मिनँडर : (सु. ३४२–२९२ इ. स. पू.) ग्रीक नाटककार. त्याच्या जीवनाविषयी फारशी माहिती मिळत नाही. अलेक्सिस ह्या ग्रीक सुखात्मिकाकाराचा तो पुतण्या. तसेच ग्रीक तत्त्वज्ञ थीओफ्रॅस्टस ह्याचा तो शिष्य होता. त्याने आपले बहुतेक आयुष्य अथेन्समध्ये व्यतित केले असावे. पायरीअस या बंदराच्या जवळ तो बुडून मरण पावला असे म्हटले जाते.

विख्यात ग्रीक सुखात्मिकाकार ⇨ ॲरिस्टोफेनीस (सु. ४४८–३८० इ. स. पू.) ह्याच्या निधनानंतर काही वर्षांनी जी ग्रीक नवसुखात्मिका अवतरली, तिचा मिनँडर हा महत्त्वाचा प्रतिनिधी होय. समकालीन सार्वजनिक जीवनातल्या प्रसिद्ध व्यक्ती जुन्या ग्रीक सुखात्मिकांतील विनोदाचे अनेकदा लक्ष्य झाल्याचे दिसते. तथापि नव्या ग्रीक सुखात्मिकेत काल्पनिक व्यक्तिरेखा उभ्या करुन त्यांच्या विविध वर्तनतऱ्हा रंगविल्या जाऊ लागल्या वृंद हे ग्रीक नाटकांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य परंतु नव्या सुखात्मिकेत वृंदाचे महत्त्व कमी झाले.

मिनँडरने सु. शंभर सुखात्मिका लिहिल्या, असे म्हटले जात असले, तरी आज त्याच्या फक्त पाच सुखात्मिका – त्यांतील चार त्रुटित स्वरुपात – उपलब्ध आहेत. त्या अशा : ‘आर्बिट्रेशन’ (इं. शी.), ‘द गर्ल फ्रॉम सॅमॉस’ (इं. शी.), ‘द शॉर्न गर्ल’ (इं. शी.), हिरॉस आणि पूर्णतः उपलब्ध असलेली ‘द मिसॅंथ्रोप’ (इं. शी.).

प्रेमसंबंधातील गुंतागुंत, एखाद्या मुलीला फसवणे तिच्या संबंधातून झालेल्या अपत्यालाही टाकून देणे पुढे केव्हा तरी त्या अपत्याची ओळख पटणे व मातापित्यांची दिलजमाई होऊन त्यांचा विवाह होणे अशा प्रकारची कथानके मिनँडरच्या सुखात्मिकांतून आढळतात. मिनँडरची कथानके गुंतागुंतीची असली, तरी त्यांची मांडणी तो कौशल्याने करतो. त्याचे व्यक्तिरेखनही ठसठशीत आणि प्रत्ययकारी असते.

प्रसिद्ध रोमन वक्ता आणि साहित्यिक क्विंटिल्यन ह्याने मिनँडरला ग्रीक नव-सुखात्मिकाकारांतील सर्वश्रेष्ठ, म्हणून गौरविले आहे. प्लॉटस आणि टेरेन्स ह्या दोन श्रेष्ठ रोमन नाटककारांवर मिनँडरचा मोठा प्रभाव जाणवतो. प्रबोधनकाळापासूनच्या युरोपीय सुखात्मिकेच्या विकासातही मिनँडरच्या प्रभावाचा लक्षणीय वाटा आहे. तसेच त्याच्या नाटकांतील अनेक वाक्यांना सुभाषितांचे महत्त्व आले आहे.

संदर्भ : 1. Norwood, Gilbert, Greek Comedy, London, 1931, Reprinted 1964.

             2. Webster, T. B. Studies in Later Greek Comedy, 1953, 2nd ed., 1970.

             3. Webster, T. B. L. Studies in Menander, 1950, 2nd ed. 1960.

कुलकर्णी, अ. र.