पा र्थि या : आशिया खंडातील एक प्राचीन देश. पूर्वी हा इराणी साम्राज्याचा एक प्रांत होता. पार्थियाच्या भौगोलिक सीमा निश्चित नाहीत तथापि हा प्रदेश एल्बर्झ पर्वतश्रेणीपासून हेरातपर्यंत पसरला होता. आधुनिक काळात खोरासान (इराण) या नावाने हा प्रदेश प्रसिद्ध असून तो कॅस्पियन समुद्राच्या आग्नेयीस व एल्बर्झ पर्वत व गुर्गानच्या दक्षिणेस वसला आहे. दऱ्याखोऱ्यांचा सुपीक प्रदेश म्हणून त्याची ख्याती आहे. या प्रदेशातील रहिवाशांना पार्थियन ही संज्ञा देण्यात येते. इ.स.पू. तिसरे शतक ते इ.स.चे तिसरे शतक या काळात इथे एक समृद्ध राज्य व संस्कृती नांदत होती. पार्थियन लोकांच्या मूलस्थानाविषयी निश्चित माहिती मिळत नाही. प्राचीन इराणमधील ही एक भटकी जमात असून बायबलमध्ये  उल्लेखिलेले प्रसिद्ध घोडेस्वार व तीरंदाज असणारे लोक म्हणजेच पार्थियन असून ते सिथियन वंशातील असावेत, असे जस्टिन, स्ट्रेबो व इतर काही तज्ञ म्हणतात. सिथियन वंशात पुढे ते एकरूप झाले असावेत, असाही तज्ञांचा कयास आहे. यांचा उल्लेख पहिल्या डरायसच्या बेहिस्तून शिलालेखात पार्थव असा इ.स.पू. ५२० मध्ये केला आहे. पर्स हे त्याचे अपभ्रंश रूप असावे व त्यावरूनच पुढे पर्शियन हा शब्द आला असावा. काही तज्ञांच्या मते ऋग्वेदात पृथू राष्ट्राचा उल्लेख आढळतो, तो पार्थियनांसंबंधीचाच असावा. सुरुवातीस हा इराणचा एक भाग होता व नंतर मॅसिडोनियाच्या विशेषतः अलेक्झांडरच्या  क्षत्रपांच्या आधिपत्याखाली गेला. पहिल्या सेल्युकस (इ.स.पू. ३१२ – २८१) व अँटायओकस (इ.स.पू. २८० – २६२) यांच्या वेळी अनेक भटक्या टोळ्या मध्य आशियातून पार्थियात आल्या. त्यांपैकी पर्णी ही एक प्रमुख भटकी जमात होती. तिला ग्रीक दहाई म्हणत. कदाचित या किंवा सिथियन लोकांतूनच पार्थियन लोक पुढे आले असावेत.

आर्सासीझ (इ.स.पू. २४९-२४७) या तरुणाने डायॉडोटस या सिल्युसिडी राजाचा क्षत्रप अँड्रागोरस याच्याविरुद्ध बंड करून त्यास ठार मारले व पार्थियन राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्याने झपाट्याने आसपासचा मुलूख पादाक्रांत करून राजधानी अस्सक येथे स्वतःस राज्याभिषेक करून घेतला. त्याने आरसॅसिडी वंशाची स्थापना केली. या वंशाने इ.स.पू. २५० ते इ.स. २२६ पर्यंत पार्थियावर अधिसत्ता गाजविली. या वंशात अनेक राजे झाले. त्यांपैकी आर्सासीझशिवाय पहिला टिरिडेटीझ (इ.स.पू. २४७ – २११), दुसरा आर्सासीझ (इ.स.पू. २१०-१९१), फ्रियापिटिअस (इ.स.पू. १९१-१७६), पहिला फ्रेएटीझ (इ.स.पू. १७६-१७१), पहिला मिथ्रिडेटीझ (इ.स.पू. १७१-१३८), दुसरा फ्रेएटीझ (इ.स.पू. १३८-१२७), पहिला आर्टबेनस (इ.स.पू. १२७ – १२४), हिमेरस (इ.स.पू. १२४-१२३), दुसरा मिर्थिडेटीझ (इ.स.पू. १२३ – ८८), दुसरा आर्टबेनस (इ.स.पू. ८८ – ७७), पहिला सेनॅट्रुसीझ (इ.स.पू. ७७ – ७०), तिसरा फ्रेएटीझ (इ.स.पू. ७० – ५७), तिसरा मिथ्रिडेडीझ (इ.स.पू. ५७ – ५४), पहिला ओरोडीस (इ.स.पू. ५४-३७) वगैरे राजे प्रसिद्ध होत. अंतर्गत कलह, प्रशासनातील गैरशिस्त व केंद्रीय नियंत्रणाचा अभाव यांमुळे इसवी सनाच्या पहिल्या शतकात या साम्राज्यास उतरती कळा लागली. तत्पूर्वी टिरिडेटीझ व दुसरा आर्सासीझ या दोन राजांनी पार्थियन साम्राज्याचा विस्तार केला. इ.स.पू. पहिल्या शतकात पार्थियन साम्राज्याचा विस्तार केला. इ.स.पू. पहिल्या शतकात पार्थियन साम्राज्य युफ्रेटीसपासून अफगाणिस्तानच्या पलीकडे पूर्वेस सिंधुनदीपर्यंत व ऑक्सस (अमुदर्या) पासून दक्षिणेस हिंदुमहासागरापर्यंत पसरले होते. इ.स.पू. ५३ मध्ये पार्थियन राजा पहिला ओरोडीस याने रोमनांचा पराभव करून आशिया व ग्रीक-रोमन व्यापारी मार्गांवर आधिपत्य प्रस्थापिले आणि मार्कस लिसिनिअस क्रॅसस या रोमन मुत्सद्याचा हरान येथे पराभव करून सिरिया व आशिया मायनरवर स्वारीचा बेत रचला. डरायस हिस्टॅस्पिस जेव्हा बॅबिलनमध्ये होता, त्या वेळी पार्थियनांनी इतर जमातींच्या मदतीने आर्सासीझच्या नेतृत्वाखाली डरायसविरुद्ध बंड केले.

पहिला मिथ्रिडेटीझ (इ.स.पू. १७१ – १३८) याने मीड, इराणी आणि बॅक्ट्रियन लोकांचा पराभव करून आपला अंमल अलेक्झांडरने मिळविलेल्या प्रदेशाच्या पलीकडे भारतात वाढविला, तसेच बॅबिलोनिया आणि मेसोपोटेमिया हे प्रदेश आपल्या साम्राज्यास जोडले. त्याच्या साम्राज्याची गंगानदी ही पूर्वेकडील आणि युफ्रेटीस ही पश्चिमेकडील शेवटची सीमारेषा होती. पार्थियन साम्राज्याचा शेवटचा बलवान राजा आर्टबेनस. तथापि इ.स. २२० मध्ये आर्टझर्क्सीझ किंवा आर्दशिर या मांडलिक राजाने पार्थियन अंमलाविरुद्ध उठाव केला. त्यातून तीन मोठी युद्धे झाली आणि हॉरमझ येथे पाचव्या आर्टबेनसचा पराभव झाला (इ.स. २२६) व पुढे या वंशात पराक्रमी व नाव घेण्यासारखा राजा झाला नाही. हे साम्राज्य इराणच्या राज्यात पुढे विलीन झाले.

पार्थियन ही एक लढाऊ आणि धाडसी जमात होती. त्यांच्यात नेमबाजीत निष्पात असलेले अनेक तीरंदाज होते. यामुळे तीरंदाज-घोडेस्वार म्हणून त्यांचा सर्वत्र नावलौकिक होता. त्यांच्या सैन्याचा घोडदळ हा महत्त्वाचा भाग असे. पायदळात बहुतेक गुलाम सैनिक असत. पार्थियन हे सिथियन होते किंवा नाही, याबद्दल जरी दुमत असले, तरी त्यांच्या चालीरीती, भाषा, रूढी व धार्मिक संकेत यांवर सिथियन छाप आढळते. त्यांची भाषा पेहलवी होती. त्यांच्या संस्कृतीवर काही अंशी ग्रीक संस्कृतीचीही छाप दिसते. सिथियन लोकांच्या वर्चस्वामुळे या लोकांत झोरोस्ट्रिअन धर्म प्रचलित होता. अस्सल येथील राजवाड्यात अग्निपूजा चाले. सूर्याची पूजा मिथ्र या नावाखाली केली जाई. मागी या पुरोहित वर्गाचे समाजात प्राबल्य होते. पार्थियनांना खजुरापासून केलेली दारू व संगीत प्रिय होते. पार्थियन लोकांच्या पोशाखात मिडियन झगा, पठाणांप्रमाणे घोळदार पायजमे व डोक्यावर फेट्यासारखे कापड गुंडाळलेले असे. बहुतेक पुरुष दाढी वाढवीत, लांब भाला हे त्यांचे प्रमुख हत्यार असे. पार्थियन राजांची अनेक नाणी मिळाली असून नाण्याच्या एका बाजूस धनुष्यधारी राजाची आकृती व दुसऱ्या बाजूस ग्रीक अथवा पेहलवी भाषेत मजकूर आढळतो. या वंशाची सोन्याची नाणी मिळत नाहीत पण चांदीची व तांब्याची नाणी मुबलक उपलब्ध झाली आहेत. त्यांच्या एकबॅटना, सेल्युशिया, टेसिफॉन आणि हेकताम्पलास या चार शहरांतील इमारती वगळता वास्तुशास्त्रात फारशी भर त्यांनी घातलेली आढळत नाही. त्यांच्या नंतरच्या बॅबिलनियन मुद्रालेखांतून त्यांच्या इतिहासाची काही माहिती मिळते. वरील शहरांतील भग्न अवशेष अद्यापि इराकमध्ये आढळतात. या मुद्रा ब्रिटिश वस्तुसंग्रहालयात ठेवल्या आहेत.

संदर्भ : 1.  Cook, S.A. &amp Others, Ed., The Cambridge Ancient History, Vol.  IX, Cambridge, 1951 2.  Debevoise, N.C. Political History of Parthia, London, 1938. 3.  Lozinski, P.B. The Original Homeland of the Parthians, New York, 1959. 4.  Sykes, Percy, A History of Persia, Vol.I, New York, 1969. 

देशपांडे, सु.र.