सायकारीस, यॉआन्यिस : (१५ मे १८५४–२९ सप्टेंबर १९२९). ग्री क साहित्यिक. त्याचा जन्म ग्रीक वंशाच्या कुटुंबात ओडेसा (रशिया) या गावी झाला. सुरुवातीचे शिक्षण त्याने तिथे घेतले. त्यानंतर त्याच्या वडिलांनी कॉन्स्टँटिनोपल येथे स्थलांतर केले. तेथे मात्र काही काळ वास्तव्य करुन पुढे हे कुटुंब पॅरिस येथे स्थायिक झाले (१८६८). त्याचे शिक्षण ‘एकॉल देस लँग्विस ओरिएंटेलिस’ या विद्यालयात झाले आणि पुढे ‘एकॉल प्राटिक देस हॉट्स एत्यूदेस’ या संस्थेत संचालकपदी त्याची नियुक्ती झाली (१८८५). तत्पूर्वी त्याचा विवाह ⇨अर्नेस्त (जोझेफ) रनां या फ्रेंच इतिहासकार व भाषाभ्यासकाच्या नीऑमी नावाच्या मुलीशी झाला (१८८२). तिच्यापासून त्याला चार अपत्ये झाली. त्याने १८८६ मध्ये ग्रीसचा दौरा केला आणि त्यानंतर To taxidi mou (१८८८, इं. शी. ‘माय जर्नी’) हे प्रवासवर्णन त्याने लिहिले. पुढे त्याची एकॉल देस लँग्विस ओरिएंटेलिस ह्या विद्यालयात प्राध्यापक म्हणून एमील लगँ या हेलेनिस्टिक फ्रेंच लेखकाच्या निवृत्तीनंतर नेमणूक झाली (१९०३–२८). त्याच्या To taxidi mou या ग्रंथाचा हेतू प्रवासवर्णनपर असला, तरी प्रत्यक्षात सामान्य ग्रीक भाषकांत लोकजात (डिमॉटिक) भाषेविषयी जागृती घडवून आणण्याचा त्याचा प्रयत्न होता. यासाठी त्याने दिग्लोशिया (द्विभाषिक) ही नवी संज्ञा बनविली. त्यामुळे लोकजात भाषेतील वाक्यप्रयोग प्रत्यक्षात वापरात येऊ लागले. परिणामतः ग्री क गद्याचा तोंडवळाच त्यामुळे पालटला. अभिजात आणि लोकजात वाङ्‌मयीन शैलीच्या पुरस्कर्त्यांमध्ये झालेला वाद व त्यात लोकजात शैलीचा झालेला विजय ही घटना ग्री क कवितेप्रमाणेच ग्रीक गद्याच्या संदर्भातही महत्त्वाची मानली जाते. त्याच्या प्रयत्नातून हळूहळू ग्रीक साहित्यात लोकजात भाषा प्रचलित होत गेली.

पॅरिस येथे तो निधन पावला मात्र कीऑस येथे त्याचे दफन करण्यात आले.

कुलकर्णी, अ. र.