पारे, आंब्रवाझ :(?- १५१० – २० डिसेंबर १५९०). फ्रेंच शस्त्रक्रियाविशारद. त्यांना फ्रान्समधील आधुनिक शस्त्रक्रियाविज्ञानाचे जनक मानण्यात येते. सुविख्यात शस्त्रविशारद ⇨ जॉन हंटर आणि ⇨ जोसेफ लिस्टर यांच्या एवढेच मानाचे स्थान या शास्त्रात त्यांना दिले जाते. शस्त्रक्रियाविज्ञानाच्या सर्वसाधारण प्रगतीत भर घालणे, विशेषेकरून युद्धातील व इतर जखमांच्या उपचारांत सुधारणा घडवून आणणे यांविषयी ते प्रसिद्ध आहेत.
त्यांचा जन्म फ्रान्समधील बोर्ग-हेर्से (आता लव्हाल या गावाचा एक भाग) येथे झाला. १५२९ मध्ये ते पॅरिसमधील होटेल-ड्यू नावाच्या जागतील सर्वांत जुन्या रुग्णालयात शिकाऊ विद्यार्थी म्हणून दाखल झाले. १५३७ मध्ये ते लष्करात शस्त्रविशारद म्हणून नोकरीस लागले. १५३६ – ४५ या काळातील इटालियन स्वाऱ्यांच्या वेळी त्यांना लष्करी शस्त्रवैद्यकाविषयीचा भरपूर अनुभव प्राप्त झाला व त्यावर आधारित असा एक महान ग्रंथ त्यांनी १५४५ मध्ये प्रसिद्ध केला. हा ग्रंथ त्यांनी त्या काळच्या परंपरेप्रमाणे लॅटिनमध्ये न लिहिता फ्रेंचमध्ये लिहिला व त्यामुळे तो व्यवहारोपयोगी ठरून पारे यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. १५५२ मध्ये त्यांची दुसऱ्या हेन्रींचे शस्त्रवैद्य म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर दुसरे फ्रान्सिस, नववे चार्ल्स आणि तिसरे हेन्री यांचेही ते शस्त्रवैद्य होते.
त्यांच्या काळात जखमांवरील विशेषेकरून युद्धजन्य जखमांवरील शस्त्रक्रियांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले होते. रक्तस्राव थांबवण्याकरिता तुटलेली रोहिणी बंधाने बांधण्याची पद्धत काही वर्षांपासून ज्ञात होती परंतु हे बंधन-तंत्र पद्धतशीर आणि व्यवहारोपयोगी बनविण्याचे श्रेय पारे यांनाच द्यावे लागते. बंदुकीच्या गोळीच्या किंवा तोफगोळ्याच्या जखमा विषारी असतात व त्याकरिता त्या उकळत्या तेलाने भाजल्या पाहिजेत असा समज त्यांच्या काळात फार दृढ होता. एकदा त्यांना उकळते तेल मिळू शकले नाही व त्यांना इतर उपचारांचा अवलंब करावा लागला. यामुळे उकळत्या तेलाशिवाय जखमा अधिक चांगल्या बऱ्या होऊ शकतात हे त्यांच्या ध्यानात आले व त्यांनी ही पद्धत पुढे उपयोगात आणली.
ते अवयवच्छेदन शस्त्रक्रियेत निष्णात होते, तसेच कृत्रिम अवयव बनविण्यातही तरबेज होते. कृत्रिम डोळा तयार करून तो वापरण्याचे तंत्र त्यांनी शोधले व ते लोकप्रिय करण्यात पुढाकार घेतला. अंतर्गळावरील इलाजाकरिता पट्टा बांधण्याचे तंत्र त्यांनीच शोधले. न्यायवैद्यकातील पहिले शवविच्छेदन करणारे शास्त्रज्ञ पारे हेच होत. कष्टप्रसूतीच्या एका प्रकारात गर्भ बाहेरून फिरवून प्रसूती सुलभ करता येते, हे त्यांनी दाखविले.
एखादा मरणोन्मुख रोगी बरा झाल्यावर त्यांचे अभिनंदन करणाऱ्यांना ते म्हणत ‘मी फक्त उपचार केला, देवाने त्याला बरे केले’. त्यांचे हे सुप्रसिद्ध वाक्य त्यांच्या पुतळ्यावर कोरून ठेवण्यात आले आहे.
शरीररचनाशास्त्र, शस्त्रविज्ञान, प्रसूतिशास्त्र, प्लेग आणि जखमांवरील उपचार हे त्यांच्या लेखनाचे विषय होते. १५७५ मध्ये त्यांच्या लेखांचा एकत्रित संग्रह प्रसिद्ध करण्यात आला. ते पॅरिस येथे मरण पावले.
ढमढेरे, वा.रा. भालेराव, यं.त्र्यं.