीड् रिंग’, ‘कॅनॉल रिंग’ अशा भ्रष्टाचारी राजकीय टोळ्यांनी सत्तेची मक्तेदारी माजवली. ट्‍वीड् याची टॅमॅनी सोसायटी त्या दिवसात प्रबळ होती. पहिल्या महायुद्धात राज्याने ४,९१,००० लोक पुरविले. विसाव्या शतकात मोठ्या लोकसंख्येमुळे मिळालेले बहुप्रतिनिधित्व व आर्थिक वरचष्मा या साधनांनी राष्ट्रीय राजकारणात न्यूयॉर्कला सतत सत्ता गाजविता आली. वसाहतीच्या सुरुवातीपासूनच ह्यूगेनॉट्स, डच, स्कॉटिश व इतर स्थलांतरितांची संख्या नव्याने येणारे वाढवीत होते. १८४५ च्या आयर्लंडमधील बटाट्याच्या दुष्काळामुळे न्यूयॉर्ककडे लोटणाऱ्या लोकांनी ईअरी कालवा बांधण्यास मदत केली. १८४० आणि १८४५ मधील जर्मनीतल्या क्रांत्यांनी त्या देशातून स्थलांतरितांचे थवे इकडे लोटले होते. पहिल्या महायुद्धाआधीच्या ४० वर्षांत इटालियन, ग्रीक, स्लाव व यूरोपीय मिळून सर्वांत मोठा ओघ या राज्याकडे वळला होता. स्थलांतरितांना प्रवेश देण्याबाबत राष्ट्राने घातलेल्या नव्या निर्बंधांनी त्यांची संख्या मर्यादित झाली, तरी न्यूयॉर्कमध्ये १९५० साली परदेशांत जन्मलेल्या नागरिकांत इटली, रशिया तसेच जर्मनी आणि पोलंड या देशांतील लोकांची संख्या बरीच होती. पहिल्यापासूनच न्यूयॉर्क राज्य हे संघराज्याच्या एकीकरणाच्या बाजूने होते. त्यामुळेच त्याने यादवी युद्धामध्ये एकीकरण कल्पनेला फार मोठे सहकार्य दिले. या यादवी युद्धामुळे न्यूयॉर्क राज्य श्रीमंत बनले. युद्धकार्यासाठी लागणारी शस्त्रास्त्रे व इतर अवजड यंत्रसामग्री यांच्या मागणीमुळे राज्यात औद्योगिकीकरणाला मोठा वेग आला. न्यूयॉर्क राज्याने चेस्टर ए. आर्थर, ग्रोव्हर क्लीव्हलंड व थीओडोर रूझवेल्ट यांना अध्यक्ष म्हणून व्हाइट हाउसमध्ये पाठविले. कधी रिपब्‍लिकन, तर कधी डेमॉक्रॅटिक पक्षाचे प्रशासन राज्याला मिळत गेले. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांदरम्यानच्या काळात डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षांनी आपापले सुधारणावादी प्रशासन राबविले. १९४२ मध्ये टॉमस इ. ड्यूई हा रिपब्‍लिकन राज्याचा गव्हर्नर झाला व या पक्षाकडे सत्ता १९५४ पर्यंत म्हणजे १२ वर्षांपर्यंत टिकून राहिली. १९५४ मध्ये ॲव्हरेल हॅरिमन हा डेमॉक्रॅटिक पक्षाचा गव्हर्नर म्हणून राज्यावर आला. १९५८ मध्ये नेल्सन रॉकफेलर हा रिपब्‍लिकन गव्हर्नर झाला. १९६२ मध्येही आणखी चार वर्षांसाठी त्याची फेरनिवड झाली. राज्यनिर्मितीच्या पहिल्या काही वर्षांतच अमेरिकेच्या सांस्कृतिक जीवनाचे नेतृत्व करण्यास न्यूयॉर्क राज्याला वाव मिळाला. युद्धोत्तर काळात इलेक्ट्रॉनिकी व अणुशक्ती या नव्या उद्योगांच्या विकासात राज्याने नेतृत्व केले. १९५९ मध्ये सेंट लॉरेन्स सागरमार्ग चालू झाला. न्यूयॉर्कची अंतर्गत शासनव्यवस्था बरीचशी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील इतर राज्यांसारखीच आहे.

संविधानाप्रमाणे राज्याच्या सीनेटवर ६०, तर प्रतिनिधिगृहाचे १५० सदस्य असून दोघांचीही मुदत दोन वर्षांसाठी असते. गव्हर्नर व लेफ्टेनंट गव्हर्नर यांची मुदत प्रत्येकी चार वर्षांसाठी असते. देशाच्या काँग्रेसवर २ सीनेटर व ३९ प्रतिनिधी निवडून दिले जातात.

आर्थिक स्थिती : सुपीक जमीन, अनुकूल हवामान आणि वर्धमान नागरी बाजारपेठा या घटकांच्या योगे न्यूयॉर्क राज्यातील शेती हा किफायतशीर उद्योग ठरला आहे. जरी शेतांची संख्या व लागवड क्षेत्रप्रमाण यांमध्ये घट झाली असली, तरी कृषि-उत्पादनाचे प्रमाण नेहमीच मोठे राहिलेले आहे. उत्पादनमूल्याच्या दृष्टीने दुग्धशाळा उत्पादनांचा सर्वांत वरचा क्रमांक असून त्यानंतर गुरे, बटाटे व अंडी यांचा क्रम लागतो. १ जानेवारी १९७६ रोजी राज्यात ५८,००० शेते आणि एकूण क्षेत्र ४६,१३,३५२ हे. होते. सरासरी एका शेताचे क्षेत्र ७९·७ हे. एवढे होते (१९७४). मका, हिवाळी गहू, ओट व गवत ही राज्यातील महत्त्वाची पिके होत. १९७५ साली पिके व पशुपालन यांपासून १५४·५ कोटी डॉ. एवढे उत्पन्न मिळाले तर दुग्धशाळा उद्योगापासून ८५·१६ कोटी डॉ. (२१,५०० शेते या उद्योगात गुंतली होती) उत्पन्न मिळाले. राज्याचा सफरचंदे, द्राक्षे, टार्ट चेरी या फळांच्या उत्पादनात देशामध्ये दुसरा, तर मॅपल मध उत्पादनात पहिला क्रमांक लागतो (१९७५). इतर फळांमध्ये पीच, नासपती, अलुबुखार, स्ट्रॉबेरी, राझ्‌बेरी तसेच कोबी, कांदे, बटाटे व मॅपल साखर यांचे उत्पादन होते. १९७६ मध्ये राज्यात १९·१५ लक्ष गुरे ९·१६ लक्ष दूध देणाऱ्या गाई ७०,००० मेंढ्या ९०,००० डुकरे आणि १०६·५ लक्ष कोंबड्या एवढे पशुधन होते.


राज्याची खनिज साधनसंपत्ती ही विपुल व औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाची आहे. तिसांहून अधिक खनिजांचे उत्खनन व व्यापारी दृष्ट्या उत्पादन होत असून त्यांमध्ये पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, चुनखडक, संगमरवर, ग्रॅनाइट, संगजिरे व शंखजिरे, बेसाल्ट, शिसे व जस्त, पायराइट, स्लेट, ग्रॅफाइट, फेल्डस्पार, क्वॉर्ट्‍‍झाइट, लोहखनिज, गार्नेट, एमरी, मँगॅनीज इत्यादींचा अंतर्भाव होतो. पेट्रोलियम व नैसर्गिक वायूचे साठे प्रचंड प्रमाणावर ईअरी, जेनेसी, मॅडिसन व मन्‍रो परगण्यांमध्ये आहेत. लवण साठे ऑनंडागा, जेनेसी, वायोमिंग, लिव्हिंग्स्टन, येट्स इ. परगण्यांमध्ये हजारो चौ. किमी. क्षेत्रात पसरलेले असल्याने मीठ उत्पादन हा या राज्याचा आघाडीच्या उद्योगांपैकी एक ठरला आहे. १८८० च्या सुमारास एकट्या न्यूयॉर्क राज्यात सबंध देशाच्या एकूण लोहखनिज उत्पादनापैकी १५% उत्पादन होत होते. एमरी, गार्नेट, संगजिरे, टिटॅनियम काँसेंट्रेट यांच्या उत्पादनात राज्याचा सबंध देशात पहिला क्रमांक लागतो. १९७३ मध्ये खनिज उत्पादनमूल्य ३७·५८ कोटी डॉ. एवढे झाले.

उद्योग : विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती, कच्चा माल व उत्पादित माल यांच्या ने-आणीकरिता उत्कृष्ट वाहतूक मार्ग मोठ्या लोकसंख्येमुळे राज्यानेच पुरविलेले पुरेसे श्रमिकबल, तसेच या राज्याच्या नेत्यांमध्ये दिसून आलेले साहस व कल्पनाशक्ती ह्या सर्व घटकांच्या संयोगाने न्यूयॉर्क राज्य हे अमेरिकेतील सर्व राज्यांमध्ये निर्मिति-उद्योगांचे मोठे केंद्र बनले आहे. त्यामुळे १८३० पासूनच औद्योगिक उत्पादनाची व्याप्ती, विविधता व मूल्य या तिन्ही दृष्टींनी न्यूयॉर्क राज्य देशात अग्रेसर औद्योगिक राज्य गणले जाऊ लागले. राज्याच्या निर्मितिउद्योगांमध्ये प्रक्रिया उद्योगाला फार महत्त्व आहे. उत्पादनमूल्याच्या दृष्टिकोनातून मुद्रण व प्रकाशन उद्योगांचा वरचा क्रम लागतो, त्यानंतर वस्त्रोद्योग व तदानुषंगिक उद्योग येतात. त्यांपाठोपाठ विद्युत् यंत्रसामग्री व यंत्रे यांचे निर्मितिउद्योग, अन्नपदार्थ व तदानुषंगी उद्योग, रसायने व तत्संबंधित इतर उत्पादने, छायाचित्रण व अन्य उपकरण उद्योग, वाहतूकसाधन उद्योग, धातुजोडकाम उद्योग असे उद्योगांचे वर्गीकरण करतात. १९७५ मध्ये राज्यात ३५,००० उत्पादनसंस्था आणि १४,२४,३२७ कामगार होते. त्याच वर्षी निर्मितिउद्योगांतील कामगारांचे सरासरी साप्ताहिक उत्पन्न २४१ डॉ. होते. राज्यातील बहुतेक वीज बाष्पजनित असते. जलविद्युत्‌शक्ति-उत्पादनक्षमता प्रचंड असली, तरी तिचा म्हणावा तेवढा विकास झालेला नाही. १९६५ मध्ये अधिष्ठापित १७४·६३ लक्ष किवॉ. विद्युत्‌निर्मितिक्षमतेपैकी इंधनसंयंत्रांपासून निर्माण झालेली वीज १३४·४० लक्ष किवॉ., तर जलविद्युत्‌ ४०·३३ लक्ष किवॉ. होती. औद्योगिक क्षेत्रातील अग्रेसरत्व या राज्याने श्रमबलाच्या विभाजनातही राखल्याचे दिसून येते. निर्मितिउद्योगात इतर कोणत्याही उत्पादनक्षेत्रापेक्षा अधिक प्रमाणात श्रमबल गुंतलेले आहे. १९६७ मध्ये त्याची टक्केवारी पुढीलप्रमाणे होती : निर्मितिउद्योग २७·२ घाऊक व किरकोळ व्यापार २०·१ सेवाउद्योग १८·१ शासकीय क्षेत्र १५·४ वित्त, विमा व स्थावर संपदा ७·७ वाहतूक, संदेशवहन व लोकोपयोगी सेवाउद्योग ७·१ बांधकाम उद्योग ४·१ खाणकाम ०·१. अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबर ही सर्वांत मोठी व महत्त्वाची कामगारसंघटना असून, १८८६ मध्ये सॅम्युएल गाँपर्स हा तिचा अध्यक्ष झाला, तेव्हापासून न्यूयॉर्क सिटी कामगार नेत्यांनी राष्ट्रीय कामगार चळवळीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.

न्यूयॉर्क राज्याचा सबंध राष्ट्रामध्ये बँकव्यवसाय, विमा व इतर आर्थिक घडामोडी यांसंबंधात पहिला क्रम लागतो. न्यूयॉर्क शहर तर शेअर, रोखे व बंधपत्रे, विमा व इतर अनेक वस्तूंच्या बाजारांचे राष्ट्रातील प्रमुख केंद्रच समजले जाते. राज्याची पहिली बँक न्यूयॉर्क येथे १७८४ मध्ये स्थापन झाली. किमान १०० कोटी डॉ. ठेवी असणाऱ्या १५ मोठ्या व्यापारी बँका न्यूयॉर्क शहरात आहेत. एवढी मोठी संख्या असणारे राष्ट्रातील हे एकमेव राज्य आहे. राज्यातील तीन मोठे शेअरबाजार न्यूयॉर्क शहरातच आहेत.

वाहतूक व संदेशवहन : १९७६ मध्ये राज्यात ८,०२४ किमी. लोहमार्ग, ५३९ विमानतळ व कालव्यांची एकूण लांबी ८४३ किमी. होती. यांपैकी एकट्या ईअरी कालव्याची लांबी ५८१ किमी. आहे. तेलनळांची लांबी ३,१२० किमी. होती (१९७५). १९७५ मध्ये या कालव्यांतून २० लक्ष टन मालवाहतूक झाली. १९७५ मध्ये राज्यातील नगरपालिकीय व ग्रामीण रस्त्यांची एकूण लांबी १,७४,८२७ किमी. होती. न्यूयॉर्क स्टेट थ्रूवे हा न्यूयॉर्क शहरापासून बफालो शहरापर्यंत जाणारा ९०१ किमी. लांबीचा हमरस्ता सर्वांत महत्त्वाचा समजतात. ऑल्बनी शांप्लँ (क्वीबेक) हा २८३ किमी.चा पथकररहित हमरस्ता पूर्ण झाला आहे. १९७५ मधील नोंदणीकृत मोटारगाड्यांची संख्या ८२,०४,११६ होती. त्यांपैकी ६६,७२,६४६ गाड्या खाजगी परवानाधारकांच्या होत्या. १९७५ साली राज्यात डाकघरे १,६३४ दूरध्वनियंत्रे १,२९,०२,३०० (यांपैकी ८९,७१,३०० घरगुती) नभोवाणी केंद्रे १६१ (ए एम्.) व ११३ (एफ् एम्.) दूरचित्रवाणी केंद्रे खाजगी व सार्वजनिक अनुक्रमे २९ व ११ होती (१९७४). वृत्तपत्रांत (१९७६) दैनिके ७७, साप्ताहिके ३९६ व रविवार आवृत्त्या २४ होत्या.

लोक व समाजजीवन : १९७५ मध्ये रोमन कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट एपिस्कोपल चर्च (सदस्य अनुक्रमे ६३,४८,१३२ आणि ४,८२,०९५) व ज्यू लोकांची चर्च (सदस्य २१,५०,३८५–१९७३) ही प्रमुख प्रार्थनामंदिरे होती. १९७० मधील जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या १,८२,४१,२६६ होती पैकी गोरे व निग्रो यांची संख्या अनुक्रमे १,५८,३४, ०९० आणि २१,६८,९४९ अशी होती. राज्याचे दरडोई उत्पन्न ६,५६४ डॉ. होते (१९७५).

शिक्षण : अमेरिकन क्रांतीनंतर अल्पावधीतच राज्याने अतिशय विस्तारित आणि प्रगतिशील शिक्षणपद्धतीचा हळूहळू विकास करीत आणला आहे. ७–१६ वर्षे वयोगटातील शिक्षण सक्तीचे व मोफत आहे. १९७५ मध्ये सार्वजनिक प्राथमिक शाळांतून १७,४८,४१९ सार्वजनिक माध्यमिक शाळांतून १६,५७,५९६ विद्यार्थी आणि २,०३,७८४ शिक्षक होते. उच्च शिक्षण राज्यातील २८५ संस्थांमधून (पैकी ८४ सार्वजनिक व २०१ खागजी नियंत्रणाखाली) दिले जाते. विद्यार्थ्यांची संख्या १०·७७ लक्ष होती (१९७५–७६). न्यूयॉर्क शहरात ९ विद्यापीठे व अन्य शहरांत ९ अशी राज्यात एकूण १८ विद्यापीठे होती (१९७५).


समाजकल्याण : १९७५ मध्ये राज्यात कल्याणकारी योजनालाभ १४·६० लक्ष लोकांना (सरासरी लाभ १०० डॉ. प्रतिमास), वैद्यकीय साहाय्यलाभ ११·५१ लक्ष लोकांना (सरासरी २६१ डॉ.) आणि १२·१७ लक्ष अवलंबी मुलांना साहाय्य लाभ (सरासरी ९९ डॉ.) मिळाला. १९७६ मध्ये राज्यात ३३२ रुग्णालये (८२,१३७ खाटा), ५४९ शुश्रूषालये (६७,७५० खाटा) व २३२ इतर वैद्यकीय सेवासंस्था (२६,८६५ खाटा) होत्या. मनोरुग्णालये व तशाच इतर संस्थांमध्ये मिळून ४९,३०० मनोरुग्ण होते. वैद्य ४५,०२६ (१९७४), दंतवैद्य १३,९१३ (१९७६) व परिचारिका १,२५,७९४ (१९७२) होत्या. ऑगस्ट १९७६ मध्ये राज्यात १७,४०० कैदी तुरुंगात होते. तसेच राज्यात ६६,८८० पोलीस (पैकी केवळ न्यूयॉर्क शहरासाठी ३३,४०१) होते. १९६३–७५ या काळात मृत्युदंड देण्यात आला नाही. १९७५ मध्ये राज्यातील गुन्हा प्रमाण १ लक्ष लोकसंख्येमागे ८५६·४ असे होते.

महत्त्वाची स्थळे : न्यूयॉर्कखेरीज राज्यातील दुसरे मोठे शहर बफालो (४,३८,६२० १९७४) हे ईअरी कालव्यावर असून ते पश्चिमेकडील अंतिम स्थानक आहे. ते न्यूयॉर्कप्रमाणेच जहाजउद्योग व वाहतूक, रेल्वेवाहतूक आणि निर्मितिउद्योग यांचे मोठे केंद्र आहे. रॉचेस्टर (२,८४,६७०) हे प्रवेशबंदर, औद्योगिक व शेतमालाचे वितरण केंद्र असून येथील जॉर्ज ईस्टमन छायाचित्रणगृह सुविख्यात आहे. सिरॅक्यूज (१,८४,९२०) विविध महत्त्वाच्या उद्योगांचे केंद्र आणि मध्य न्यूयॉर्क राज्याची शेतमालाची घाऊक बाजारपेठ आहे. येथे सिरॅक्यूज विद्यापीठ असून न्यूयॉर्क राज्य जत्राही भरते. याँकर्स (२,०४,०००) या हडसन नदीवरील शहरात जगप्रसिद्ध ओटिस एलिव्हेटर वर्क्स कंपनीचा प्रमुख कारखाना असून तेथे उच्चालक यंत्रे, केबली व याऱ्या यांचे उत्पादन होते. ऑल्बनी (१,०७,६९०) हे राज्याचे राजधानीचे शहर आणि शिक्षण, उद्योग, दळणवळण यांचे केंद्र असून येथील वार्षिक ट्यूलिप फुलांच्या उत्सवामुळे हे प्रवाशांचे आकर्षण बनले आहे. उटिका (८७,६००) हे मोहॉक नदीवरील कापडउद्योगाचे प्रमुख शहर असून येथे विविध उद्योगधंदे विकसित झाले आहेत. दुग्धशाळा उद्योग आणि ट्रकशेती हे येथे मोठ्या प्रमाणावर चालतात. वेस्ट पॉइंट येथे राष्ट्रीय सैनिकी प्रबोधिनी आहे. व्यापारी नौकानयन प्रशाला, अनेक शास्त्र, विद्या तंत्रशिक्षणाच्या संस्था, संशोधन संस्था, प्रचंड ग्रंथालये, अद्वितीय वस्तु – व कला-संग्रहालये, कलावीथी, संगीतवृंद, विविध उद्याने व उपवने इत्यादींनी तसेच राजकीय, आर्थिक, औद्योगिक नेतृत्व या वैशिष्ट्यांनी न्यूयॉर्क राज्य सबंध राष्ट्रात अग्रेसर आहे.

ओक, शा. नि. गद्रे, वि. रा. भागवत, अ. वि.