भागवतपुराण : हिंदूंच्या अठरा महापुराणांपैकी सर्वाधिक लोकप्रिय असे महापुराण. ते संस्कृतात आहे. हे नुसते भागवत वा श्रीमद्‌भागवत ह्या नावाने प्रसिद्ध आहे. ह्याची रचना बारा स्कंधांत करण्यात आली असून त्यात ३३२ अध्याय व सु. १८ हजार श्लोक आहेत. त्याचा दहावा खंड सर्वांत मोठा, तर बारावा सर्वांत लहान आहे. दहाव्या स्कंधाची पूर्वार्ध व उत्तरार्ध अशा दोन भागांत विभागणी करण्यात आली आहे. विष्णुचा अवतार कृष्ण हा भागवताचा नायक असून त्याच्या भक्तीचे गुणगान त्यात केलेले आहे म्हणून हे एक वैष्णव पुराण मानले जाते. त्रिगुणांच्या आधारे केलेल्या वर्गीकरणानुसार त्याचा समावेश सात्त्विक पुराणांच्या वर्गात होतो. ह्या महापुराणात दिलेल्या परंपरेनुसार ते वासुदेवाने ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवाने नारदाला, नारदाने व्यासांना, व्यासांनी शुकदेवाला आणि शुकदेवाने परीक्षित राजाला सांगितले. देवगिरीचा राजा रामदेवराव यादव (तेरावे शतक) ह्याचा करणाधिप असलेल्या हेमाडपंताचा आश्रित बोपदेव पंडित ह्याने भागवताची रचना केली, असे काही विद्वानांचे मत आहे. तथापि ह्या मताला फारशी मान्यता नाही. ह्या पुराणाच्या निर्मितिकालबद्दलही मतभेद आहेत.काही विद्वानांनी हा काळ इ. स. पू. तिसऱ्या शतकापर्यंत मागे नेलेला आहे. आचार्य बलदेव उपाध्यय ह्याच्या मते ह्या पुराणाची निर्मिती इ. स. च्या सहाव्या शतकात झाली, तर पां. वा. काणे ह्यांच्या मते ती इ. स. च्या नवव्या शतकात झाली.

दक्षिण भारतातील तीर्थक्षेत्रे, नद्या इत्यादींची तपशीलवार व प्राधान्य देऊन केलेली वर्णने पाहता, त्याची रचना दक्षिण भारतात, विशेषतः तमिळनाडूत झाली असावी, असे मत व्यक्त केले जाते, भक्ती हा भागवताचा मुख्य प्रतिपाद्य विषय असून ही भक्ती द्रविड देशात निर्माण झाली, अशा आशयाचा एक श्लोक भागवतमाहात्म्यात आढळतो. त्यामुळे भागवताची निर्मितीही द्राविड देशातच झाली असावी, असा तर्क केला जातो. तो श्लोक असाः

भक्ती स्वतःविषयी म्हणते –

“उत्पन्ना द्राविडे साहं वृद्धिं कर्णाटके गता l

                                  क्कचितक्कचिन्महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतां गता ll”                 (१.४८)

अर्थ : द्राविड देशात मी उत्पन्न झाले, कर्नाटकात वाढले, महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी वृद्ध झाले.

भागवताची एकाहून अधिक संस्करणे झाली असावीत, असेही दिसते.

सर्ग (जगाची निर्मिती), प्रतिसर्ग (प्रलय), वंश (राजवंश), मन्वंतरे (विशिष्ट कालखंड) आणि वंशा (श्या) नुचरित (ऋषिवंशातील वा राजवंशांतील व्यक्तींची चरित्रे) हे पुराणांचे पाच विषय मानलेले आहेत. तथापि भागवतपुराणाने पुराणांचे दहा विषय नमूद केले आहेत. ते असेः सर्ग, विसर्ग (जीवाची निर्मिती), स्थान (ब्रह्याडांचे वर्णन), पोषण (ईश्वराचा अनुग्रह), ऊती (कर्मवासना), मन्वंतरे (सृष्टिनियमांच्या मनूनामक अधिष्ठात्री देवतांच्या कारकीर्दी), ईशानुकथा (परमात्माच्या अवतारकथा), निरोध (प्रलय), मुक्ती आणि आश्रय (परब्रह्य). ह्या संदर्भात भागवतात आलेला श्लोक असा :

“अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः l

                                  मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रय ll”               (२.१०-१).

साध्यतत्त्व असलेला भगवान हा भागवताचा मुख्य विषय असून त्याच्या प्राप्तीसाठी भक्ती हे साधन होय, असे ह्या ग्रंथात सांगितले आहे. ही भक्ती कशी करावी, त्याचा भागवताने जो मार्ग सांगितला आहे, त्याला भागवत धर्म असे म्हणतात. भागवताच्या बारा स्कंधांत जे विषय आले आहेत, ते थोड्यकात पुढीलप्रमाणे :

प्रथम स्कंध : एकूण अध्याय सोळा. भागवतपुराणाची निर्मिती कशी झाली, त्याचे विवेचन. परीक्षिताचा जन्म व कर्तृत्व. शमीक ऋषीचा पुत्र शृंगी ह्याने परीक्षिताला दिलेला शाप. तक्षकाच्या दंशाने आपण मरणार हे कळल्यानंतर परीक्षिताने आपला पूत्र जनमेजय ह्याच्याकडे राज्यकारभार सोपवून सुरु केलेले प्रायोपवेशन. नारदमुनींचे चरित्र व द्वारकेचे वर्णनेही ह्या स्कंधात आलेले आहे.

द्वितीय स्कंध : एकूण अध्याय दहा. शुक्राचार्यांचे परिक्षितासाठी भागवतकथन सुरु. कृष्णावतरापर्यंतचे परमात्माचे अवतार. विराट पुरुषाचे वर्णन, पुराणांची दहा लक्षणे (विषय) ह्या स्कंधात सांगितिला आहेत. सृष्टीच्या उत्पत्तीसारखे विषय ह्यात आले आहेत. गुह्य असे ‘चतुःश्लोकी भागवत’ ही ह्या स्कंधात आहे.

तृतीय स्कंध : एकूण अध्याय तेहतीस. कौरव-पांडवकथा, कौरवाकडून पांडवांच्या झालेल्या छळाचे वर्णन, विदुर-मैत्रेय भेट, ब्रह्मदेवाच्या शरीरापासून स्वायंभुव मनू आणि शतरुपा ह्यांचा झालेला जन्म, विष्णूचे द्वारपाल जयविजय ह्यांचा हिरण्याक्ष व हिरण्याकश्यपू ह्या नावांनी दात्यकुलात झालेला जन्म. हिरण्याक्षाचा वरहरूपी भगवंताकडून झालेला वध, मनूने आपली देवहूती ही कन्या कर्दम ऋषीला अर्पण करणे, देवहूतीच्या पोटी जन्म घेतलेल्या पोटी जन्म घेतलेल्या कपिल मुनीने आपल्या मातेस सांख्यज्ञानाता केलेला उपदेश हे ह्या स्कंधातील काही विषय.

चतुर्थ स्कंध : ह्या स्कंधाचे अध्याय एकतीस. ह्यात स्वायंभुव मनूचा वंश, दक्षयज्ञाचा विध्वंस, ध्रुवचरित्र, पृथुचरित्र, वेन राजाची कथा, पुरंजन राजाची गोष्ट, वैराग्यवृत्तीमुळे होणारी मोक्षप्राप्ती ह्यांसारखे विषय आहेत.

पंचम स्कंध : एकूण अध्याय सव्वीस. ह्याचा बराचसा भाग गद्य आहे. मनुपुत्र प्रियव्रत ह्याचा वंशविस्तार, प्रियव्रताचा वंशज ऋषमदेव ह्याने ब्रह्यावर्त तेथे आपल्या पुत्रांना केलेला उपदेश, ऋषभदेवाचा पुत्र भऱत ह्याची कथा, सूष्टीवर्णन (त्यात पर्वत-नद्यांची रचन, विविध ठिकाणचे अधिपती आणि लोक, त्यांची उपासनादैवते, उपासनामंत्र इत्यादी).

षष्ठ स्कंध : एकूण अध्याय एकोणीस. स्वायंभुव मनूच्या वंशाचे वर्णन, अजामिळाची कथा, इंद्र-वृत्रासुराचे युद्ध, विश्वरुपाची कथा, मरुतांचे जन्म, पुसंवनव्रत इ. विषय ह्या स्कंधात आलेले आहेत.

सप्तम स्कंध : एकूण अध्याय पंधरा. ह्यात प्रल्हादचरित्र सांगितले असून वर्णाश्रमधर्माचे विवेचन केले आहे.

अष्टम स्कंध : एकूण अध्याय चोवीस. पुराणांच्या दहा विषयांपैकी मन्वंतर ह्या विषयांचे विवेचन ह्या स्कंधात केलेले आहे. गजेंद्रमोक्ष, समुद्रमंथन, बळीचा यज्ञ, मत्स्यावतारकथा आदी विषयही आहेत.

नवम स्कंध : एकूण अध्याय चोवीस. वैवस्वत मनूपासून झालेल्या सूर्य व चंद्र ह्या वंशांचे वर्णन ह्य संस्कृत आलेले आहे. प्रद्युम्न, पृषध्र, च्यवनऋषी, नाभाग, अंबरीष आदींच्या कथा दिलेल्या आहेत. भगीरथाने केलेल्या गंगावतरणाची कथाही ह्या स्कंधात आहे. विश्वामित्राची कथा, परशुरामाने केलेला क्षत्रियकुलसंहार हे विषयही त्यात अंतर्भूत आहेत.

दशम स्कंध : एकूण अध्याय नव्वद. पूर्वार्धात ४९, उत्तरार्धात ४१. भगवान गोपालकृष्णाचे चरित्र ह्या स्कंधात सविस्तरपणे दिलेले असून ते रसपूर्ण आहे. श्रीकृष्णाच्या बाळलीला, पूतना, शकटासूर, तृणावर्त ह्यांचा त्याने केलेला वध, यशोदेला त्याने घडविलेले विश्वरुपदर्शन, गोवर्धनोद्वार, कालियामर्दन, पुढे मथुरेत येऊन कृष्णाने केलेला कंसवध हयांसारखे विषय पूर्वार्धात आहेत. उत्तरार्धात कालयवनाची कथा, रुक्मिणी, जांबवती, सत्यभामा आदी आठ स्त्रियांशी श्रीकृष्णाचा झालेला विवाह तसेच भौमासुराच्या बंदिवासात पडलेल्या सोळा हजार राजकन्यांची त्याने केलेली सुटका व त्यांच्याशी केलेला विवाह, उषा व अनिरुद्ध ह्यांचा विवाह, नृगराजाची कथा, जरासंधाचा नाश, युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ, शिशुपालवध, सुदाम्याची कथा आदि विषय आहेत.

एकादश स्कंध : एकूण अध्याय एकतीस. हा स्कंध मुख्यतः अध्यात्मपर आहे. नारदाने वसुदेवास केलेला भागवतधर्माचा उपदेश तसेच श्रीकृष्णाने उद्धवाला केलेला उपदेश ह्यात आलेला आहे. यदुकुलक्षय तसेच श्रीकृष्णाचे निर्वाण ह्या स्कंधात दाखविलेले आहे.

द्वादश स्कंध : एकूण अध्याय तेरा. श्रीकृष्णानंतर भरतखंडात होऊन गेलेल्या राजांचा थोडक्यात वृत्तांत आणि सनातन वैदिक धर्माचे विवेचन ह्या स्कंधात आलेले आहे. उपसंहारात्मक असा हा खंड आहे. युगांची लक्षणे, भक्तीचे माहात्म्य, प्रलय ह्यांसारख्या विषयांचा परामर्शही ह्यात घेतलेला आहे. तक्षकदंशाने परीक्षिताचा मृत्यू, जनमेजयाने केलेले सर्पसत्र, वैशंपायनाचा शिष्य याज्ञवल्क्य ह्याची कथा, मार्कंडेय कथा, देवपूजेच्या तंत्रोक्त पद्धतीचे विवेचन, इतर पुराणांहून भागवताचे वेगळेपण ह्यांसारखे विषय आलेले आहेत.

इतर पुराणांतून अठरा महापुराणांची नावे सांगताना भागवतपुराणाचा निर्देश भागवत ह्या शब्दाने केला जातो, असे दिसते. तथापि सध्या श्रीमद्‌भागवतदेवीभागवत अशी दोन पुराणे आढळतात. त्या दोहोंपैकी महापुराण कोणते व उपपुराण कोणते ह्याबाबत सांप्रदायिकांत मतभेद आहेत. वैष्णव हे श्रीमद्भागवताला तर शाक्त देवीभागवताला महापुराण मानतात.

इतर कोणत्याही पुराणापेक्षा भागवतावर अधिक टीका झाल्या, हे भागवताच्या लोकप्रियतेचे एक गमकच होय. भागवताचा अर्थ लावणे ही विद्यावंतांच्या विद्येची कसोटी आहे, अशी म्हण रूढ झाली आहे. यावरून भागवतातील आशयाचे गांभीर्य व टीकांची आवश्यकताही स्पष्ट होते. विविध संप्रदायांच्या आचार्यांनी आपापल्या संप्रदायाला पोषक अशा टीका लिहिल्या असून काही टीका असांप्रदायिक वा स्वतंत्र स्वरूपाच्याही आहेत . अद्वैतवादी श्रीधरस्वामींची (सु. चौदावे शतक) भावार्थदीपिका ही टीका भागवतावरील उपलब्ध टीकांमध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते. भागवताच्या रचनेशी ज्यांचे नाव जोडले जाते, त्या स्वत: बोपदेवांनी हरिलीलामृत वा भागवतानुक्रमणी, मुक्ताफल आणि परमहंसप्रिया नावाचे तीन ग्रंथ भागवतावर लिहिले असल्याचा निर्देश आचार्य बलदेव उपाध्याय यांनी केला आहे . सुदर्शन सूरींची (सु. चौदावे शतक) शुकपक्षीया आणि त्यांचेच अनुयायी असलेल्या वीरराघवांची भागवतचंद्रिका या विशिष्टाद्वैती, वल्लभाचार्यांची आपल्या शुद्धाद्वैताला अनुसरणारी सुबोधिनी, निंबार्कमतानुयायी शुकदेवाचार्यांची सिद्धांतप्रदीप आणि द्वैती विजयध्वज यांची पदरत्नावली या टीका प्रसिद्ध आहेत . द्वैत मताचे प्रवर्तक श्रीमध्वाचार्य यांनी भागवततात्पर्यनिर्णय नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे. सनातन गोस्वामींची फक्त दहाव्या स्कंधावरील बृहद् वैष्णवतोषिणी, जीवगोस्वामींची क्रमसंदर्भ आणि विश्वनाथ चक्रवर्तींची सारार्थदर्शिनी या तीन टीका चैतन्यसंप्रदायाच्या आहेत. फक्त दहाव्या स्कंधाच्या पूर्वार्धावर लिहिलेली पाच हजार श्लोकांची श्रीहरिनामक कवीची हरिभक्तिरसायन नावाची पद्यबद्ध टीका प्रसिद्ध आहे. मराठीमध्ये एकनाथ महाराजांची अकराव्या स्कंधावरील ओवीबद्ध टीका एकनाथी भागवत या नावाने विख्यात असून कृष्णदयार्णवांची दहाव्या स्कंधावरील हरिवरदा ही ओवीबद्ध टीकाही प्रसिद्ध आहे. इतर आधुनिक भारतीय भाषांतूनही भागवताचे अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत.

यशवंत व्यंकटेश कोल्हटकर यांनी श्रीमद्भागवतादर्श… या मराठी ग्रंथात (१९२१) भागवतपुराणातील धर्म, तत्त्वज्ञान इ. विषयांचे विवेचन केले आहे. जे. मायर यांनी भागवतपुराणावरील जर्मन पुस्तकात (१९३१) त्या पुराणातील आर्ष रूपांचे विवेचन केले आहे. एस्. सुब्बाराव यांनी भागवतपुराणाचे इंग्रजी गद्यात भाषांतर केले असून ( १ ९ २८ ) त्यात अद्वैत, विशिष्टाद्वैत व द्वैत अशा तीन संप्रदायांना अनुसरून अर्थ दिले आहेत. स्वामी विज्ञानानंद यांनी केलेले इंग्रजी भाषांतर अलाहाबाद येथून १९२१ – २३ या काळात आणि जे. एम्. संन्याल यांनी केलेले इंग्रजी भाषांतर कलकत्ता येथून १९३०-३४ या काळात प्रकाशित झाले आहे . पं. टी. आर्. कृष्णाचार्य यांनी केलेली भागवताची सूची दोन भागांत प्रकाशित झाली आहे (१९३४ ). पी. एन्. सिन्हा यांचे भागवतातील महत्त्वाच्या भागांचे इंग्रजी भाषांतर स्टडी ऑफ दि भागवतपुराण ऑर एसोटेरिक हिंदुइझम (द्वि. आवृत्ती, १९५०) या नावाने प्रसिद्ध झाले आहे. विविध संशोधनपत्रिकांमधून भागवतावर बरेच लेख प्रकाशित झाले आहेत. या लेखांतून भागवताची हस्तलिखिते, दशम स्कंधाची गुजराती श्लोकावृत्ती, भागवतातील प्रक्षिप्ते, भागवताने गौडपादकारिकापरमार्थसार या ग्रंथांकडून केलेली उसनवारी, भागवताची भाषाशास्त्रीय वैशिष्ट्ये इ. विषयांची चर्चा आहे .

भारताच्या सांस्कृतिक जीवनावर भागवताचा फार मोठा प्रभाव पडला आहे. भागवतधर्म व भक्तिसंप्रदाय यांच्या दृष्टीने भागवत हा एक प्रमाणग्रंथच आहे. काव्याच्या दृष्टीनेही त्यातील वर्णने भावपूर्ण व रसात्मक आहेत. दहाव्या स्कंधातील वेणुगीत, गोपीगीत, युगलगीत इ . गीते प्रसिद्ध आहेत. त्याच स्कंधातील ‘रासपंचाध्यायी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाच अध्यायांत रासलीलेचे भावोत्कट वर्णन आहे. त्याच स्कंधातील भ्रमरगीताचा इतका प्रभाव होता, की त्याच्या अनुकरणाने हिंदी, संस्कृत इ. भाषांतून असंख्य भ्रमरगीते लिहिली गेली.

प्रचंड वाङ्मय लिहूनही मन:शांती न लाभलेल्या व्यासांना भागवताच्या लेखनामुळे मनःशांती लाभली, असे म्हटले जाते. भागवत ही व्यासांची समाधिभाषा आहे; भागवत हे वेदान्ताचे सार आहे; भागवत ही विद्येची परमावधी वा अंतिम मर्यादा आहे; शब्दप्रधान वेद, अर्थप्रधान पुराण व रसप्रधान काव्य या सर्वांचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता भागवतात आहे, यांसारख्या विधानांवरून भागवताचे माहात्म्य स्पष्ट होते. भागवताच्या पुस्तकाची षोडशोपचार पूजा करण्याची व भागवताची आरती म्हणण्याची पद्धत, भागवताचे सप्ताह-पारायण करण्याची भारतभर रूढ असलेली प्रथा इत्यादींवरूनही भागवताचे जनमानसातील महत्त्वपूर्ण स्थान ध्यानात येते.

संदर्भ : १. कोल्हटकर, यशवंत व्यंकटेश, श्रीमद्भागवतादर्श वा श्रीमद्भागवताचा उपसंहार, पुणे, १९२१.

२. दामोदर सावळाराम यंदे आणि मंडळी, संपा. सुलभ सार्थ-श्रीमद्भागवत भाग १ ते ७, मुंबई.

साळुंखे, आ. ह.