पुराभूगोल : पूर्वीच्या निरनिराळ्या भूवैज्ञानिक काळांतील भूगोलाविषयी म्हणजे सागर व जमीन यांची वाटणी, सागरांची खोली, जमिनीची प्राकृतिक स्वरुपे, जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) व जलवायुमानाची वाटणी यांविषयी माहिती मिळविणारे विज्ञान. ही माहिती मुख्यत खडकांच्या घटकांवरून, मांडणीवरून व प्रसारावरून मिळविली जाते.
भूवैज्ञानिक पाहणी करून मिळविलेली माहिती ही पुराभूगोलाचा पाया होय. खडकांच्या उपस्थितीच्या रीतींवरून व मुख्यत त्यांच्यात जीवाश्म (जीवांचे शिळारुप अवशेष) असले, तर त्यांच्यावरून वा क्वचित किरणोत्सर्गमापनाने (भेदक कण किंवा किरण बाहेर टाकण्याच्या गुणधर्माच्या मापनाने) खडकांची वये ठरविली जातात [⟶ खडकांचे वय].
गाळाच्या खडकांच्या एखाद्या राशीच् घटक आणि रचना, तिचे आकारमान आणि तिने व्यापिलेले क्षेत्र इत्यादींचे परीक्षण करून ती कोणत्या परिस्थितीत (खोल किंवा उथळ समुद्रात, गोड्या पाण्यात किंवा जमिनीवर) तयार झाली हे कळते. तिच्या खडकांचा जनक गाळ कोणत्या खडकांपासून व कोणत्या दिशेकडून आला, तसेच गाळ साचला त्या क्षेत्राचे आणि ते जेथून आला त्या क्षेत्राचे जलवायुमान उष्ण, समशीतोष्ण किंवा शीत होते यांविषयी माहिती मिळणेही शक्य असते [⟶ पुराजलवायुविज्ञान].
पुराभूगोल दर्शविणारे नकाशे सामान्य भूगोलाच्या नकाशासारखेच म्हणजे त्यांच्या सारखीच प्रक्षेपणे वापरून तयार केलेले असतात [⟶ नकाशा]. नकाशा एखाद्या देशाचा, खंडाचा किंवा एकूण पृथ्वीचा असू शकतो. एखाद्या विशिष्ट कालावधीच्या नकाशात त्या काळातील जमिनी आणि सागर यांची वाटणी दाखविलेली असते.
कित्येक क्षेत्रांतील खडकांना घड्या पडलेल्या असतात किंवा ते बरेच तिरपे किंवा उभे झालेले असतात व क्षरणाने (झीज झाल्याने) त्यांचे कमीअधिक भाग नाहीसे झालेले असतात. म्हणून त्यांच्या मूळच्या विस्ताराची यथातथ्य माहिती मिळणे शक्य नसते. उदा. भारत पाकिस्तान उपखंडाच्या पश्चिम, उत्तर व पूर्व सीमालगतच्या आणि अफगाणिस्तान, ब्रह्मदेश इ.देशांतील हिमालयाच्या व इतर पर्वतांच्या रांगा या मुख्यत कँब्रियनापासून तो तृतीय कल्पनाच्या जवळजवळ मध्यपर्यंतच्या (सु. ६० ते ३.५ कोटी वर्षापूर्वीच्या) काळात समुद्राच्या तळाशी साचलेल्या गाळांच्या खडकांच्या आहेत. कँब्रियन कल्पापासून तो तृतीय कल्पनाच्या मध्यपर्यंत ते खडक असलेल्या भागांवर समुद्र पसरलेला होता हे निश्चित पण त्या खडकांना बऱ्याच घड्या पडलेल्या असल्यामुळे त्या पडण्यापूर्वी त्यांचा विस्तार किती होता, हे अचूक सांगणे अशक्य आहे. तसेच आणखी एक उदाहरण म्हणजे अरवलीचे.या पर्वताची रांग मुख्यत समुद्रात साचलेल्या गाळाच्या थरांची असून ती कँब्रियन कल्पाच्या (सु. ६० ते ५१ कोटी वर्षापूर्वीच्या काळात ) किंचित आधी तयार झाली. दीर्घकाल क्षरण झाल्यामुळे तिचे लहान व बुटके अवशेषच आता शिल्लक राहिलेले आहेत. त्यांचा प्रसार व रचना लक्षात घेतल्या, तर तो पर्वत नुकताच निर्माण झाला होता त्या काळी म्हणजे पुराजीव महाकल्पात (सु. ६० ते २४.५ कोटी वर्षापूर्वीच्या काळात) तो हिमालयाएवढा असावा, असे म्हणता येते पण त्याचे खडक ज्या सागरांत साचले त्यांचा विस्तार किंवा अरवली पर्वत तयार झाला तेव्हा त्याचा विस्तार व उंची किती होती, हे अचूक सांगता येत नाही. म्हणून पुराभूगोल दाखविणारे नकाशे स्थूल असतात आणि जमिनीवर व सागर यांची वाटणीच त्यांच्यात सामान्यत दर्शविलेली असते. क्वचित पर्वतरांगा, जमिनीचे उंचवटे किंवा सखल भाग स्थूलमानाने दाखविलेले असतात.
ब्रिटन व यूरोपातील काही देश आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांसारख्या काही देशांचे सविस्तर भूवैज्ञानिक परीक्षण झालेले आहे व त्या देशांचा पूर्वीच्या कल्पांतील भूगोल दाखविणारे नकाशे तयार झालेले आहेत पण पुष्कळशा देशांची तितकी सविस्तर माहिती नसल्यामुळे एकूण पृथ्वीच्या पुराभूगोलाचे फारच थोडे नकाशे तयार करण्यात आलेले आहेत. ते अगदी साधे असून जमिनीची व सागरांची स्थूल वाटणीच त्यांच्यात दाखविलेली असते. एकूण पृथ्वीचे पुराभौगोलिक नकाशे तयार करण्यासाठी अजून पुष्कळच माहिती मिळवावी लागेल.
महासागरांच्या खळग्यांची व खंडांची स्थाने अतिप्राचीन काळापासून सारत तशीच टिकून राहिलेली आहेत, असे सनातनी भूवैज्ञानिकांचे मत होते पण खंडे मूळ जागेवर सरकली असावीत म्हणजे खंडविप्लव झाला असावा, असे सुचविणारे अनेक पुरावे गेल्या पन्नास वर्षात उपलब्ध झालेले आहेत [⟶ खंडविप्लव पराचुंबकत्व]. खंडविप्लव खरोखरीच घडून आलेला असला, तर पुराभूगोलाचे नकाशे करण्याचे काम अधिकच अवघड होईल.
खंडविपल्व झाला असे ग्राह्य धरून व (१) गत काळातील जमिनीवर किंवा गोड्या पाण्यात राहणाऱ्या जीवांचा प्रसार, (२)गतकालीन जीवांवरून सूचित होणारे जलवायुमान,(३) पुराचुंबकत्वावरून सूचित होणारे स्थआन म्हणजे विषुवापासून अंतर, (४) खंडांच्या किनाऱ्यांच्या आकारांचा किंवा खँडांतील पर्वतरांगांचा जुळतेपणा इ. गोष्टी लक्षात घेऊन पृथ्वीच्या पुराभूगोलाचे नकाशे जुळविण्याचे प्रयत्न चालू आहेत.
भारताच्या द्वीपकल्पाचा पुराभूगोल कँब्रियन कल्पापासून तो तृतीय कल्पाच्या मध्यापर्यंतच्या कालावधीत भारत-पाकिस्तान उपखंडाच्या उत्तर, पश्चिम आणि पूर्व सीमांवरील पर्वतरांगा असलेल्या प्रदेशावर टेथिम नावाचा सागर व त्याची आखाते पसरलेली होती.
धारवाडी संघाचे खडक हे द्वीपकल्पातील सर्वांत जुन्या अशा सागरी गाळांच्या व लाव्ह्यांच्या राशींचे रुपांतरण होऊन तयार झालेले आहेत. क्षरणामुळे मूळच्या राशीपैकी बहुसंख्य खडक नाहीसे होऊन त्यांचे लहानसे व तुटक तुटक एवशेष मात्र शिल्लक राहिलेले आहेत पण ते दीपकल्पाच्या सर्व भआगांत विखुरलेले आढळतात. म्हणून धारवाडी कल्पात [⟶धारवाडी संघ] द्वीपरल्पाच्या जवळजवळ सर्वक्षेत्रावर एका किंवा अधिक सागरांचे पाणी होते असे दिसते. धारवाड काळात सागरांच्या तळाशी साचलेल्या थरांवर धारवडी कल्पानंतरच्या हालचालींचा दाब पडला. त्या थरांना घड्या पडून ते उचलले गेले व द्वीपकल्पाचे पर्वतमय अशा जमिनीवर रुपांतर झाले. अतिदीर्घ काळ क्षरण होऊन त्या जमिनीपासून जवळजवळ सपाट अशी मैदाने तयार झाल्यावर द्वीपकल्पाचे बरेचसे क्षेत्र पुन्हा समुद्रात बुडाले व त्याच्यावर पुराण महाकल्पात गाळ ( व प्रारंभी काही लाव्हे) साचले [⟶ पुराण महाकल्प व गण]. पुराण महाकल्पाच्या खडकांच्या प्रसारावरून त्या काळआतील समुद्रांनी व्यापिलेल्या क्षेत्रांची स्थूल कल्पना येते परंतु त्या काळी द्वीपकल्पाच्या एकूण क्षेत्रापैकी कोणते भाग जमीन व कोणते समुद्राखाली होते, हे निश्चित सांगता येत नाही. दक्षिण भारताच्या पूर्वेकडील भागात पुराण महाकल्पाचे खडक आहेत व पश्चिमेकडील बऱ्याचशा भागात (मध्य कर्नाटकात व त्याच्या दक्षिणेकडील व द्वीपकल्पाच्या पश्चिमेकडील भागात) चते आढळत नाहीत. म्हणून हे पश्चिमेकडील भाग जमीन असेवेत व ⇨ कडप्पा (कडप्पा)संघाचे खडक असलेल्या पूर्वेकडील भागात समुद्र असावा असा तर्क आहे पण पुराण महाकल्पाचे खडक उचलले जाऊन जमीन झाल्यानंतर इतका दीर्घ कालावधी लोटला आहे व त्यांचे इतके क्षरण झालेले आहे की, आता तसे खडक पश्चिमेकडील क्षेत्रात नाहीत म्हणून प्राचीन काळई ते नव्हते, असे निश्चित म्हणता येणार नाही. कदाचित काही खडक पूर्वी असण्याचा व नंतर क्षरणाने निघून गेले असण्याचा संभव आहे
विंध्य कल्पाच्या [⟶ विंध्य संघ] किंचित आधीपासून तो पुराजीव महाकल्पाच्या प्रारंभापर्यंतच्या काळात भूकवचाच्या मंद हालचाली होऊन द्वीपकल्प उचलले गेले व त्याचे जमिनीत रुपांतर झाले. अरवली असलेल्या क्षेत्रातील खरांस घड्या पडून तो पर्वत निर्माण झाला पण इतर क्षेत्रांतील खडकांना जवळजवळ घड्या न पडता ते उचलले गेले.
पुराण महाकल्पाच्या अखेरीस द्वीपकल्प उचलले जाऊन त्याची जमीन झाल्यानंतरच्या म्हणजे सु. कँब्रियन कल्पाच्या प्ररंभानंतरच्या सर्व कालवधईत द्वीपकल्पाचे बहुतेक क्षेत्र जमीनचे राहिलेले आहे परंतु त्यांच्या किनाऱ्यालगतच्या सखल प्रदेशावर समुद्राची अल्प काल टिकणारी लहान लहान आक्रमणे अधूनमधून झालेली आहेत. उमारियाजवळ सापडणारा पर्मो-कारर्बॉनिफेरस (सु.३१ ते २७.५ कोटी वर्षांपूर्वींच्या) काळातील एक सागरी गाळाचा थर, नर्मदेच्या खोऱ्याच्या मध्ल्या भआगातील क्रिटेशन कल्पातील (सु.१४ ते ९ कोटी वर्षापूर्वीच्या काळातील) सागरी खडक व द्वीपकल्पाच्या किनाऱ्याजवळच्या कित्येक भागांत आढळणाऱ्या मध्यजीव महाकल्पातील व तृतीय कल्पातील (सु.२३ ते ९ आणि सु. ६.५ ते १.२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) सागरी खडकांच्या लहानशा राशी, अशा आक्रमणाच्या काळात तयार झालेल्या आहेत.
पर्मो-कार्बॉफेरस तेक्रिटेशन कल्पाचा प्रारंभ होईपर्यंतच्या कालावधीत जमिनीवर गाळ साचून तयार झालेल्या ⇨ गोंडवनी संघाच्या प्रचंड राशी द्वीपकल्पाच्या कित्येक भागांत आढळतात. त्या संघाचे प्रारंभीचे खडक गोलाश्म संस्तर (हिमनदीने वाहून आलेल्या मृत्तिकेत दगडगोटे असलेली अस्तरित म्हणजे थर नसलेली राशी) असून त्यांच्या मागोमाग तयार झालेल्या माती-वाळूच्या खडकांत दगडी कोळशाचे थर आहेत. म्हणून गोंडवनी कल्पाच्या प्रारंभी द्वीपकल्पाचे जलवायुमान प्रथम शीत व नंतर काही काळ उबदार व दमट असून त्याच्या पुष्कळशा क्षेत्रावर दलदली वने होता, असे दिसून येते. भारतातील गोंडवनी खडकांसारखे खडक मध्य व दक्षिण आफ्रिकेत आढळतात. त्या खडकांच्या व त्यांच्यातील जीवाश्मांच्या साम्यांवरून या दोन देशांच्या जमिनी कोणत्या तरी रीतीने जोडल्या गेल्या असाव्यात असे दिसते. [⟶गोंडवनभूमि].
क्रिटेशसच्या उत्तर काळातील सागरी खडकांवरून द्वीपकल्पाच्या पुराभूगोलाविषयी महत्वाची माहिती मिळते. गुजरातेतील वढवाण आणि बडोद्यापासून तो मध्य प्रदेशांतील बाघापर्यंतच्या क्षेत्रांत उत्तर क्रिटेशस काळातील सागरी थरांची ठिगळे तुटक तुटक आढळतात. त्याच काळातील सागरी थरांच्या लहान लहान राशी द्वीपकल्पाच्या आग्नेय किनाऱ्यावर त्रिचनापल्ली ते पॉंडेचेरीपर्यंतच्या जमिनीवर आढळतात. या दोन क्षेत्रांतील जीवाश्म बरेच भिन्न आहेत. नर्मदेच्या खोऱ्यातील खडकांतील बहुतेक जीवाश्म यूरोपातील क्रिटेशस जीवाश्मांसारखे आहेत पण त्रिचनापल्लीच्या खडकांत यूरोपातल्यासारख्या जीवाश्मांची संख्या अल्प भरते. यावरून नर्मदेच्या व त्रिचनापल्लीच्या क्षेत्रांतील थर ज्या समुद्रांत साचले ते समुद्र एकमेकांपासून अलग होते, असे दिसून येते. त्रिचनापल्लीसारखेच जीवाश्म असणारे थर आसामात व त्या दोहोंसारखे जीवाश्म असणारे थर मॅलॅगॅसीत आणि आफ्रिकेत आहेत. भारतापासून आफ्रिकेपर्यंत गेलेली एक सलग जमीन त्या काळी असावी व ती मधे आल्यामुळे नर्मदेच्या खोऱ्यालगतचा समुद्र व द्वीपकल्पाच्या उत्तरेकडील टेथिस समुद्राचा एक फाटा दक्षिणेकडे पसरला होता व त्याच्या आखातात नर्मदेच्या क्षेत्रांतले थर साचले व द्वीपकल्पापासून आफ्रिकेपर्यंत पसरलेल्या त्या जमिनीच्या पूर्व किनाऱ्यालगतच्या समुद्रांत त्रिचनापल्लीचे व त्यांच्यासारखे इतर थर साचले. [⟶खंडविप्लव].
मध्यजीव महाकल्पाच्या अखेरच्या व तृतीय कल्पाच्या प्रारंभीच्या काही कालावधीत द्वीपकल्पात प्रचंड ज्वालामुखी क्रिया घडून आली. वारंवार उद्गीरणे (उद्रेक) होत राहून ज्वालामुखींचे बेसाल्टी लाव्हे द्वीपकल्पाच्या पुष्कळशा भागावर पसरले व काही भागात काही सहस्त्र मीटर जाडीच्या लाव्ह्यांच्या राशी तयार झाल्या. द्वीपकल्पाच्या जमिनींचा विस्तार पश्चिमेकडे बराच अधिक दूरवर होता व त्याच्यावरही लाव्ह्यांचे थर साचले. पुढे थोडा काळ उलटल्यावर द्वीपकल्पाचा आफ्रिकेशी असलेला संबंध तुटला. त्या वेळी द्वीपकल्पाचा पश्चिमेकडचा काही भाग खचून आजच्या अरबी समुद्राच्या खाली गेला, अशी कल्पना आहे. द्वीपकल्पाचा पश्चिम किनारा छाटला गेल्याप्रमाणे सरळ दिसतो तो यामुळेच.
द्वीपकल्पाचा व आफ्रिकेचा संबंध तुटणे आणि उत्तरेकडील टेथिस समुद्र नाहीसा होऊन त्याच्या जागी पर्वतरांगा निर्माण होणे इ. प्रचंड फेरफार तृतीय कल्पात घडून आले व भारत-पाकिस्तान उपखंडाला आधुनिक भौगोलिक स्वरूप प्राप्त झाले. पुराजीव महाकल्पाच्या प्रारंभापासून तो हिमालयादि पर्वत निर्माण होईपर्यंतच्या काळात अरवली हा द्वीपकल्पातील प्रमुख पर्वत व जलविभाजक होता. त्याच्यापासून व पुराण महाकल्पाच्या अखेरीस निर्माण झालेल्या विंध्य पर्वतापासून निघणाऱ्या कित्येक नद्या टेथिस सागरास मिळत असत. हिमालय निर्माण झाल्यामुळे उत्तर भारतातील जलनिकासाचे (ओढे व नद्या यांच्या द्वारे पाणी वाहून जाण्याचे) स्वरूप पार बदलले.उत्तरेकडील समुद्र नाहीसा होऊन द्वीपकल्पाची भूमी मध्य आशियास जोडली गेल्यामुळे भारताला आजच्यासारखे मॉन्सून जलवायुमान प्राप्त झाले.
हिमालयादि पर्वतरांगा निर्माण झाल्यावर त्यांच्यापासून येणाऱ्या नद्यानाल्यांचा गाळ सखल प्रदेशांत साचून सिंधु-गंगा नद्यांचा मैदानी प्रदेश तयार झालेला आहे.
द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळच्या भागांत मध्यजीव महाकल्पातील व तृतीय कल्पातील सागरी खडकांच्या लहानसहान राशी विखुरलेल्या आढळतात. त्यांच्या घटकांवरून व रचनांवरून असे दिसून येते की, मध्यजीव महाकल्पाच्या सु. मध्यानंतर द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याच्या रेषेत विशेषसे फेरफार झालेले नाहीत.
संदर्भ King.L.C.Morphology of the Earth a Study and Synthesis of World Scenery, New York, 1962.
केळकर, क. वा.
“