पालखी : देवदेवता, धर्मगुरू, श्रीमंत, सरदार इत्यादिकांस खांद्यावर वाहून नेण्याचे एक वाहन. पालखीला मराठीत ‘मेणा’ व संस्कृतमध्ये ‘शिबिका’ वा ‘आंदोलिका’ म्हणतात. ‘मेणा’ हा शब्द मात्र प्रामुख्याने सन्मान्य व्यक्तींना वाहून न्यावयाच्या साधनालाच लावलेला दिसतो. पूर्वी मेण्याचा उपयोग पडदानशीन स्त्रिया जाण्यायेण्यासाठी करीत. प्राचीन काळापासून पालखीचे अनेक प्रकार रूढ होते. नहुषाने सप्तर्षींना पालखी वाहण्यास लावले, यांसारख्या कथा पुराणवाङ्म्यात आढळतात. अलीकडच्या काळात देवतांच्या मूर्ती वाहून
नेण्यासाठीच मुख्यतः पालखीचा उपयोग करतात. खेड्यांमधून ग्रामदेवतांच्या जत्रा भरतात, तेव्हा उत्सवमूर्तींना पालखीमध्ये ठेऊन त्यांची गावातून मिरवणूक काढतात.
पालखी ही लाकडाची असते. सामान्यतः तिला मागे व पुढे एक किंवा दोन दांडे असतात. मागेपुढे एकेक अथवा दोनदोन व्यक्ती खांद्यावर दांडे घेऊन पालखी वाहतात. गरजेनुरूप अधिकही व्यक्ती पालखी वाहतात. दांड्यांच्या टोकांना हत्ती, वाघ, घोडे इ. प्राण्यांची लाकडात कोरलेली किंवा धातुनिर्मित तोंडे बसविलेली असतात. रेशमी, छत, जरीचे गोंडे इत्यादींनी पालखी सुशोभित करतात. वृद्ध, अपंग, पायी फार चालू न शकणाऱ्या व्यक्तींना डोंगराळ प्रदेशात वाहून नेण्यासाठी पालखीसारख्या ‘डोली’ चा अथवा कावडीचा उपयोग करतात. महाराष्ट्रात भोई लोक पाखली वा मेणे वाहून नेत असत.
“