पिंडर: (सु. ५२२-सु. ४४२ इ. स. पू.). श्रेष्ठ ग्रीक भावकवी. थीब्झजवळील साइनासेफाली ह्या गावी त्याचा जन्म झाला. थीब्झ येथे त्याचे घर होते. इसवी सनाच्या दुसर्या शतकापर्यंत ते येथे दाखविले जात होते. त्याचे घराणे उमरावाचे होते, असे त्याच्याच काव्यातील उल्लेखांचा आधार घेऊन म्हटले जाते. तथापि ह्या उल्लेखांचा अर्थनिर्णय वेगवेगळ्या प्रकारे केला जात असल्यामुळे ही बाब वादग्रस्त आहे. अथेन्समध्ये त्याने शिक्षण घेतले. तेथे असताना विख्यात ग्रीक नाटककार एस्किलस (५२५-४५६ इ. स. पू,) ह्याच्याशी त्याचा परिचय झाला असल्याचा संभव आहे. कोरिना ही ग्रीक कवयित्री पिंडरची काव्यक्षेत्रातील गुरू होती असे परंपरा मानते. ग्रीसमधील डेल्फाय येथील प्रसिध्द अपोलोमंदिराशी पिंडरचे काही खास नाते असावे, असे दिसते. थीब्झ आणि अथेन्स ह्यांचे सख्य नसतानाही अथेन्सबद्दल त्याला प्रेम आणि अभिमान वाटे. अथेन्सलाही त्याच्या बद्दल आत्मीयता होती. अथेन्सच्या तत्कालीन राजकीय जीवनात प्रभावी ठरलेल्या अल्कमिऑनिडी कुटुंबाशी पिंडरचे संबंध उत्तम होते. सिराक्यूसचा राजा हायरॉन ह्याचा पाहूणा म्हणून पिंडर सिसिलीला जाऊन आला होता, असे मानले जासे पण त्याबाबत प्रत्यक्ष पुरावा नाही.
डोरियन बोलभाषेत पिंडरने आपल्या कविता रचिल्या. वृदगिते किंवा ‘कोरल लिरिक’ म्हणून ग्रीक भावकवितेचा जो एक महत्त्वाचा प्रकार आहे, तो पिंडरने अत्यंत समर्थपणे हाताळला. ग्रीक जीवनातील विविध सार्वजनिक आणि खाजगी कार्यक्रमांच्या प्रसंगी ही वृंदगीते गायिली जात असत. अगदी आरंभीच्या वृंदगीतांमागील प्रेरणा धार्मिक होती. तथापि पुढे एखादा खाजगी विशेष प्रसंग साजरा करण्यासाठी वृंदगीत कारांना मुद्दाम बोलावण्यात येऊ लागले. पिंडर सु. वीस वर्षाचा असतानाच थेसलीमधील एका प्रतिष्ठित कुटुंबाने पिंडरकडून काही वृदगीते लिहून घेतली होती. ग्रीक वृंदगीतांचेही अनेक प्रकार होते आणि त्यांतील बहुतेक प्रमुख प्रकार पिंडरने हाताळले होते. उदा., पीअन, डिथिरॅम व एपिनायलिऑन इत्यादी. पीअन या प्रकारात आरंभी अपोलोच्या प्रसंशेसाठी लिहिलेली गीते येत पुढे त्यांत कोणत्याही देवतीची स्तुती येऊ लागली. डिथिरॅम ही मुळात डायोनायससच्या पूजाविधिशी संबंधीत अशी गीते. पिंडरने ह्या दोन प्रकारांत केलेल्या रचना अत्यंत त्रुटित स्वरूपात उपलब्ध आहेत. एपिनायसिऑन म्हणजे क्रिडाविजयगीत. पिंडरच्या एकूण कवितेपैकी आज सु. एक चतुर्थांशच आपणास उपलब्ध असून तीत ह्या क्रिडाविजगीतांचा समावेश प्रमुख्याने होतो. ग्रीसमधील ऑलिंपिया, पीथीऑन, नीमीअ आणि इस्थमीअ येथे क्रीडामहोत्सव होत असत. त्यांतील क्रीडास्पर्धात विजयी होणार्या विविध वीरांवर रचिलेली ही गीते आहेत. क्रिडापटूचे नाव, त्याने कोणत्या क्रिडास्पर्धेत आणि कोठे विजय मिळविला, संबंधित क्रिडास्पर्धेशिवाय अन्य कोणत्या क्रिडास्पर्धांमध्ये तो विजयी झाला होता वगैरे तपशील ह्या गीतांतून येतात. विजयी विराच्या कुटुंबाची माहिती दिली जाते. क्रीडास्पर्धेच्या अनुषंगाने एखादी मिथ्थकथाही अनेकदा सांगितली जाई. नंतर जीवनविषयक चिंतन आणि त्यांतून स्फुरलेली सुभाषिसे असा क्रम असे. पिंडरच्या क्रीडाविजयगीतांतही ही वैशिष्ट्ये आहेतच. विजयी वीर आपल्या नगरात परत आल्यानंतर त्याच्या सन्मानार्थ रचिलेले क्रीडाविजयगीत एखाद्या वृन्दाने बासरी आणि लायर ह्यांच्या साथीवर गावयाचे, अशी सर्वसामान्य रीत होती म्हणून क्रीडाविजयगीते हा ‘कोरल ओड’ चा किंवा वृन्द-उद्देशिकेचा प्रकार मानला जातो. ‘पिडॅरिक उद्देशिका’ म्हणजे त्याने रचिलेली क्रीडाविजयगीते होत. पिंडरच्या उद्देशिकेत स्ट्रॉफी, आणि अँटिस्ट्रॉफी हे दोन विभाग रचनादृष्ट्या सारखे असून एपोडची रचना मात्र त्यांहून भिन्न प्रकारची असते. पिंडरच्या उद्देशिकांनी ओडरचनेचा एक आदर्शच (पिंडॅरिक ओड) निर्माण केला आणि पुढे तो अनेकांनी गिरविला.
पिंडरच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रतिभेचा ठसा त्याच्या सर्वच कवितेवर उमटलेला आहे. विविध छंदांचा समर्थपणे केलेला वापर, उदात्त विचार आणि उत्कृष्ट रूपकांनी नटलेली प्रगल्भ, चित्रमय शैली ही त्याच्या काव्यलेखनाची लक्षणीय वैशिष्ट्ये होत. मिथ्यकथांची चातुर्यपूर्ण गुंफण त्याने स्वातंत्र दृष्टी ठेवून केली. कधी त्यांना वेगळे रूप दिले, तर कधी नव्या मिथ्यकथाही निर्माण केल्या. उत्कट धर्मभावना हे पिंडरच्या कवितेचे आणखी एख वैशिष्ट्य आहे.
कवितेच्या प्रयोजनासंबंधीची पिंडरची धारणा अगदी स्पष्ट होती. वरर्तमानकाळात घडणार्या गौरवास्पद कृत्यांची स्मृती पुढील पिढ्यांसाठी जतन करून ठेवणे, हे त्याच्या दृष्टीने कवितेचे प्रमुख कार्य होय.महान कृत्यांचा आणि घटनांचा अन्वयार्थही कवीच लावू शकतो. इतिहासातील भव्योदात्त क्षण कविता पकडते म्हणून ते अमर होतात, हा महाकवी होमरचा विश्वास पिंडर बोलून दखवितो. अर्थात कवी असणे ही बाब त्याला फार मोठ्या अभिमानाची वाटते.
कुलकर्णी, अ. र.