पा र्श्व ना थ : जैनांचे तेविसावे तीर्थंकर. राणी वामादेवी व राजा अश्वसेन हे त्यांचे मातापिता. पार्श्वनाथांचा जन्म काशी नगरीत झाला. महावीरांपूर्वी सु. २५० वर्षे म्हणजे इ.स.पू. ८५० च्या सुमारास पार्श्वनाथ होऊन गेले. अयोध्येचा राजा प्रसेनजित याच्या प्रभावती नावाच्या कन्येशी त्यांचा विवाह झाला होता. तिसाव्या वर्षी संसारत्याग करून पार्श्वनाथांनी संन्यासधर्म स्वीकारला. पार्श्वनाथ तप करीत असता पूर्वजन्मी वैरी असलेल्या व आता असुर झालेल्या कर्मठाने त्यांच्यावर दुष्टबुद्धीने पाण्याचा भयंकर वर्षाव केला परंतु पूर्वजन्मी उपकृत झालेल्या नागराजाने पार्श्वनाथांवर आपल्या सात फणांची छत्री धरली व त्यांचे रक्षण केले. पार्श्वनाथ या तीर्थंकरांचे चिन्ह सप्तफणाधारी नाग असून त्यांच्या मूर्तीच्या डोक्यावर तो कोरलेला असतो. केवलज्ञानप्राप्तीनंतर पार्श्वनाथांनी धर्माचा उपदेश केला व अनुयायांनी संघटना उभारली. साधू, साध्वी, श्रावक व श्राविका असा चतुर्विध संघ त्यांच्या अनुयायीवर्गात होता. पार्श्वनाथ वयाच्या १०० व्या वर्षी बिहारमधील सम्मेतशिखरावर मोक्षास गेले. ती जागा आज ‘पारसनाथ टेकडी’ म्हणून प्रसिद्ध आहे. पार्श्वनाथांच्या अनेक मूर्ती भारतात आढळतात.
पार्श्वापत्यीय (पासावचिज्ज) नावाचा साधुसंघ महावीरांच्या काळी होता. महावीरांचे मातापिता याच संप्रदायाचे अनुयायी होते. महावीरांनीही याच संप्रदायाची दीक्षा घेतली. महावीरांच्या सुधारित संप्रदायाला ‘जिनकल्प’ आणि पार्श्वनाथांच्या प्राचीन संप्रदायाला ‘स्थविरकल्प’ म्हणतात. पार्श्वनाथांनी ‘चातुर्यामसंवर’ म्हणजे अहिंसा, सत्य, अचौर्य व अपरिग्रह ही चार व्रते प्रतिपादन करणारा ‘चातुर्याम धर्म’ शिकविला. महावीरांनी त्यांत ब्रह्मचर्यव्रताची भर घालून आपली पाच महाव्रते किंवा ‘पंचयामिक धर्म’ सांगितला. यांशिवाय प्रतिक्रमण म्हणजे स्वपापांची कबुली व प्रायश्चित्त घेणे, नग्नव्रत, संन्यास व तप या गोष्टींवर महावीरांनी विशेष भर दिला. पार्श्वनाथांचा व महावीरांचा असे दोन्ही संप्रदाय काही काळ निराळे होते परंतु महावीरांनी त्यांना नंतर एकत्र केले असावे. उत्तरकालीन दिगंबर व श्वेतांबर हे संप्रदाय पूर्वीचे अनुक्रमे महावीरांचे व पार्श्वनाथांच्या पूर्वीचे बावीस तीर्थंकर पौराणिक आहेत, असे आधुनिक विद्वान मानतात पण पार्श्वनाथ व महावीर यांच्या ऐतिहासिकतेबद्दल मात्र सर्वांचे एकमत आहे. पार्श्वनाथ व महावीर या दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्व लाभलेल्या ऐतिहासिक महापुरुषांनीच जैन धर्मास निश्चित असा आकार प्राप्त करून दिला.
पहा : तीर्थंकर.
संदर्भ : 1. Bloomfield, M. The Life and Stories of the Jain Saint Parsvanath, Baltimore, 1919. 2. Schubring, Walter Trans. Sen, Amulya Chandra Burke, T.C. The Religion of athe Jainas, Calcutta, 1966.
३. कोसंबी, धर्मानंद, पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म, मुंबई, १९४९.
पाटील, भ. दे.