पुरावनस्पतिविज्ञान : वनस्पतींच्या ⇨जीवाश्मांचे (शिळारूप अवशेषांचे ) अध्ययन करून गत भूवैज्ञानिक काळातील वनस्पतींविषयी माहिती मिळविणारे विज्ञान. पुरावनस्पतिविज्ञान हे ⇨पुराजीवविज्ञानाची एक शाखा असून ⇨पुराप्राणिविज्ञान ही त्याची दुसरी शाखा आहे. या दोन्ही शाखा एकमेकींशी निगडित असून त्यांची मौलिक तत्वे सारखीच आहेत. भूवैज्ञानिक पद्धतींचा उपयोग करून गाळाच्या खडकांची व त्यांच्यात असलेल्या जीवाश्मांची वये ठरविली जातात आणि पूर्वीच्या निरनिराळ्या कालखंडांत पृथ्वीवर कोणकोणते जीव असत व ते कोणत्या अनुक्रमाने अवतरले हे कळते. उलट खडकांचे भूवैज्ञानिक वय व खडक कोणत्या परिस्थितीत निर्माण झाले, हे ठरविण्यासाठी जीवाश्मांचा उपयोग होतो म्हणून पुराप्राणिविज्ञान, पुरावनस्पतिविज्ञान व भूविज्ञान ही एकमेकांशी निगडित व परस्परांस पूरक अशी विज्ञाने आहेत.
पुरावनस्पतिविज्ञानाचा इतिहास वनस्पतींच्या किंवा प्राण्यांच्या जीवाश्मांकडे मनुष्याचे लक्ष प्राचीन काळीही गेलेले होते व तेव्हापासून त्यांच्या उत्पत्तीविषयी निरनिराळ्या कल्पना सुचविल्या गेल्या होत्या पण आधुनिक विज्ञानांची थोडी प्रगती होईपर्यंत त्यांचे वास्तविक स्वरूप कळणे शक्य नव्हते. जीवाश्मांविषयी जुन्या कल्पना नाहीशा होऊन जीवाश्म हे गतकालीन जीवांचेच अवशेष आहेत, ही गोष्ट अठराव्या शतकातील बहुतेक वैज्ञानिकांस मान्य झालेली होती पण ते ज्या गाळाच्या खडकांत आढळतात ते खडक कसे निर्माण झाले याची यथातथ्य कल्पना त्यांना नव्हती पौराणिक व धार्मिक ग्रंथात वर्णन केलेल्या महाप्रलयाच्या वेळी पाण्यातला गाळ साचून ते तयार झालेले आहेत अशी त्यांची कल्पना होती. निरनिराळ्या काळी तयार झालेल्या गाळाच्या खडकांच्या थरात निरनिराळे जीवाश्म असतात व जीवाश्मांच्या साहाय्याने खडकांचा काळ ठरविता येतो असा विल्यम स्मिथ यांचा शोध १८०० सालाच्या सुमारास प्रसिद्ध झाल्यावर मात्र जीवाश्मांच्या अध्ययनाची प्रगती वेगाने झाली. त्यांचा उपयोग मुख्यत भूविज्ञानात व खडकांची वये ठरविण्यासाठी केला जात असे. प्राणिविज्ञानाच्या किंवा वनस्पतिविज्ञानाच्या दृष्टीने म्हणजे जीवाश्म ज्यांचे अवशेष आहेत त्या जीवांचे शारीर (शरीररचना), आकारविज्ञान, भौगोलिक वाटणी, परिस्थितीविज्ञान, जातिविकास इत्यादींची माहिती मिळविण्यासाठी त्यांचे अध्ययन केले जात असे. वनस्पतिजीवाश्मांचे तसे अध्ययन प्रथम फ्रान्समधील आदॉल्फ ब्रॉन्यार (१८०१-७६) यांनी केले. जीवाश्मी वनस्पतींचे वर्गीकरण, त्या वनस्पतींची भौगोलिक वाटणी, गतकालीन व आजच्या वनस्पतींची तुलना इत्यादींविषयीचे महत्त्वपूर्ण लेख त्यांनी प्रसिद्ध केले म्हणून त्यांना पुरावनस्पतिविज्ञानाचे जनक समजतात. त्यांच्याशी समकालीन अशा आर्. एच्. गोपर्ट (जर्मनी), एच्. ओस्टव्हाल्ट (स्वित्झर्लंड), एल्. लेकेर (अमेरिकेची संयुक्त संस्थाने) व त्यांच्या पुढील पिढीतील ए. जी. नॉर्थोस्ट (स्वीडन), जे. डॉसन (कॅनडा), एफ्. एच्. नोल्टन व ई. डब्ल्यू. बेरी (अमेरिकेची संयुक्त संस्थाने) आणि अलीकडील ओ. फीस्टमँडल, एच्. एन्. अँड्रूज, सी. ए. आर्नल्ड इत्यादींच्या कार्यानेही पुरावनस्पतिविज्ञानात विपुल व महत्वाची भर पडलेली आहे. भारतातील बिरबल सहानी, के. आर्. सुरंगे, त्र्यं. शं. महाबळे, डी. सी. भारद्वाज, एम्. एन्. बोस, एल्. जे शॅलोम, टी. के. त्रिवेदी इत्यादींचे या शाखेतील संशोधनही उल्लेख करण्याजोगे आहे. बिरबल सहानी यांनी स्थापन केलेली व त्यांच्याच नावाने ओळखण्यात येणारी लखनौ येथील पुरावनस्पतिवैज्ञानिक संशोधन संस्था जगात नावाजलेली आहे. [⟶सहानी, बिरबल रुचिराम].
वनस्पति-जीवाश्मांच्या निर्मितीस अनुकूल परिस्थिती वनस्पती मेल्यावर त्यांची शरीरे कीटकांच्या, सूक्ष्म किंवा इतर जीवांच्या भक्ष्यस्थानी पडून वा वणव्यामुळे जळून नाहीशी होतात पण दलदलीत, सरोवरात, नद्यांच्या काठाशी किंवा नद्यांच्या मुखाशी पाण्याबरोबर आलेला बारीक गाळ वेगाने साचत असेल अशा किंवा ज्वालामुखी राखेचा वर्षाव होत असेल अशा क्षेत्रात वनस्पतिज पदार्थ लवकर पुरले जातात व त्यांचे जीवाश्म होण्यास अनुकूल अशी परिस्थिती असते. पर्वता-पठारावरील दलदलीत किंवा सरोवरात गाळ साचण्यास व वनस्पतिज पदार्थ पुरले जाण्यास अनुकूल परिस्थिती असली, तरी कालांतराने पर्वत-पठारांचे क्षरण (धूप) होऊन त्यांचा नाश होतो. उंच प्रदेशांच्या मानाने सखल प्रदेशात साचलेले गाळ टिकून राहण्याचा संभव अधिक असतो. आपणास उपलब्ध झालेल्या जीवाश्मांपैकी पुष्कळसे जीवाश्म सखल प्रदेशातील वनस्पतींचेच असतात. उंच प्रदेशातील झाडेझुडुपे पाण्याबरोबर वाहत येऊन सखल प्रदेशात पुरली जाण्याचा संभव असतो पण वाहतुकीमुळे त्यांची बरीच मोडतोड झालेली असते. उंच प्रदेशांतील वनस्पतींच्या मानाने सखल प्रदेशातील वनस्पतींचे पुष्कळच अधिक व सुस्थितीत असलेले जीवाश्म उपलब्ध झालेले आहेत.
वनस्पति-जीवाश्मांचे प्रकार वनस्पतींच्या शरीरातील टिकाऊ भागच जीवाश्मांच्या रूपात शिल्लक राहतात. त्यांपैकी सर्वांत टिकाऊ म्हणजे ज्यांच्या भोवती मेणाचे पातळ पुट असते अशी बीजुके(सूक्ष्म प्रजोत्पादक घटक) व ⇨पराग होत. कवची फळे, बीजे व काष्ठे बरीच टिकाऊ असतात. फले लवकरच नाश पावतात आणि त्यांचे जीवाश्म विरळाच आढळतात.
गाळात पुरले गेलेले वनस्पतिज पदार्थ गाळाच्या भाराने कमी अधिक प्रमाणात दडपले जातात व पुरले गेल्यावरही सूक्ष्मजीवांच्या व गाळात मुरणाऱ्या पाण्याच्या क्रिया त्यांच्यावर होतात. त्यामुळे त्यांच्या रासायनिक संघटनात फेरफार होतात. जो जो अधिक काळ लोटेल तो तो फेरफारांचे मान अधिक होते.
पाण्याच्या गोठणबिंदूपेक्षा नेहमी कमी तापमान असणाऱ्या ध्रुवीय प्रदेशातील चिखलात कित्येक सहस्त्र वर्षांपूर्वी पुरल्या गेलेल्या वनस्पतींचे ताज्या स्थितीत राहिलेले तुकडे कधीकधी आढळतात. कॅलिफोर्नियाच्या खनिज डांबर असलेल्या भागातील कित्येक खडकांत डांबर मुरलेले आहे. डांबराच्या पूतिरोधक (सूक्ष्मजंतूंचा नाश करण्याच्या वा त्यांची वाढ होण्यास प्रतिबंध करण्याच्या) गुणामुळे पुरले गेलेले वनस्पतिज पदार्थ फारसे कुजले नाहीत. काष्ठांचे तुकडे, बीजे, पाने इत्यादींचे जवळजवळ मूळच्यासारखे रासायनिक संघटन असलेले जीवाश्म त्या खडकांत सापडतात पण अशी उदाहरणे फारच विरळा आढळतात. ज्यांची मूळची घटना पूर्णपणे किंवा जवळजवळ मूळच्यासारखी टिकून राहिलेली आहे असे जीवाश्म आढळत नाहीत, असे म्हटले तरी चालेल. वनस्पतींच्या जीवाश्मांचे सामान्यत आढळणारे प्रकार पुढील होत
(१)कार्बनीभूत अवशेष पाने, काष्टमय खोडे किंवा फांद्या इत्यादींचे कार्बनीभवन होऊन तयार झालेले व मुख्यत कार्बनमय अवशेष, गाळाचे दडपण पडून मूळचे अवशेष कमीअधिक विकृत झालेले असतात व अशा जीवाश्मांस ‘संपीडिते’ असे नाव कधीकधी देतात.
(२) साचे, ठसे व प्रतिकृती मूळ वनस्पतिज पदार्थ पार नाहीसे होऊन त्यांचे साचे किंवा ठसे मात्र शिल्लक राहतात. त्यांच्यावरून मूळच्या पदार्थाचे आकार व आकारमान ही कळतात पण संरचना व रासायनिक संघटन कळत नाहीत. अपघटन (घटक अलग होणे), विद्रावण (एखाद्या द्रवात विरघळणे) इ. क्रियांमुळे मूळचे पदार्थ नाहीसे झाल्यावर ज्या पोकळ्या उरतात त्या कधीकधी मागाहून मुरणाऱ्या पाण्यातील द्रव्ये साचून भरल्या जातात व मूळ पदार्थाच्या प्रतिकृती तयार होतात. प्रतिकृतीची रचना व रासायनिक संघटन मूळच्या पदार्थांहून भिन्न असतात.
(३)अश्मीभूत जीवाश्म यांचे आकार, आकारमान व संरचना मूळच्या वनस्पतिज पदार्थासारखीच असतात पण मूळच्या घटकांची जागा एखाद्या निराळे रासायनिक संघटन असणाऱ्या खनिजाने, उदा., खोडांच्या काष्टमय उतकांची (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांची ) जागा ओपलने (SiO2.nH2O) घेतलेली असते. खडकांत मुरणाऱ्या पाण्यात कधीकधी एखादे द्रव्य बऱ्याच प्रमाणात विरघळलेले असते. असे पाणी वनस्पतिज पदार्थातील पोकळ्यात हळूहळू साठविले जाते व वनस्पतींचे घटक व पाण्यातील द्रव्य यांची कणाकणाने अदलाबदल होऊन मूळच्या घटकाच्या जागी खनिज द्रव्य स्थापित होते. अश्मीभूत जीवाश्म अशा प्रतिष्ठापनाने तयार होतात. त्यांचे पातळ छेद घेऊन सूक्ष्मदर्शकाने त्यांचे परीक्षण करता येते व छेदात दिसणाऱ्या रचनेवरून मूळ पदार्थाची रचना कळून येते. अश्मीभवनाने स्थापित होणाऱ्या खनिजांपैकी मुख्य म्हणजे सिलिका, कॅल्साइट, पायराइट व लोही ऑक्साइडे होत.
नैसर्गिक क्रिया मद गतीने होत असल्यामुळे प्रतिष्ठापन नेहमी पूर्ण झालेले असते असे नाही. पाण्यातील द्रव्ये साचून पोकळ्या भरल्या गेल्या, तरी विशेषसे प्रतिष्ठापन न होणे व वनस्पतिज पदार्थ तसेच टिकून राहणे शक्य असते. ते पदार्थ पाण्याने निक्षेपित झालेल्या (साक्याच्या स्वरूपात साचलेल्या) खनिजात बुडालेले असतात व त्यांच्या रचनाही टिकून राहिलेल्या असतात. योग्य ते तंत्र वापरून जीवाश्मातील खनिज काढून टाकले, उदा.,लाकडाचा ओपलमय जीवाश्म हायड्रोफ्ल्युओरिक अम्लात बुडवून त्याच्यातील ओपल काढून टाकले, म्हणजे त्याच्यातील स्पंजासारखा सच्छिद्र पदार्थ शिल्लक रहातो. त्याचे व त्याच्या छेदांचे परीक्षण करून मूळच्या वनस्पतिज पदार्थाचे स्वरूप ठरविता येते.
वनस्पति-जीवाश्म असणारे शैलसमूह (शैलसमूह म्हणजे खडकांच्या राशी). जमिनीवर किंवा जमिनीलगतच्या क्षेत्रात तयार झालेल्या गाळाच्या खडकांत वनस्पति-जीवाश्म सामान्यत सापडतात. चूर्णीय शैवल किंवा वाहत आलेली खोडे यांच्यासारखे क्वचित आढळणारे अपवाद वगळले, तर सागरी गाळांच्या खडकांत वनस्पति-जीवाश्म विरळाच आढळतात.
अश्मीभूत वने वृक्षांची अश्मीभूत खोडे विपुल असलेले खडक काही क्षेत्रात उघडे पडलेले असतात, त्या क्षेत्रांना कधीकधी अश्मीभूत वने म्हणतात. एकानंतर काही काळाने एक अशा रीतीने ज्वालामुखींच्या राखेचा आणि भरड चुऱ्याचा वर्षाव होऊन त्यांच्याखाली एकामागून एक पुरली गेलेली तृतीय कल्पातील (सु. ६.५-१.२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) विसाहून अधिक वने उत्तर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील वायोमिंग प्रदेशातील यलोस्टोन पार्क नावाच्या राष्ट्रीय उद्यानात, लामार नदीच्या दक्षिणेकडील बाजूवर पाहावयास मिळतात. त्यांच्यातील बहुतेक अश्मीभूत खोडे मूळच्या जागीच उभी आहेत. त्याच देशातील ॲरिझोनाच्या ‘पेंटेड’ वाळवंटात ट्रायासिक कल्पातील (सु. २३-२० कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) वृक्षांची, मुख्यत शंकुमंतांची [⟶कॉनिफेरेलीझ] लहान,मोठी व प्रचंड आकारमानांची अश्मीभूत खोडे असणारे वालुकाश्म व ⇨पिंडाश्मउघडे पडलेले आहेत. हे जीवाश्म मूळ जागी असलेल्या खोडांचे नसून पाण्याबरोबर वाहत येऊन गाळात इतस्तत पुरल्या गेलेल्या खोडांचे आहेत ते जीवाश्म आढळतात त्या क्षेत्रात वन नव्हते. [⟶अश्मीभूत वन].
दगडी कोळसा असलेल्या किंवा त्याच्या तळाशी किंवा माथ्याशी असलेल्या थरात कधीकधी पुष्कळ वनस्पति-जीवाश्म सापडतात. जमिनीवर साचलेल्या गाळाच्या कित्येक खडकांत विशेषतः दगडी कोळसा असलेल्या खडकांत सूक्ष्म आकारमानाच्या बीजुकांचे व परागकणांचे सुस्थितीत असेलेले विपुल जीवाश्म सापडतात. [⟶सूक्ष्मपुराजीवविज्ञान].
दगडी कोळशाचे चेंडू(कोल बॉल्स). उत्तर अमेरिकेतील व यूरोपातील कार्बॉफेरस व पर्मियन (सु. ३५-२४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात तयार झालेल्या बिट्युमेनी दगडी कोळशाच्या थरांत किंवा त्यांच्यावर बसलेल्या गाळाच्या थरात गोल, गोलसर किंवा वेड्यावाकड्या आकाराची व वाटाण्यासारख्या गोळीपासून तो काही टन वजन भरेल एवढ्या आकारमानाची धोंड्यासारखी संचिते सापडतात. ‘कोल बॉल्स’ असे नाव असले, तरी त्याच्यात दगडी कोळसा नसतो. ते मुख्यत कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट व लोही सल्फाइड यांचे बनलेले असतात. जळण म्हणून ते निरुपयोगी असतात. ते कठीण असल्यामुळे कोळसा खणून काढताना त्यांचा उपद्रव होतो. पुष्कळशा दगडी कोळशाच्या चेंडूंत वनस्पतींच्या अवयवांचे अश्मीभूत जीवाश्म असतात.
जीवाश्मी वनस्पतींचे वर्गीकरण वर्गीकरणासाठी नैसर्गिक लक्षणांवर आधारलेल्या कसोट्या शक्य तितक्या वापरावयाच्या असा वनस्पतिवैज्ञानिकांप्रमाणेच पुरावनस्पतिवैज्ञानिकांचा प्रयत्न असतो. मूळच्या वनस्पतींचे काही व बहुधा थोडे भागच जीवाश्म रूपाने उरत असल्यामुळे त्यांचे वर्गीकरण करणे अवघड आणि कधीकधी अशक्य असते. आधुनिक वनस्पतींची सर्व अंगोपांगे, सलग पाहावयास मिळतात पण जीवाश्मात मूळ वनस्पतींचे काही भागच राहिलेले असतात. वनस्पती जिवंत असताना त्यांचे पाने, फुले, फळे इ. अवयव अधूनमधून गळून पडत असतात. मेल्यावरही त्यांचे असे अवयव खोडापासून वेगळे होतात. बहुतेक सर्व वनस्पति-जीवाश्म अशा अलग झालेल्या अवयवांचे असतात. ज्यांच्यात मूळ वनस्पतींचे सर्व किंवा बरेचसे अवयव सलग टिकून राहिलेले आहेत, असे जीवाश्म सामान्यत मिळत नाहीत. शिवाय, वनस्पतींची खोडे व गळून पडणारे पानासारखे भाग ही एकाच क्षेत्रात पुरली जातात असेही नाही. काही थरांत केवळ पानांचेच जीवाश्म असतात व त्यांची खोडे कशी होती याबद्दल पुरावा मिळत नाही. एखाद्या खडकात निरनिराळ्या प्रकारच्या पानांचे व खोडांचे जीवाश्म असले, तर कोणत्या प्रकारच्या खोडावर कोणत्या प्रकारची पाने असत हे निश्चित सांगता येत नाही. फुलांचे जीवाश्म विरळात आढळतात आणि वर्गीकरणासाठी त्यांचा पुरावा सामान्यत मिळू शकत नाही.
एखाद्या खडकात एकाच जातीच्या वृक्षांच्या खोडांचे, मुळांचे, पानांचे, फुलांचे, फळांचे किंवा बियांचे असे पाच प्रकारचे जीवाश्म असले म्हणजे ते अलग अलग असल्यामुळे त्यांचे संबंध सिद्ध करता येत नाहीत म्हणून त्या प्रत्येकाला वेगवेगळे नाव म्हणजे एकाच वनस्पतीला पाच नावे द्यावी लागतात. कोणत्या अवयवावरून नाव दिले गेले याचा खुलासा पर्ण-वंश, खोड-वंश इ. संज्ञा वापरून केला जातो. उदा., गलॉसोप्टेरीस, ॲलेथॉप्टेरीसस अन्युलॅरिया ही पर्ण-वंशांची म्हणजे पानाच्या जीवाश्मांवरून ठरविलेल्या वंशांची नावे होत. कॅलॅमाइटस[⟶कॅलॅमाइटेलीझ] हे खोड-वंशांचे व कॉर्डाइकार्पस हे बीज-वंशाचे नाव आहे. भारतातील उत्तर गोंडवनी संघातील राजमहाली थरांत सायकॅडेऑइडेलीझ यांच्या पुष्कळ वंशांच्या पानांचे, खोडांचे आणि थोड्या फुलांचे जीवाश्म सापडतात. त्यांपैकी एकाच वंशाच्या निरनिराळ्या प्रकारच्या जीवाश्मांचे संबंध निश्चित ठरविता आलेले नाहीत. बकलँडिया[⟶बेनेटाइडेलीझ] हे त्याच्या खोडांच्या, टायलोफायलम हे पानांच्या व विल्यमसोनिया हे फुलांच्या जीवाश्मांचे नाव आहे.
जीवाश्मी वनस्पतींचे वर्गीकरण हे मुख्यत जीवाश्मात आढणाऱ्या अंगोपांगांच्या शारीरिक लक्षणांवर रचलेले असून त्याची सामान्यत प्रचारात असलेली योजना पुढे दिलेली आहे.
जीवाश्मी वनस्पतींच्या वर्गीकरणाची योजना
अ.क्र. |
प्रकार |
१. |
थॅलोफायटा |
अ)शैवले |
|
आ) कवक |
|
2. |
ब्रायोफायटा (शेवाळी) |
3. |
ट्रॅकिओफायटा |
(।) सायलोप्सिडा |
|
(1) ) सायलोफायटेलीझ * |
|
(2) सायलोटेलीझ |
|
(॥) लायकोप्सिडा (1) लेपिडेडेंट्रेलीझ* (2) प्ल्यूरोमिएलीझ* (3) लायकोपोडिएलीझ |
|
(।॥) स्फेनॉप्सिडा |
|
(1)हेनिएलीझ * (2)स्फेनोफायलेलीझ* (3)कॅलॅमाइटेलीझ* (4)एक्विसीटेलीझ |
|
(।v) टेरोप्सिडा |
|
(१)फिलिसिनी |
|
(1) सीनॉप्टेरिडेलीझ* |
|
(2) फिलिकेलीझ |
|
(२) जिग्नोस्पर्मी (प्रकटबीजी) |
|
(अ) कॉर्डाइटेलीझ* |
|
(आ) टेरिडोस्पर्मी * |
|
(3) सायकॅडेऑइडेलीझ* किंवा बेनेटाइटेलीझ* (4) सायकॅडेलीझ (5) गिंकोएलीझ (6) कॉर्निफेरेलीझ (ए) केटोनिएलीझ* |
|
(v) अँजिओस्पर्मी (आवृत्तबीजी) (अ) एकदलिकित (आ) द्विदलिकित |
[अँअशी खूण असलेले गट निर्वंश झालेले आहेत].
वनस्पतींची भूवैज्ञानिक काळातील वाटणी जीवाश्मयुक्त खडकांपैकी सर्वांत जुन्या खडकांत साध्यासुध्या वनस्पतींचेच जीवाश्म आढळतात. अधिक विकसित व गुंतागुंतीच्या रचना असणाऱ्या वनस्पतींचे जीवाश्म अधिक नव्या खडकांतच आढळतात. प्रारंभीच्या साध्या वनस्पतींपैकी व त्यानंतरच्या निरनिराळ्या कालखंडांत अवतरलेल्या अधिक विकसित वनस्पतींपैकी कित्येक आजही टिकून आहेत
पण कित्येक निर्वंश झालेल्या आहेत. आज आढळणाऱ्या वनस्पतींचे काही गट प्राचीन तर काही मधल्या काळात व काही सापेक्षत अलीकडील काळात अवतरलेले आहेत. पूर्वीच्या एके काळी भरभराटीस असलेल्या पण ऱ्हास होऊन निर्वंश होण्याच्या पंथास लागलेल्या काही वनस्पतीही आज आढळतात परंतु आता प्रामुख्याने आढळणाऱ्या वनस्पती अतिशय विकसित व अतिशय जटिल (गुंतागुंतीची) संरचना असणाऱ्या गटांतील आहेत. सारांश, वनस्पतिसृष्टीचे स्वरूप स्थिर राहिलेले नसून काळाच्या ओघात फेरफार होत राहून आजच्यासारख्या वनस्पती निर्माण झाल्या आहेत. जीवाश्मांपासून मिळणारा पुरावा क्रमविकास (उत्क्रांती) सिद्धांताला पुष्टी देणारा आहे.
वनस्पतींच्या प्रमुख गटांचा इतिहास थॅलोफायटा (कायक वनस्पती). या गटातील जवळजवळ सर्व वनस्पतींची शरीरे मऊ व सहज नाश पावणाऱ्या पदार्थांची बनलेली असतात व जीवाश्मरूपाने टिकू शकत नाहीत. कार्बनमय पदार्थांच्या ठिपक्यासारख्या किंवा छप्प्यासारख्या अनिश्चित राशीच्या स्वरूपात त्यांचे अवशेष क्वचित आढळतात. सागरी शैवलांच्या काही थोड्या जाती (चूर्णीय शैवले) कॅल्शियम कार्बोनेट स्त्रवू शकतात. रीफ-चुनखडक निर्माण करण्यात प्रवाळांशिवाय चूर्णीय शैवलांचेही पुष्कळ अंग असते, असे अलीकडील रीफ-चुनखडकांच्या परीक्षणावरुन कळून आलेले आहे व पूर्वीच्या काळीही ते तसेच असले पाहिजे. कित्येक सागरी चुनखडकांत, विशेषत: रीफ-चुनखडकांत, त्यांच्या चूर्णीय भागांचे पुष्कळ जीवाश्म आढळतात. वनस्पतींच्या गटांपैकी सर्वात जुना व अखंड टिकून राहीलेला गट म्हणजे चूर्णीय शैवलांचा गट होय व त्या गटाच्या पूर्वजांचे जीवाश्म कँब्रियन काळाच्या (सु. ६०–५१कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या) पुष्कळ आधीच्या काळातील चुनखडकांत सापडलेले आहेत. या गटातील काही कुले कँब्रियन-पूर्व काळापासून आधुनिक काळापर्यंत टिकून राहिलेली आहेत. [→कायक वनस्पति].
करंडक कुल : (डायाटम). या गोड्या किंवा खाऱ्या पाण्यात राहणाऱ्या सूक्ष्म शैवलांच्या सिलिकामय कवचांचे जीवाश्म जुरासिक काळाच्या (सु. १८.५-१५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) आधीच्या खडकांत आढळलेले नाहीत. क्रिटेशस (सु. १४–९ कोटी वर्षांपूर्वीच्या कल्पानंतरच्या कालखंडात त्यांची कवचे साचून तयार झालेले प्रचंड थर आढळलेले आहेत. [→डायाटम].
कारेसी : (कांड-शरीरिका वर्ग). खाऱ्या पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती. कॅल्शियम कार्बोनेट स्त्रवण्याचा गुण यांच्या अंगी असतो व शरीराभोवती पातळ लेप बसून तयार झालेल्या त्यांच्या चूर्णीय सांगाड्यांचे जीवाश्म कित्येक असागरी खडकांत आढळतात. यांची ‘फळे’ (रंदुक) अगदी बारीक (रेतीच्या कणाएवढी) असतात व त्यांच्या पृष्ठावर सर्पिल किंवा उभ्या, समांतर कंगोऱ्या-खोबणींसारखी नक्षी असते व तिच्या स्वरूपावरून त्यांचे वंश ठरविले जातात. क्रिटेशस किंवा नंतरच्या काळातील खडकांत कारेसीचे पुष्कळ जीवाश्म आढळतात. उत्तर ट्रायासिक व उत्तर कार्बॉनिफेरस काळांतील कारेसीच्या काही वंशांचे जीवाश्म मिळालेले आहेत व डेव्होनियन कल्पातही (सु. ४०–३६.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातही) त्यांचे काही वंश असावेत. [→ शैवले].
नेमॅटोफायटेलीझ : एकमेकांत गुरफटलेल्या, उभ्या, बारीक नळ्यांच्या जुडग्यांसारखे शरीर असणाऱ्या व ज्यांचे वनस्पतिसृष्टीतील संबंध निश्चित ठरविता येत नाहीत, अशा सिल्युरियन (सु. ४२–४० कोटी वर्षांपूर्वीच्या) व डेव्होनियन काळातील वाहिनीहीन (पाणी व अन्नरसाची ने-आण करणारे शरीर घटक नसणाऱ्या) वनस्पतींचा समावेश या गटात केला जातो. यांच्या नळ्यांचे बाह्य पृष्ठ क्युटिनीकृत (क्युटिन नावाच्या स्निग्ध पदार्थांच्या मिश्रणाच्या थराने युक्त ) असे. यांच्यापैकी काहींच्या बीजुकांचे जीवाश्म मिळालेले आहेत. त्या बीजुकांना टणक आवरणे (भित्ती) असत. इंग्लंडातील पूर्व डेव्होनियन कालीन खडकांत या गटातील नेमॅटोथॅलस या वनस्पतीचे जीवाश्म अगदी पातळ पानासारखे आढळतात. गॅस्पे द्वीपकल्पातील डेव्होनियन कालीन खडकांत आढळलेले प्रोटोटॅक्साइटांचे (= नेमॅटोफायकस = नेमॅटोफायटॉन यांचे ) सिलिकाभूत जीवाश्म मोठ्या सु. एक मीटर व्यासाच्या अश्मीभूत खोडांसारखे दिसतात. नेमॅटोफायटेलीझ यांच्याविषयी मिळणारी माहिती इतकी अपुरी आहे की, ते जलीय शैवलांपैकी आहेत ती त्यांचा स्वतंत्र गट होता, हे सांगता येत नाही.
कवक : (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती). उत्तर डेव्होनियन कल्पातील आदिम वाहिनीवंत वनस्पतींच्या अश्मीभूत जीवाश्मांत त्या वनस्पतींच्या ऊतकांवर वाढलेल्या कवकतंतूंचे आणि बीजुकांचे सुस्थितीत राहिलेले जीवाश्म स्कॉटलंडातील ऱ्हायनी चर्टांत (अगदी सूक्ष्म स्फटिकांच्या सिलिकामय घट्ट खडकांत) व इंडियानातील न्यू आल्बनी शैलात [→ शेल] मिळालेले आहेत. हे कवकांचे सर्वात जुने जीवाश्म होत पण कवक त्या कल्पाच्या पुष्कळच आधी अवतरलले असले पाहिजेत. डेव्होनियन कल्पाच्या नंतरच्या काळातील वनस्पति-जीवाश्मांतही कवकांचे तसेच जीवाश्म आढळलेले आहेत पण कवकांचे जीवाश्म विरळाच आढळतात आणि त्यांची उत्पत्ती किंवा विकास कसा झाला याचा उलगडा होईल, असे जीवाश्म मिळालेले नाहीत. [→कवक].
ब्रायोफायटा : (शेवाळी). जमिनीवर राहणाऱ्या आजच्या वनस्पतींपैकी सर्वांत साध्या वनस्पती. त्यांची शरीरे अतिशय नाजूक पदार्थांची असल्यामुळे त्यांचे जीवाश्म फारच विरळा आढळतात. ⇨ शेवाळांच्या जीवाश्मांप्रमाणे सकृतदर्शनी दिसणाऱ्या पुराजीव महाकल्पातील (सु. ६०–२४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) कित्येक पदार्थांना पॉलिओहेपॅटिका, मार्केटाइटस इ. नावे दिली गेली आहेत पण ते शेवाळांचेच जीवाश्म आहेत असे म्हणता येत नाही. निश्चित शेवाळांचे असे पुराजीव महाकल्पातील जीवाश्म म्हणजे इंग्लंडातील उत्तर कार्बॉनिफेरस काळातील खडकांत आढळणारे हेपॅटायटिसाचे होत. जे निश्चित ⇨ यकृतका गटातील वनस्पतींचे आहेत पण ज्यांचे खरे वंश ठरविता येत नाहीत, अशा सर्व जीवाश्मी वनस्पतींचा समावेश हेपॅटिसायटिस या शारीर वंशात केला जातो.
ज्याच्यात जननांगे (प्रजोत्पादक अवयव) चिकटून राहिलेली आहेत असा पुराजीव महाकल्पातील हेपॅटिसायटिसाचा एकही जीवाश्म मिळालेला नाही पण जीवाश्मांच्या शाकीय रचनांवरून ते ॲनॅक्रोजीनस जुंगरमॅनिएलीझ यांच्याशी संबद्ध अशा वनस्पतींचे असावेत असे दिसते. त्याच काळातील फ्रान्समधील खडकांत गुसाइट नावाच्या खऱ्या ⇨ हरितांच्या दोन जातींचे जीवाश्म मिळालेले आहेत पण ते इतके छिन्नविच्छिन्न आहेत की, त्यांची आजच्या हरितांशी तुलना करता येत नाही.
मध्यजीव महाकल्पातील (सु. २३–९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) शेवाळांचेही फारच थोडे जीवाश्म आढळलेले आहेत. त्यांपैकी महत्त्वाचे म्हणजे इंग्लंडातील ट्रायासिक कल्पाच्या अखेरच्या काळातील नायडिटा होय.
नवजीव महाकल्पातील (गेल्या सु. ६.५ कोटी वर्षांतील) विशेषतः उत्तर गोलार्धातील प्लाइस्टोसीन (सु. ६ लाख – ११ हजार वर्षांपूर्वीच्या ) काळातील खडकांत शेवाळांच्या कित्येकशे जातींचे विपुल जीवाश्म आढळलेले आहेत पण ते बहुतेक आधुनिक वंशांतील आहेत.
निश्चित शेवाळांचे असे सर्वांत जुने जीवाश्म उत्तर कार्बॉनिफेरस कल्पातील होत. त्यांचे यकृतका व हरिता हे स्वतंत्र गट त्या काळापासून चालत आलेले आहेत. कार्बॉनिफेरस कल्पाच्या आधीच्या शेवाळांचे जीवाश्म मिळालेले नाहीत, पण त्यांचे पूर्वज त्या कल्पाच्या पुष्कळ आधी अवतरले असले पाहिजेत. वाहिनीवंत वनस्पतींच्या उत्पत्तीविषयीचे प्रश्न सोडविण्यासाठी ज्यांचा उपयोग होईल, अशा शेवाळांचे जीवाश्म मिळालेले नाहीत.
सायलोप्सिडा : (१) सायलोफायटेलीझ : वाहिनीवंत वनस्पतींपैकी सर्वांत जुन्या, लहान आकारमानाच्या व दलदलीत किंवा पाण्याशेजारच्या दमट जमिनीवर वाढणाऱ्या ओषधी [→ओषधि] ऑस्ट्रेलियातील उत्तर सिल्युरियन व यूरोपातील अनेक ठिकाणच्या मध्य व पूर्व डेव्होनियन काळातील खडकांत ⇨ सायलोफायटेलीझ यांचे जीवाश्म सापडलेले आहेत. डेव्होनियन काळाच्या अखेरीस सायलोफायटेलीझ निर्वंश झाल्या. सागरी वनस्पतींचा विकास होऊनच सायलोफायटेलीझ निर्माण झाल्या असल्या पाहिजेत पण त्या कशा व केव्हा निर्माण झाल्या हे दाखविणारे जीवाश्म मिळालेले नाहीत.
(२) सायलोटेलीझ : आता उष्ण कटिबंधात आढळणारी सायलोटम व न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया इत्यादींत आढळणारी मेसिप्टेरिस यांचा समावेश या गणात होतो. ⇨ सायलोटेलिझांचे उत्तर तृतीय कल्पाच्या आधीचे जीवाश्म मिळालेले नाहीत परंतु त्या प्राचीन सायलोफायटेलिझांच्या वंशज असण्याचा संभव आहे.
लायकोप्सिडा : या गटातील आता शिल्लक राहिलेल्या वनस्पती आकारमानाने क्षुद्र अशा ओषधी आहेत पण डेव्होनियन व कार्बॉनिफेरस कल्पांत या गटातील कित्येक जातींचे वृक्षही असत. द्वितीयक ऊतके तयार होऊनच त्या वृक्षांच्या खोडांची जाडी वाढत असे. प्राचीन लायकोप्सिडांपैकी सर्वांत जुन्या अशा बाराग्वानाथियाचे जीवाश्म ऑस्ट्रेलियातील सिल्युरियन कालीन खडकांत व तिच्यापेक्षा किंचित नव्या अशा ड्रेपॅनोफायकसाचे जीवाश्म कॅनडातील, जर्मनीतील व नॉर्वेतील पूर्व व मध्य डेव्होनियन कालीन खडकांत सापडलेले आहेत. उत्तर कार्बॉनिफेरस काळात लायकोप्सिडांचा परमोत्कर्ष झाला. लहानशा झुडपांपासून तो ३०–४५ मी. वाढणाऱ्या व सु. १.५ मी. जाडीची खोडे असणाऱ्या वृक्षांपर्यंतच्या अनेकविध लायकोप्सिडा उत्तर कार्बॉनिफेरस काळी असत. त्यांच्यापैकी मुख्य म्हणजे लेपिडोडेंड्रान व सिजिलॅरिया होत. उत्तर अमेरिकेतील. आणि यूरोपातील दगडी कोळशाच्या थरात लायकोप्सिडांचे विपुल जीवाश्म सापडतात. कार्बॉनिफेरस कल्पानंतर काष्ठमय लायकोप्सिडांचा ऱ्हास वेगाने झाला व जुरासिक कल्पात त्या नाहीशा झाल्या. [→लायकोपोडिएलीझ लेपिडोडेंड्रेलीझ].
प्ल्यूरोमिएलीझ गणातील प्ल्यूरोमिया [→आयसॉटेलीझ] नावाच्या एकाच वंशाचे जीवाश्म आतापर्यंत मिळालेले आहेत आणि ते जर्मनीतील व पूर्व आशियातील ट्रायासिक कल्पाच्या खडकांत आढळलेले आहेत. या प्रेक्षणीय वनस्पती सिजिलॅरियासारख्या दिसत. त्यांच्या खोडाला फांद्या नसत आणि खोड २ मी. उंचीपर्यंतच वाढत असे. खोडाच्या माथ्याशी गवतासारख्या पानांचा झुबका असे. प्ल्यूरोमियाची बहुतेक लक्षणे वृक्षलक्षणी सिजिलॅरिया व तृणसम आयसॉएटिस यांच्या लक्षणांच्या मध्यम प्रकारची असत.
स्फेनॉप्सिडा : यांच्या खोडास अनेक पेरी व खोडांच्या पृष्ठावर सामान्यतः उभे समांतर दांडारे असतात. पाने आखूड व रेखाकृती असून खोडाभोवती मंडलाकृती रचिलेली असतात. खोडावर पानांची एकावर एक अशी मंडले असतात. यांच्यापैकी एव्किसीटम हा एकच वंश शिल्लक राहिलेला आहे. [→एव्किसीटेलीझ ].
(१) हेनिएलीझ : या लहानशा वनस्पतींच्या हेनिया व कॅलॅमोफायटॉन या दोनच मध्य डेव्होनियन कालीन वंशाचे जीवाश्म मिळालेले आहेत.
(२) स्फेनोफायलेलीझ : यांच्या स्फेनोफायलम या एकाच वंशाचे जीवाश्म मिळालेले आहेत. आयुःकालावधी कार्बॉनिफेरसआणि पर्मियन कदाचित डेव्होनियन कल्पात असाव्यात. [→स्फेनोफायलेलीझ].
(३) कॅलॅमाइटेलीझ : या एक्विसीटमासारख्या पण काष्ठमय वनस्पती उत्तर डेव्होनियन कल्पात अवतरल्या व उत्तर कार्बॉनिफेरस कल्पात त्यांचा परमोत्कर्ष झाला. त्या काळी त्यांचे सु. १८ मी. पर्यंत उंची व १.५ मी. पर्यंत व्यासाची खोडे असणारे वृक्ष असत. द्वितीयक ऊतक तयार होऊन खोडाची जाडी वाढत असे. आजच्या एक्विसीटमाप्रमाणे यांची खोडे पोकळ असत. कॅलॅमाइटेलीझांचा ऱ्हास वेगाने होऊन जुरासिक कल्पाच्या अखेर त्या निर्वंश झाल्या. [→कॅलॅमाइटेलीझ].
टेरोप्सिडा: (१) प्राचीन नेचे : (सीनॉप्टेरिडेलीझ). यांच्या खोडांची अंतर्रचना व बीजुकधारक इंद्रियांची व्यवस्था आधुनिक नेचां-हून भिन्न असत. यांचा अवतार डेव्होनियन कल्पात आणि परमोत्कर्ष कार्बॉनिफेरस कल्पात झाला पण नंतर वेगाने ऱ्हास होऊन पर्मियन कल्पाच्या अखेरीस त्यांचे बहुतेक सर्व प्रकार निर्वंश झाले. आजच्या ऑफिओग्लॉसेसीपैकी व
मॅरॅटिएसीपैकी काही प्राचीन नेचांचे वंशज असण्याचा संभव आहे [→ऑफिओग्लॉसेलीझ]. डेव्होनियन आणि पूर्व कार्बॉनिफेरस काळातील नेचे मुख्यतः ⇨सीनॉप्टेरिडेलीझ व तत्सम गटातील होते. उत्तर कार्बॉनिफेरस काळात मॅरॅटिएलीझ यांची संख्या बरीच वाढली व ऑस्मुंडेसी, शिझीएसी व ग्लायकेनिएसी ही नेचांची कुले अवतरून त्यांची वाढ होत गेली. मध्यजीव महाकल्पात त्यांच्यामागून मॅटोनिया−डिप्टेरिस गटातील व त्यांच्या मागून डिक्सोनिया गटातील नेचे अवतरले. आजच्या पॉलिपोडिएसी कुलातील नेचे अलीकडेच म्हणजे तृतीय कल्पाचा प्रारंभ होण्याच्या सुमारास अवतरलेले आहेत.
(२) आधुनिक नेचे : (फिलिकेलीझ). या लहान वनस्पती दाट वनातील उंच वृक्षांच्या पायाजवळच्या जमिनीवर वाढत असलेल्या आढळतात. त्यांचा गट बराच प्राचीन आहे. कार्बॉनिफेरस कालीन खनिज कोळसा तयार झाला त्या काळातील दलदली वनांतही त्यांचे पूर्वज वंश असत. त्यांचा उगम कार्बॉनिफेरस काळी झाला आणि त्यानंतर त्यांची थोडी प्रगती झाली पण मध्यजीव महाकल्पाच्या प्रारंभापासून त्यांचा गट विशेष फेरफार न होता आतापर्यंत तसाच टिकून राहिलेला आहे. [→नेचे].
कॉर्डाइटेलीझ : पुराजीव महाकल्पातील वृक्षी व प्रकटबीज वनस्पतींचा गण. ह्यातील सर्वांत महत्त्वाचा वंश कॉर्डाइटस होय. कार्बॉनिफेरस काळातील वनांत कॉर्डाइटसांचे विपुल वृक्ष असत. त्यांपैकी कित्येकांची उंची जवळजवळ ३३ मी. व खोडाचा व्यास ०.७५ मी. असे. पाने पट्टीसारखी लांब व अरुंद आणि पानांच्या शिरा त्यांच्या लांबीस समांतर असत (‘कॉर्डाइटेलीझ’ या नोंदीतील आकृती पहा). फुलोरा लोंबत्या कणसासारखा असे. बीजे शंकूत असत पण ती शंकुमंतांप्रमाणे [→ कॉनिफेरेलीझ ] शंकुशल्कांवर नसून आखूड फांद्यावर वाढत. दाटीने वाढलेल्या बारीकशा शल्कपर्णामधून (खवल्यासारख्या पानामधून) बाहेर पडणाऱ्या लांब व बारीक फांद्यांना लघुबीजुककोश चिकटलेले असत व त्यांच्यात परागकण असत. या गणाचा आयुःकालावधी डेव्होनियनाच्या अखेरीपासून पूराजीव महाकल्पाच्या अखेरीपर्यंत होता. त्यानंतरच्या काळात त्या अस्तित्वात असल्याचा निश्चित पुरावा नाही.[→कॉर्डाइटेलीझ].
बीजी नेचे : (टेरिडोस्पर्मी). नेचांसारखी पाने परंतु निश्चित बीजे असणाऱ्या वनस्पतींचा प्राचीन गट. दगडी कोळसा असणाऱ्याि कारबॉनिफेरस कालीन थरात नेचांच्या पानांसारख्या पानांचे विपुल जीवाश्म आढळतात. ते नेचांचे असावेत अशी कल्पना प्रारंभी होती पण अधिक अध्ययन झाल्यावर त्यांचे यर्थाथ स्वरूप कळून आले. कार्बॉशनिफेरस आणि पर्मियन कालीन थरांत नेचाच्या पानांसारख्या पानांचे जे जीवाश्म आढळतात ते बहुधा बीजी नेचांचे असतात व थोडेच नेचांचे असतात. डेव्होनियन काळात बीजी नेचे अवतरले, कारबॉनिफेरस व पर्मियन कल्पात ते विपुल झाले, नंतर र्हारस होत जाऊन जुरासिक कल्पाच्या मध्यास ते नाहीसे झाले. [→ बिजी नेचे ].
सायकॅडऑइडेलीझ : (बेनेटाइटेलीझ). यांची पाने व खोडाची अंतर्रचना ही आजच्या सामान्य सायकॅडांसारखी पण फुलोरे मात्र सायकॅडापेक्षा अगदी भिन्न प्रकारचे आणि फुलांसारखे असत. ते खोडांच्या बाजूवर व पर्णतलांच्या बगलेतून उगवत. प्रजोत्पादक इंद्रिय फुलासारखे असे. मध्यजागी असणाऱ्या बीजुक-पुष्पासनाभोवती केसरदलांचे कडे असे. मध्यजीव महाकल्पात त्यांचा अतिशय उत्कर्ष झाला पण तो महाकल्प संपण्याच्या आधीच ते नाहीसे झाले. [→ बेनेटाइटेलीझ ].
सायकॅडेलीझ : (सायकॅड्स). या गटातील अनेक वनस्पती आजही उपोष्ण व उष्ण कटिबंधातील देशांत आढळतात. त्या सायकॅडऑइडेलिझांसारख्या असतात पण प्रजोत्पादक इंद्रिये सायकॅडऑइडेलिझांपेक्षा अगदी निराळ्या प्रकारची म्हणजे शंकूसारखी व आधुनिक शंकुमंतांच्या शंकूंशी बरेच साम्य असणारी अशी असतात. पर्मियन कल्पाच्या अखेरीस सायकॅडेलीझ अवतरले. मध्यजीव महाकल्पात त्यांचा अतिशय उत्कर्ष झाला पण जुरासिक कल्पानंतर त्यांना उतरती कळा लागली. मध्यजीव महाकल्पास विशेषतः जुरासिक कल्पास सायकॅडांचे युग असे म्हणण्याचा प्रघात आहे पण त्या काळात सायकॅडऑइडेलीझही तसेच विपुल असत, म्हणून त्या काळाला सायकॅडऑइडेलीझांचा काळ म्हणणेही उचित ठरेल. [→ सायकॅडेलीझ ].
गिंकोएलीझ : गिंको (मेडन हेअर ट्री) हा या गटातील एकच वंश व त्याची एकच जाती शिल्लक राहिलेली आहे आणि ती चीन व जपान यांच्या काही भागांत आढळते पण मध्यजीव महाकल्पात या वंशतील इतर पुष्कळ जाती असत. [→ गिंकोएलीझ ].
कॉनिफेरेलीझ : (शंकुमंत गण). आजच्या प्रकटबीजींपैकी सर्वांत विपुल व अधिक प्रसार असलेल्या वनस्पती शंकुमंतांच्या गणातील आहेत. त्या मुख्यतः वृक्ष असून त्यांची पाने सुईसारखी किंवा खवल्यासारखी असतात व बीजे शंकूत असतात. शंकुमंतांचे थोडे आद्य वंश कार्बॉनिफेरस काळात अवतरले होते, पण काही काळाने ते लुप्त झाले. ट्रायासिक कल्पात शंकुमंताचा उत्कर्ष होण्यास सुरुवात होऊन त्यांची संख्या व प्रसार ही वाढू लागली. मध्यजीव महाकल्पाच्या अखेरीपर्यंत त्यांची भरभराट चालू होती. त्यानंतर त्यांना उतरती कळा लागली. आवृतबीजींच्या [फुलझाडांच्या → वनस्पति, आवृतबीज उपविभाग] स्पर्धेमुळे त्यांचा अपकर्ष झाला असावा.
सर्वांत जुने शंकुमंत साधारणपणे आजच्या शंकुमंतांसारखे, विशेषतः आजच्या ⇨ॲरॉकॅरियासारखे दिसत पण त्यांचे स्त्री-शंकू आजच्या शंकुमंतांहून अगदी वेगळ्या प्रकारचे व कॉर्डाइटेलिझांच्या स्त्री-शंकूप्रमाणे स्पष्ट संयुक्तरूपी असत. शंकूच्या अक्षावर छदे असत आणि त्या छदांच्या बगलेत बारीकशी पुष्पे म्हणजे फलिष्णू प्ररोह असत. आखूडशा अक्षावर वंध्य शल्क व बीजुकपर्णे यांची दाट वाढ होऊन ‘पुष्प’ तयार झालेले असे गुरुबीजुकपर्ण कॉर्डाइटेलिझांच्या गुरुबीजुकपर्णासारखी रचना असलेले म्हणजे अग्राशी बीजक असणाऱ्या देठांचे बनलेले असे. त्या शंकुमंतांचा पुं-शंकू मात्र आजच्या शंकुमंतांच्या शंकूंसारखा साधा व कॉर्डाइटेलिझांच्या शंकूपेक्षा अगदी वेगळा असे. आणखी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सर्वात प्राचीन शंकुमंतांच्या व कॉर्डाइटेलिझांच्या परागकणांतील वायुकोश अतिशय मोठे व आजच्या सपक्ष पराग असणाऱ्याच कोणत्याही शंकुमंतांच्या वायुकोशापेक्षा अधिक विकसित असत.
मध्यजीव महाकल्पातील शंकुमंतांच्या जीवाश्मांचे अध्ययन करून त्यांच्या स्त्री-शंकूंचा विकास कसकसा होत गेला, हे कळून येते. स्त्री-शंकूत घडून आलेल्या फेरफारांपैकी मुख्य म्हणजे मूळच्या संयुक्त शंकूच्या घटकांचे आकारमान कमी होत जाणे व ‘पुष्पां’चे म्हणजे आखूडशा फलिष्णू प्ररोहांचे भाग एकत्र चिकटत जाऊन सकृद्दर्शनी साधे दिसणारे शल्क तयार होणे. आजच्या स्त्री-शंकूतील शल्कांचे स्वरूप दिसते तसे साधे नसते. ती वस्तुतः एक अक्ष व संख्येने कमीअधिक भरणाऱ्या अशा अनेक वंध्य व फलिष्णू शल्कांची बनलेली असतात. उदा., ॲरॉकॅरियाचे स्त्री-शंकू एक छदशल्क, एक वंध्य शल्क व एक बीजुकपर्ण ही एकजीव एकत्र होऊन बनलेले असतात. ⇨पाइनच्या स्त्री-शंकूतील छदशल्क सुटे असते व ‘पुष्पां’चे स्वरूप किंचित जटिल असते. त्याच्यात एक आखूड अक्ष, दोन किंवा तीन वंध्य शल्क व दोन
गुरुबीजके असलेली पर्णे असतात. हे सर्व भाग समांग, सलग असल्यासारखे दिसतात पण ते भिन्न असल्याची पुसट लक्षणे त्यांच्या वाहक ऊतकांवरून दिसून येतात. [→ कॉनिफेरेलीझ].
बिर्मी (यू) सारख्या म्हणजे टॅक्सेसी [→टॅक्सेलीझ] कुलातील वनस्पतीचे तृतीय कल्पाच्या आधीचे निःसंशय जीवाश्म मिळालेले नाहीत.
केटोनिएलीझ : जुरासिक कल्पातील वनस्पतींच्या गणांपैकी एका लहानशा व बीजी नेचांशी निकट संबंध असणाऱ्या गणाचे नाव. यांची फले काही अंशी बीजी नेचांच्या व काही अंशी आवृतबीजी वनस्पतींच्या ‘फलां’सारखी असत तथापि हल्ली ह्या गणाचा समावेश प्रकटबीज वनस्पतींत करतात. [→ केटोनिएलीझ].
नीटेलीझ : (उंबळी गण). विद्यमान पादपजातींत या गणातील फक्त सत्तर जातींची माहिती नमूद आहे या गणात फक्त तीन वंश असून त्यांपैकी दोन द. गोलार्धात आढळतात. एफेड्रा ह्या वंशातील जातींचे काही परागकण पर्मियन कल्पात आढळले असून नवजीव महाकल्पातील थरांत ते सामान्य (सर्वत्र आढळणारे) आहेत. [→ नीटेलीझ].
आवृतबीजी : (अँजिओस्पर्मी). आजच्या वनस्पतींच्या एकूण जातींपैकी नव्वद टक्क्यांहून अधिक जाती म्हणजे गवते, ताड, माड, कमळे, फळझाडे, फुलझाडे, भाजीपाला इ. आपल्या सामान्य परिचयाच्या बहुतेक सर्व वनस्पती (फुलझाडे) याच गटातील आहेत. या गटातील वनस्पतींना खरी फुले असतात व त्यांची बीजे प्रकटबीजींप्रमाणे उघडी नसून फलावरणाने झाकलेली असतात. हा गट म्हणजे वनस्पतींचा अत्युच्च गट असून वनस्पतींच्या आतापर्यंत झालेल्या क्रमविकासाची पराकोटी यांच्या जातीत झालेली आढळते. [→वनस्पति, आवृतबीजी उपविभाग ].
निःसंशय आवृतबीजींचे सर्वात जुने जीवाश्म क्रिटेशस कल्पाच्या प्रारंभीच्या काळातील आहेत. त्यांचा अवतार त्याच्या आधी झाला असला पाहिजे पण तो केव्हा हे सांगता येईल असे जीवाश्म मिळालेले नाहीत. पुराजीवी महाकल्पात आवृतबीजी होत्या असे सूचित करणारा कोणताही पुरावा नाही. आवृतबीजींसारख्या वनस्पती मध्यजीव महाकल्पात असत असे दर्शविणारे थोडे जीवाश्म मिळालेले आहेत. निःसंशय आवृतबीजींसारखी पाने असणाऱ्याम फुर्क्युला ग्रॅन्युलिफेरा हिच्या पानांचे ट्रायासिक कल्पाच्या अखेरच्या काळातील जीवाश्म पूर्व ग्रीनलंडात सापडलेले आहेत. भारतातील राजमहालच्या डोंगरातील जुरासिक काळाच्या खडकांत विंटरेसी आणि ⇨मॅग्नोलिएसी (चंपक कुल) यांच्या काष्ठांशी साम्य असणाऱ्या द्वितीयक काष्ठांच्या तुकड्यांचे, होमोझायलॉन नावाचे जीवाश्म आढळलेले आहेत. स्कॉटलंडातील जुरासिक काळाच्या दगडी कोळशात [निलंबो→ कमळ] आणि कॅस्टालिया यांच्या परागांसारख्या परागांचे जीवाश्म आढळलेले आहेत.
क्रिटेशेस कल्पाच्या पूर्व भागात आवृतबीजींची संख्या अगदी अल्प असे. एकदलिकित व द्विदलिकित अशा दोन्ही प्रकारच्या वनस्पती त्या काळी असत. क्रिटेशेस कल्पाच्या उत्तर भागात आवृतबीजींचा उत्कर्ष व विकास विस्मय वाटण्याइतका वेगाने झाला व कल्पाच्या अखेरीस आधुनिक आवृतबीज वनस्पती निर्माण झाल्या.
कँब्रियन-पूर्व कालीन वनस्पती : कँब्रियन-पूर्व काळातील खडक असलेल्या कित्येक क्षेत्रांत चुनखडकांचे, रीफ-चुनखडकांचे व ग्रॅफाइटाचे किंवा ज्यांच्यात ग्रॅफाइट आहे अशा खडकांचे थर आढळतात. चुनखडक हे कॅल्शियम कार्बोनेट स्त्रवणाऱ्या सागरी ⇨शैवलांपासून व ग्रॅफाइट हे वनस्पतिज किंवा प्राणिज पदार्थांपासून झाले असावे, असे अनुमान केले जात असे पण वनस्पतींच्या अस्तित्वाचे विश्वसनीय पुरावा मिळाले नव्हते. कँब्रियन-पूर्व खडकांत वनस्पतींचे किंवा प्राण्यांचे जीवाश्म अती विरळाच आढळतात पण उपलब्ध होणाऱ्याय जीवाश्मांची संख्या हळूहळू वाढत आहे व कँब्रियन-पूर्व काळात सागरी वनस्पती होत्या, असे पुरावे मिळालेले आहेत. चूर्णीय शैवलांच्या स्त्रावापासून तयार झालेल्या गोलसर, स्तंभाकार किंवा अनियमित आकाराच्या राशी कित्येक कँब्रियन-पूर्व कालीन चुनखडकांत आढळलेल्या आहेत. अशा कित्येक राशींची रचना पत्रित (थराथरांची) असते व राशीतील पत्र्यांची व्यवस्था संकेंद्री असते पण ज्यांच्या स्त्रावापासून पत्रे निर्माण झाले त्या मूळ वनस्पतींच्या अंतर्रचनेचे चिन्हही राहिलेले नसते. त्या वनस्पती निळ्या, हिरव्या किंवा तांबड्या शैवलांच्या पूर्वज जातींच्या असाव्यात. मिशिगनच्या लोही धातुकात आजच्या क्लॅमिडोथिक्ससारखे सूक्ष्म तंतूंच्या आकाराचे पदार्थ आढळलेले आहेत व ते बॅक्टिरियांचे (सूक्ष्मजंतूंचे) असावेत असा तर्क आहे.
निळ्या-हिरव्या शैवलांच्या काही जातींचे व कवकाच्या सर्वांत साध्या जातींपैकी काहींचे चांगले म्हणजे मूळच्या वनस्पतीतील भिन्न भिन्न कोशिका (पेशी) व त्यांच्यातील जैव अवशेष ही ज्यांच्यात स्पष्ट दिसतात असे जीवाश्म दक्षिण आँटॅरिओतील कँब्रियन-पूर्व चर्टात सापडलेले आहेत. शैवल व बॅक्टेरिया यांच्यापेक्षा उच्च वनस्पतींचे जीवाश्म मात्र कोणत्याही कँब्रियन-पूर्व खडकांत मिळालेले नाहीत किंवा जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती कँब्रियन-पूर्व काळी होत्या असे दर्शविणारा पुरावाही मिळालेला नाही. कँब्रियन-पूर्व काळाचे अधिक जुना व अधिक नवा असे विभाग कधी कधी केले जातात पण त्यांना विभागणारी निश्चित रेखा नाही व अधिक जुन्या कँब्रियन-पूर्व खडकांतही, सु. तीन अब्ज वर्षांपूर्वीच्या शैवलांचे व बॅक्टेरियांचे जीवाश्म सापडलेले आहेत. [→कँब्रियन-पूर्व].
पुराजीव महाकल्पातील वनस्पती : कँब्रियन ते डेव्होनियन : कँब्रियन, ऑर्डोव्हिसियन व सिल्युरियनाचा जवळजवळ मध्य एवढ्या अवधीतील खडकांत वनस्पतींचे अवशेष विरळाच आढळतात. ओळखू येण्याजोगे जे असतात ते सागरी चूर्णीय शैवलांचे असतात. जमिनीवरील वनस्पतींच्या आतापर्यंत आढळलेल्या जीवाश्मांपैकी सर्वात जुने जीवाश्म ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया प्रदेशातील सिल्युरियन काळातील खडकांत आढळलेले आहेत. ते मुख्यतः सायलोफायटेलिझांचे आहेत. सिल्युरियन काळी सायलोफायटेलिझांची संख्या व प्रसार मर्यादित असत पण पूर्व डेव्होनियन कल्पात त्यांची बरीच वाढ झाली व अनेक देशांतील पूर्व डेव्होनियन काळातील खडकांत त्यांचे जीवाश्म आढळलेले आहेत. उत्तर सिल्युरियन पूर्व डेव्होनियन काळातील सायलोफायटेलिझांपैकी सामान्य व सर्वांत अधिक परिचित म्हणजे सायलोफायटॉन होय.
दलदली पिटाचे अश्मीभवन होऊन तयार झालेल्या ‘ऱ्हायनी चर्ट’ नावाच्या स्कॉटलंडातील चर्टात मध्य डेव्होनियन काळातील जमिनीवरील वनस्पतींचे मुख्यतः ऱ्हायनिया, हॉर्निआ, ॲस्टेरोझायलॉन इ. सायलोफायटेलिझांचे उत्कृष्ट जीवाश्म मिळालेले आहेत.
डेव्होनियन कल्पाच्या प्रारंभीच्या सायलोफायटेलीझ व इतर वनस्पती पाण्यात, जमिनीवर वाढणाऱ्या व सु. एक मी.पेक्षा कमी उंची असणाऱ्या अशा लहान ओषधी असत पण एकदा जमिनीव
र पाय रोवल्यावर वनस्पतींचा विकास वेगाने झाला. अधिक कोरड्या व दलदलीपेक्षा अधिक उंच जमिनींवर वाढू शकतील अशा वनस्पती व मोठे आकारमान असणारे वृक्ष अवतरून त्यांची वाढ होत गेली व सायलोफायटेलिझांचे महत्त्व कमी होऊन डेव्होनियन कल्पाच्या मध्यास त्या निर्वंश झाल्या. त्याच
सुमारास नेचांच्या प्राचीन जाती अवतरल्या. मध्य डेव्होनियन काळी पृथ्वीवरील पहिली वने निर्माण झाली होती व उत्तर डेव्होनियन काळात त्यांची वाढच झाली.
उत्तर डेव्होनियन काळातील वने मुख्यतः ⇨ लायकोपोडिएलीझ (उदा., प्रोटोलेपिडोडेंड्रॉन, आर्किओसिजिजिलॅरिया) व एक्विसीटेलीझ (उदा., आर्किओकॅलॅमाइटस) यांच्या वृक्षांची होती.
ॲन्यूरो–फायटॉन नावाचे सु. ७ मी. उंचीपर्यंत वाढणारे व नेचांसारखी पाने, बीजुककोशांचे झुबके व लहान दुभंगलेली पाने असणारे वृक्षही त्या काळीअसत. त्यांच्या खोडाच्या पायाकडचा भाग फुगीर व एक मी. पर्यंत व्यास असलेला असा असे. मूळची संरचना ज्यांच्यात स्पष्ट टिकून राहिलेली आहे असे ॲन्यूरोफायटॉनाचे जीवाश्म मिळालेले नाहीत व तो वनस्पतीच्या कोणत्या गटातला होता हे सांगता येत नाही. दाट वनातील वृक्षांच्या पायथ्याशी असलेल्या जमिनीवर प्राचीन नेचे व ⇨स्फेनोफायलेलीझ या झुडपी वनस्पतींची दाट वस्ती असे. आर्किॲप्टेरीस, ॲस्टेरोप्टेरीस इ. प्राचीन नेचांचे जीवाश्म विपुल पण स्फेनोफायलेलिझांचे कमी आढळतात. प्रकटबीजींच्या अती आदिम (आद्य) अशा कॅलिक्झायलॉन नावाच्या वनस्पतीच्या अश्मीभूत खोडांचे नमुने उत्तर डेव्होनियन खडकांत आढळलेले आहेत पण निश्चित बीजांचे असे कोणतेही जीवाश्म आढळलेले नाहीत. [→ ऑर्डोव्हिसियन कँब्रियन डेव्होनियन सिल्युरियन ].
कार्बॉनिफेरस : या कल्पाच्या प्रारंभीच्या वनस्पती उत्तर डेव्होनियन कल्पातील वनस्पतींसारख्याच होत्या. वाढ व विकास होण्यास अतिशय अनुकूल अशी परिस्थिती लाभल्यामुळे वनस्पतींचा उत्कर्ष झाला आणि कल्पाच्या अखेरीस जमिनीच्या विस्तीर्ण क्षेत्रांत दाट वने निर्माण झाली. आपणास मिळत असलेल्या दगडी कोळशापैकी पुष्कळसा दगडी कोळसा कार्बॉनिफेरस कल्पाच्या अखेरच्या किंवा त्याच्या पाठोपाठ आलेल्या पर्मियन कल्पाच्या प्रारंभीच्या वनातील वनस्पतींपासून तयार झालेला आहे. लेपिडोडेंड्रॉन, सिजिलॅरिया, कॉर्डांइटस व कॅलॅमाइटस यांचे वृक्ष व बीज नेचे हे उत्तर कार्बॉनिफेरस काळातील वनांचे प्रमुख घटक आणि स्फेनोफायलम व नेचे हे गौण घटक असत. या कल्पाच्या अखेरीस खऱ्या शंकुमंतांचे वाल्चिया (लेबॅचिया) सारखे पहिले वंश अवतरले होते. [→कार्बॉनिफेरस].
पर्मियन : या कल्पाच्या प्रारंभी कार्बॉनिफेरस कल्पाच्या अखेरच्या काळातील वनस्पतींसारख्याच जाती असत पण त्यांची संख्या कमी होत जाऊन पूर्वीची वने लवकरच नाहीशी झाली. लेपिडोडेंड्रॉन, सिजिलॅरिया, कॉर्डाइटस, सीनॉप्टेरिडेलीझ, स्फेनोफायलम आणि कॅलॅमाइटस यांचा ऱ्हास वेगाने झाला आणि कल्पाच्या अखेरीस त्या निर्वंश झाल्या. बीजी नेचांचा बराच अपकर्ष झाला व त्यांच्यापैकी फारच थोडे पुढील कल्पात शिल्लक राहिले. पर्मियन कल्पाच्या प्रारंभी शंकुमंत, सायकॅडेलीझ व सायकॅडॅऑइडेलीझ यांचा विकास होण्यास सुरुवात झाली होती व तो चालू राहिला.
कार्बॉनिफेरस कल्पाच्या उत्तर भागात व पर्मियन कल्पाच्या प्रारंभी तयार झालेल्या दगडी कोळशाची क्षेत्रे पाहिली म्हणजे दलदलींनी व्यापलेल्या उबदार दमट जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) असणाऱ्या, प्रचंड विस्ताराच्या सखल जमिनी त्या काळी पृथ्वीवर असल्या पाहिजेत, असे दिसून येते. नंतर दलदली नाहीशा होत गेल्या, दमट जमिनी कोरड्या होत गेल्या व वने नाहीशी झाली, वनस्पतींचे कित्येक गट निर्वंश झाले, इतर कित्येक मृत्युपंथास लागले. कार्बॉनिफेरस कल्पाच्या अखेरीस व पर्मियन कल्पात घडून आलेल्या कवचाच्या हालचालींमुळे पृथ्वीच्या भौगोलिक परिस्थितीत जे फेरफार घडून आले त्यांच्यामुळे वर उल्लेख केलेले वनस्पतींचे फेरफार घडून आले. पर्मियन कल्पाच्या प्रारंभी दक्षिण गोलार्धाचे जलवायुमान बरेच थंड होते आणि भारताच्या द्वीपकल्पाचे व दक्षिण गोलार्धातील जमिनीचे विस्तीर्ण भाग हिम-बर्फाने झाकले गेले होते.
कार्बॉनिफेरस कल्पाच्या प्रारंभी किंवा त्याच्या आधीच्या काळात जमिनीवर ज्या वनस्पती असत त्या सर्वत्र सारख्या असत पण त्यांचा विकास होत राहून कार्बॉनिफेरस कल्पाच्या अखेरीस व पर्मियन कल्पाच्या प्रारंभी ज्या वनस्पती निर्माण झाल्या त्या सर्वत्र सारख्या नसून त्यांचे चार भिन्न समूह निर्माण झाले होते. दक्षिण गोलार्धातील जमिनीवर आणि भारताच्या द्वीपकल्पात असलेल्या ग्लॉसोप्टेरीस वनस्पतिसमूहाचे मुख्य घटक बीजी नेचे असत. त्यांच्यापेक्षा अगदी वेगळे घटक असणारे तीन वनस्पतिसमूह उत्तर गोलार्धातील जमिनींवर असत. त्यांपैकी मुख्य म्हणजे यूरोप व उत्तर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पूर्व भाग यांच्यावर पसरलेला ‘यूरोपियन वनस्पतिसमूह’होय. लेपिडोडेंड्रॉन, सिजिलॅरिया, कॉर्डाइटस व कॅलॅमाइटस हे त्याचे मुख्य घटक असत. [→ पर्मियन व पर्मो-ट्रायासिक पादपजाति]. पर्मियन कल्प संपून ट्रायासिक कल्पाच्या प्रारंभीचा काही काळ उलटेपर्यंत हे चार वनस्पतिसमूह टिकून होते. वर उल्लेख केलेल्या भौगोलिक फेरफारांमुळेच असे भिन्न वनस्पतिसमूह निर्माण झाले असावेत. त्या काळातील जलवायुमानाची व वनस्पतिसमूहांची वाटणी कशी उद्भवली असेल हे कोडेच आहे व त्याचा उलगडा करण्यासाठी अनेक असामान्य स्पष्टीकरणे सुचविण्यात आलेली आहेत. [→ गोंडवनभूमि खंडविल्पव].
मध्यजीव महाकल्पातील वनस्पती : ट्रायासिक : या कल्पाच्या पहिल्या भागातील जलवायुमान जमिनीवरील वनस्पतींना अनुकूल नव्हते. पुराजीव महाकल्पातील वनस्पतींपैकी शिल्लक राहिलेल्या गटांच्या थोड्या वनस्पती त्या काळी असत पण नंतर जलवायुमान अधिक अनुकूल होत गेले आणि वनस्पतींचा प्रसार व विकास वेगाने झाला. ट्रायासिक कल्पातील मोठे वृक्ष मुख्यतः शंकुमंत, सायकॅडेलीझ व सायकॅडेऑइडेलीझ यांचे असत. या काळातील शंकुमंत वृक्षांपैकी सर्वांत मोठा म्हणजे ॲरॉकॅरिओझायलॉनॲरिझोनिकम हा होय. नेचांची संख्या बरीच असे व बहुसंख्य नेचे आधुनिक कुलातील असत. बीजी नेचांपैकी ग्लॉसोप्टेरीस, थिनफेल्डिया, डायक्रोइडियम व न्युरोप्टेरिडियम यांसारखे फारच थोडे शिल्लक राहिले होते. [→ट्रायासिक].
जुरासिक : या कल्पात सायकॅडेलीझ व सायकॅडेऑइडेलीझ यांचा अतिशय उत्कर्ष झाला. शंकुमंत व गिंकोएलीझ यांचीही भरभराट झाली. ट्रायासिक कल्पाचा अखेरचा काळ, जुरासिक कल्प व क्रिटेशस कल्पाच्या आरंभीचा काही काळ एवढ्या अवधीत एकूण जमिनीवरील वनस्पती सर्वत्र आश्चर्य वाटण्याइतक्या सम होत्या. याच अवधीत प्रकटबीजींचा अतिशय प्रसार व विकास झाला. अलास्का आणि सायंबीरिया यांच्यापासून तो अंटार्क्टिकातील ग्रेहमलँडपर्यंतच्या प्रदेशातील निरनिराळ्या क्षेत्रांत जुरासिक कालीन वनस्पतींचे जीवाश्म आढळलेले आहेत. जुरासिक कल्पात एकूण पृथ्वीचे जलवायुमान अधिक सम होते व विषम तापमानाचे स्पष्ट असे कटिबंध नव्हते. [→जुरासिक].
क्रिटेशस : या कल्पाच्या प्रारंभीच्या वनस्पती जुरासिक काळातील वनस्पतींसारख्याच होत्या. कल्पाच्या पूर्व भागात शंकुमंत, नेचे व गिंकोएलीझ यांची वृद्धी झाली पण सायकॅडेलिझांना व सायकॅडेऑइडेलिंझांना उतरती कळा लागली. क्रिटेशस कल्प संपण्यापूर्वीच सायकॅडेऑइडेलीझ निर्वंश झाल्या. शंकुमंतांचे जवळजवळ निम्मे वंश आधुनिक वंशांसारखे होते. नेचे बरेच असत व बहुतेक नेचे आधुनिक नेचांसारखे असत. गिंकोएलिझांचा परम उत्कर्ष झाला. त्यांचे अकरा वंश व त्या वंशांच्या अनेक जाती पूर्व क्रिटेशस काळात असत. आता त्यांचा एकच वंश व जाती उरलेली आहे.
क्रिटेशस कल्प हा वनस्पतींच्या इतिहासातील क्रांतिकारक घटनांचा काळ आहे. मध्यजीव महाकल्पात आवृतबीज वनस्पती अवतरल्या असल्या पाहिजेत पण ज्यांच्यात निःसंशय आवृतबीजींचे जीवाश्म सापडतात असे सर्वांत जुने खडक म्हणजे पूर्व क्रिटेशस काळाच्या प्रारंभीचे खडक होत पण त्यांची संख्या अत्यल्प म्हणजे एकूणजीवाश्मांच्या सु. ६ टक्के इतकीच असे. आवृतबीजींची वाढ होत गेली पण पूर्व क्रिटेशस काळाच्या अखेरीपर्यंत त्यांची संख्या २५टक्क्यांपेक्षा कमीच असे आणि नेचे, सायकॅडेऑइडेलीझ व सायकॅडेलीझ हेच प्रमुख असत. पूर्व क्रिटेशस कल्पाच्या प्रारंभीच्या काळातील वनस्पतींना फायकोफायलम, कर्कोफायलम, जुग्लॅंडिफायलम इ. आणि उरलेल्या काळातील वनस्पतींना पॉप्यूलस [→ पॉप्लर], ⇨ सॅसॉफ्रस निलंबाइट्स, मेनिस्पर्माइटस, सपिंडाप्सिस, सेलॅस्ट्रोफायलम . नावे त्या त्या जीवाश्मांच्या आधुनिक वनस्पतींशी असलेल्या साम्यावरुन दिली गेली आहेत. बहुसंख्य जीवाश्म पानांचेच आहेत केवळ पानांच्या साम्यावरुन ते वंश आजच्या वंशांचेच होते की त्यांच्यासारख्या इतर पूर्वकालीन वंशांचे होते हे निश्चित ठरविता येत नाही परंतु त्यांच्यापैकी पॉप्यूलस किंवा सॅसॉफ्रस यांसारखे काही थोडे वंश आधुनिक होते असे म्हणता येईल.
उत्तर क्रिटेशस कल्पात आवृतबीजींचा विकास व प्रसार अतिशय वेगाने झाला आणि त्या कल्पाच्या अखेरीस एकूण वनस्पतींच्या प्रकारांपैकी ७० टक्क्यांहून अधिक इतके त्यांचे प्रमाण झाले. त्यांचा उत्कर्ष इतक्या वेगाने का झाला याची कारणे कळलेली नाहीत. त्या कल्पाच्या अखेरच्या काळातील आवृतबीजी आधुनिक जातींसारख्याच असत. [→ क्रिटेशस].
नवजीव महाकल्पातील वनस्पती : आवृतबीज वनस्पतीच या काळातील वनस्पतींत प्रमुख राहिलेल्या आहेत. इतर गटांपैकी मुख्य म्हणजे शंकुमंत होत. नेचांची संख्या जवळजवळ पूर्वीसारखी राहिलेली असून सायकॅडेलीझ व गिंकोएलीझ यांची संख्या कमी झालेली आहे.
नवजीव महाकल्पातील वनस्पतींचे (त्यांच्या पानांचे, खोडांचे,फळांचे किंवा परागांचे) विपुल जीवाश्म आढळतात. त्यांच्यापैकी
बरेचसे ठशांच्या रुपांत व थोडेच अश्मीभूत असतात. या जीवाश्मांपैकी बहुतेकांचे वंश किंवा कुले ओळखता येण्यासारखी असतात व ते आधुनिक प्रकारांपैकीच असलेले आढळतात.
पूर्वीच्या महाकल्पांच्या मानाने या महाकल्पाचा अवधी अगदी अल्प आहे व त्यामध्ये वनस्पतिसृष्टीत महत्त्वाचे असे कोणतेच फेरफार घडलेले नाहीत. क्रिटेशस कल्पाच्या अखेरीस अस्तित्वात असलेला कोणताही प्रमुख गट निर्वंश झाला नाही व कोणताही नवा प्रमुख गट अवतरलेला नाही. वनस्पतींचे प्रकार सारतः तसेच राहिलेले असले, तरी त्यांच्या भौगोलिक वाटणीत मात्र वेळोवेळी अनेक फेरफार झालेले आहेत आणि वनस्पतिसमूहांची या महाकल्पाच्या प्रारंभीची वाटणी आता राहिलेली नाही
तृतीय कल्प : उपोष्ण किंवा समशीतोष्ण कटिबंधातील अधिक उष्ण प्रदेशातील वनस्पतींसारख्या वनस्पती या कल्पाच्या प्रारंभी आर्क्टिक व अंटार्क्टिक प्रदेशांत असत. त्यांचे विपुल जीवाष्म आणि खनिज कोळशाचे काही थरसुद्धा पश्चिम ग्रीनलंडातील उत्तर क्रिटेशस व तृतीय कल्पाच्या प्रारंभीच्या काळातील खडकांत आढळलेले आहेत. उष्ण किंवा उपोष्ण कटिबंधांतील तालवृक्ष [® पामी] व इतर कित्येक वनस्पती पूर्व तृतीय कल्पात यूरोपच्या व उत्तर अमेरिकेच्या विस्तीर्ण भागांवर पसरलेल्या होत्या आणि त्यांच्या बीजांचे व कवची फळांचे विपुल जीवाश्म वरील देशांतील त्या काळाच्या कित्येक खडकांत आढळतात. अशांपैकी उल्लेख करण्याजोगे जीवाश्म म्हणजे निपाच्या [® गुलगा] कवची फळांचे होत. निपा ही तालवृक्षांच्या गटातील क्षोडहीन वनस्पती आता भारतातील सुंदरबनात व मलेशियातील नद्यांच्या मुखाशी वाढताना आढळते. तिच्या कवची फळांचे विपुल जीवाश्म ब्रिटनमधील लंडन क्ले नावाच्या खडकांत सापडलेले आहेत.
त्यानंतरच्या काळात वर उल्लेख केलेल्या प्रदेशांतील वनस्पतिसमूह त्या त्या प्रदेशातून नाहीसे झाले व मूळच्या प्रदेशाच्या मानाने कमी अक्षांशाच्या म्हणजे विषुवास अधिक जवळ असणाऱ्या प्रदेशात गेले. तृतीय कल्प सुरू होऊन काही काळ उलटल्यावर एकूण पृथ्वीचे जलवायुमान अधिक थंड होत गेले आणि त्या कल्पाच्या अखेरीस जवळजवळ आजच्यासारखे विषम तापमानाचे कटिबंध निर्माण झाले. [® तृतीय संघ].
चतुर्थ कल्प : या कल्पाचा अवधी अगदीच अल्प (सु. ६ लाख वर्षांपूर्वीपासूनचा) म्हणजे अगोदरच्या कल्पांच्या मानाने जवळजवळ उपेक्षणीय असा आहे. याच्या प्रारंभी एकूण पृथ्वीचे जलवायुमान शीत होते. या शीत काळात म्हणजे प्लाइस्टोसीन हिमयुगात उत्तर अमेरिकेचे व यूरोपाचे विस्तीर्ण भाग हिमबर्फाने झाकलेले व निर्वनस्पती असे होते. तो शीतकाल नुकताच संपून तापमान अधिक उबदार झालेले आहे आणि आजच्यासारखे कटिबंध व वनस्पतिसमूहांची आजच्यासारखी वाटणी झालेली आहे. [® चतुर्थ कल्प].
एखाद्या प्रदेशातील खडकातील जीवाश्मांची कालानुक्रमानुसार पाहणी करून त्या प्रदेशातील वनस्पतीसमूहांचा इतिहास मिळतोच, शिवाय त्या प्रदेशाच्या प्राकृतिक स्वरूपात व जलवायुमानात काही फेरफार झालेले असले, तर त्यांचीही माहिती मिळते म्हणून नवजीव महाकल्पात वनस्पतींच्या भौगोलिक वाटणीत घडून आलेल्या फेरफारांविषयी माहिती मिळविण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. उत्तर अमेरिकेतील व यूरोपातील जीवाश्मी वनस्पतिसमूहांविषयी बरीच माहिती मिळविण्यात आलेली आहे पण इतर देशांविषयीची तशी माहिती अल्प किंवा अगदीच कमी आहे आणि बरेच अधिक अध्ययन झाल्याशिवाय पृथ्वीच्या निरनिराळ्या भागांतील वनस्पतींचा सविस्तर इतिहास जुळविता येणार नाही, पण आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून असे दिसून आलेले आहे की, उच्च अक्षांश असलेल्या प्रदेशातील वनस्पतिसमूह त्या प्रदेशातून नाहीसे होऊन सापेक्षतः कमी अक्षांशाच्या प्रदेशात जाणे, मोठी पाने असणाऱ्या सदापर्णी वृक्षांच्या वनांच्या जागी लहान पाने असणाऱ्या पानझडी वृक्षांची वने येणे, वनांच्या जागी गवते येणे किंवा गवताळ प्रदेशात शुष्क वाळवंटी वनस्पतिसमूह येणे अशांसारखे फेरफार या महाकल्पाच्या अवधीत निरनिराळ्या देशांत घडून आलेले आहेत.
पहाः जीवाश्म भूविज्ञान.
संदर्भः 1. Andrews, H.N. Studies in Palaeobotany, New York, 1961.
2. Arnold, C.A. An Introduction to Palaeobotany, New York, 1947.
3. Kummel, W.H. History of the Earth, London, 1961.
4. Smith, G.M. Cryptogamic Botany, Part II, Tokyo, 1955.
5. Sporme, K.R. The Morphology of Pteridophytes, London, 1966.
6. Surange, K. R. Indian Fossil Pteridophytes, New Delhi, 1966.
केळकर, क. वा.
“