थिऑक्रिटस : (इ. स. पू. सु. ३१५–सु. २६०). प्रसिद्ध ग्रीक जानपद कवी. पश्चिमी काव्यपरंपरेत त्याला आद्य जानपद कवी किंवा गोपगीतकर्ता मानले जाते. त्याची चरित्रात्मक माहिती त्याच्या काव्यातूनच मिळते. तो इटलीतील सिराक्यूसचा रहिवासी. फिलीना व प्रॅक्झॅगोरस हे त्याचे आई–वडील. कोसच्या फिलेटसकडे त्याचे शिक्षण झाल्याचे मानले जाते. त्याचे बालपण सिसिलीमध्ये व्यतीत झाले. द. इटली, कोस, मिलेटस आणि ॲलेक्झांड्रिया इ. ठिकाणीही त्याचे वास्तव्य झाल्याचे दिसते.

त्याचे सर्वच काव्य ग्रामीण स्वरूपाचे नसले, तरी जानपदगीत किंवा गोपगीत हा काव्यप्रकार त्यानेच पहिल्यांदा प्रतिष्ठित केला. ह्या गोपगीतांना ‘आयडिल्स’ असे सामान्यतः संबोधिले जाते. मेंढपाळांच्या भावना, त्यांच्या जीवनातील सुखदुःखे, हेक्झॅमीटरचा उपयोग, रूपकात्मकता इ. विशेष त्याच्या काव्यलेखनात दिसून येतात. सामान्यतः डोरिक भाषेत त्याने आपली काव्यरचना केली. त्याची शैली सहजसुंदर आणि तरीही संस्कारसंपन्न आहे. प्रेम, विरह, मृत्यू इ. विषय व त्यांना असलेली मेंढपाळी जीवनाची पार्श्वभूमी हे थिऑक्रिटसच्या काव्याचे वैशिष्ट्य म्हणून सांगितले जाते. त्याची काव्यरचना तो ॲलेक्झांड्रिया येथील टॉलेमी फिलाडेल्फसच्या राजदरबारात असतानाच झाली. आपल्या बालपणातील सिसिलीचा ग्रामीण परिसर स्मरणरूपाने त्याच्या काव्यात अवतरला आहे. म्हणजे एका दृष्टीने नगरवासी मनाला लागलेली जानपद जीवनाची ओढ त्याच्या काव्यात व्यक्त झाली. हा देखावाच नंतरच्याही जानपद कवींच्या बाबतींत दिसून येतो. वास्तव व आदर्श यांच्या संवादाची जी उंची थिऑक्रिटसने आपल्या काव्यात गाठली ती अनन्यसाधारण आहे.

संदर्भ: 1. Cholmely, R. J. Ed. The Idylls of Theocritus, 1901.

           2. Edmonds, R. T. Ed. The Greek Bucolic Poets, 1912.

           3. Hallard, J. H. Trans. The Idylls, Epigrams and Other Poems of Theocritus with the Fragments of Bion and Moschus, 1924.

           4. Lang, Andrew, Ed. Theocritus, Bion and Moschus, New York, 1880.

           5. Lawall, Gilbert, Theocritus’ Coan Pastorals: A Poetry Book, 1967.

जाधव, रा. ग.