पा ल्मा : (पाल्मा हे माल्यॉर्का). स्पेनच्या बॅलीॲरिक प्रांताची राजधानी व एक प्रमुख बंदर. ते प. भूमध्य समुद्रातील मार्जार्का बेटाच्या नैर्ऋत्य किनाऱ्यावर वसले असून त्या बेटाचे व्यापारी व प्रशासकीय केंद्र आहे. लोकसंख्या २,३४,०९८ (१९७०). बेटावरील महत्त्वाच्या स्थळांशी ते रस्ते, लोहमार्ग यांनी, तर बेटाबाहेरील स्थळांशी हवाई व जलमार्ग यांनी जोडलेले आहे. ख्रि. पू. २७६ च्या सुमारास मितेलस बॅलीॲरिक याच्या नेतृत्वाखाली रोमन लोकांनी येथे वसाहत केली. इ.स. पाचव्या शतकात व्हँडल टोळ्यांचे त्यावर आक्रमण झाले. त्यानंतर ते बायझंटिन साम्राज्याचा भाग बनले. आठव्या शतकात त्यावर अरबांची सत्ता होती. १२२९ मध्ये ॲरागॉनचा राजा पहिला जेम्स याने ते जिंकले. चौदाव्या शतकातही ते ॲरागॉनच्या राज्यातच होते. १४६९ च्या सुमारास ते स्पॅनिश सत्तेखाली आले. आरोग्यवर्धक हवा, परिसरातील संत्र्यांच्या बागा, शहराभोवतीची इतिहासकालीन तटबंदी व मूर राज्यकर्त्यांचे प्राचीन वास्तुविशेष यांमुळे हे नगर यूरोपीय पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. लाकडी सामान, भरतकाम, कलापूर्ण काचसामान, मातीची भांडी, रसायने, जहाजबांधणी इ. उद्योगधंदे येथे चालतात. येथून बदाम, जरदाळू, अंजीर, ऑलिव्ह तेल, मद्ये यांची निर्यात होते. येथील मध्ययुगीन गॉथिक कॅथीड्रल, अल्मुदायना हा मूर राजांचा राजवाडा, तेराव्या शतकातील सॅन फ्रॅन्सिस्को चर्च, सोळाव्या शतकातील नगरभवन तसेच अनेक सुंदर उद्याने, विहारपथ, कलावीथी व वस्तुसंग्रहालये इ. प्रेक्षणीय आहेत.
गाडे, ना.स.