अभियांत्रिकी : निसर्गातून मिळू शकणाऱ्या सर्व प्रकारच्या ऊर्जांचा व कच्चा मालाचा उपयोग करून मनुष्याच्या जीवनास अधिक उपयुक्त असणारी साधने उत्पन्न करण्याच्या व त्यांचे नियंत्रण करण्याच्या तंत्रास’अभियांत्रिकी’ म्हणतात. रूळमार्गी गाडी, विमान, प्लॅस्टिक, कृत्रिम धाग्याचे कापड, दूरध्वनी, रेडिओ, विविध यंत्रे, रंग इ. नेहमी वापरात असणाऱ्या वस्तू अभियांत्रिकीय तंत्रांची दृश्य प्रतीकेच आहेत.

निरनिराळ्या विज्ञानशाखांतील सिद्धांतांचे अध्ययन करून त्यांचा व्यावहारिक कार्यासाठी उपयोग करण्याचे काम अभियंता करतो. याकरिता त्याला गणित व भौतिकी यांसारख्या मूलभूत शास्त्रांच्या ज्ञानाबरोबरच आरेखन, सुतारकाम, लोहारकाम यांसारख्या व्यावहारिक कलांचे प्रात्यक्षिक शिक्षण घ्यावे लागते.

 प्राचीन काळी भारतात अभियांत्रिकीला ‘शिल्प’ हा शब्द योजलेला आढळतो. भृगुसंहितेत शिल्पासंबंधी ९ शास्त्रे व त्यांत अंतर्भूत असलेल्या ३२ विद्या व ६४ कला आहेत. ही शास्त्रे आणि त्यांतील विद्या खाली दिल्या आहेत :

 

१.कृषिशास्त्रात – वृक्षविद्या, पशुविद्या व मनुष्यविद्या.

२.जलशास्त्रात – संसेचनविद्या, संहरणविद्या व स्तंभनविद्या.

३.खनिजशास्त्रात – दृतिविद्या, भस्मीकरणविद्या, संकरविद्या व पृथक्करणविद्या.

४.नौकाशास्त्रात-तरीविद्या, नौविद्या व नौकाविद्या.

५.रथशास्त्रात-अश्वविद्या, पथविद्या, घंटापथविद्या व सेतुविद्या.

६.अग्रियाशास्त्रात-शकुंतविद्या व विमानविद्या.

७.वेश्मशास्त्रात-वासोविद्या, कुट्टीविद्या, मंदिरविद्या व प्रासादविद्या.

८.प्राकारशास्त्रात-दुर्गविद्या, कूटविद्या, आकरविद्या व युद्धविद्या.

९.नगररचनाशास्त्रात-आपणविद्या, राजगृहविद्या, देवालयविद्या, सर्वजनवासविद्या व वनोपवनविद्या.

 भारत इतिहास संशोधक मंडळाने प्रसिद्ध केलेल्या कृ. वि. वझे यांच्या हिंदी शिल्पशास्त्र (१९२८) या पुस्तकात शिल्पासंबंधी सविस्तर माहिती दिलेली आहे.

आधुनिक अभियांत्रिकीच्या विविध प्रकारच्या विशिष्ट शाखांची प्रगती गेल्या २०० वर्षांत झाली. त्यापूर्वी रस्ते, पूल, कालवे किंवा युद्धोपयोगी बांधकामे एवढ्यापुरतेच अभियांत्रिकीचे कार्यक्षेत्र मर्यादित होते. सतराव्या व अठराव्या शतकांत विज्ञान व तंत्रविद्यांत झालेल्या प्रगतीमुळे अभियांत्रिकीच्या स्थापत्य, यांत्रिक, खाणकाम व धातुविज्ञानीय, रासायनिक आणि विद्युत् अशा पाच प्रमुख शाखा निर्माण झाल्या.  विज्ञान व तंत्रविद्येत जसजशी अधिक प्रगती होत गेली तसतशा या शाखांतून स्वतंत्र उपशाखा निर्माण झाल्या. उदा., यांत्रिक अभियांत्रिकीमधून स्वयंचल (मोटार) अभियांत्रिकी व वैमानिकीय अभियांत्रिकी अशा विशिष्ट विषयांच्या शाखा निघाल्या. या शाखांची कार्यक्षेत्र अर्थात अगदी काटेकोरपणे सांगता येणे शक्य नाही. काही शाखा एकमेकांना पूरक आहेत, तर काही शाखा अगदी विशिष्ट विषयांनाच वाहिलेल्या आहेत. स्थापत्य-अभियंत्याला बांधकामात उपयोगी पडणाऱ्या सर्व यंत्रसामग्रीबद्दल माहिती असणे आवश्यक असते तर वस्त्रनिर्मिती-अभियंत्याला रसायनशास्त्र व यांत्रिक अभियांत्रिकी या विषयांचे ज्ञान असणे जरूर आहे. खाणकाम अभियंत्याला भूविज्ञानाचे ज्ञान अत्यावश्यक असते.

अभियांत्रिकीच्या प्रचलित शाखांच्या कार्यक्षेत्राची कल्पना खालील कोष्टकावरून येईल :

अभियांत्रिकीच्या विविध शाखा, त्यांची कार्यक्षेत्रे व त्यांच्याद्वारे उपलब्ध होणारी उत्पादने

शाखा

कार्यक्षेत्र

उत्पादन

अणुकेंद्रीय अभियांत्रिकी

अभियांत्रिकीय भौतिकी

आरोग्य-अभियांत्रिकी

अणुकेंद्रीय ऊर्जेचे उत्पादन. किरणोत्सर्गी द्रव्यांचा उपयोग.

भौतिकीमधील नवीन शोधांचा अभियांत्रिकीय समस्या सोडविण्यासाठी उपयोग.

शुद्ध पाण्याचा पुरवठा, भुयारी गटाराचे अभिकल्प व बांधकाम. अपशिष्ट पदार्थाचा निर्यास.

अणुकेंद्रीय विक्रियक. अणुकेंद्रीय विषयातील उपकरणे.

ट्रँझिस्टर, लेसर, मेसर इ.

धरणे, विहिरी, नळकाम.

मलमूत्र-संस्करणाची यंत्रसामग्री.

 


अभियांत्रिकीच्या विविध शाखा – पुढे चालू

इलेक्ट्रॉनिय अभियांत्रिकी

इलेक्ट्रॉनीय सामग्रीचे उत्पादन, विकास व उपयोग.

रेडिओ, रडार, दूरचित्रवाणी, संगणक (गणकयंत्र),इलेक्ट्रॉनीय उपकरणे.

औद्योगिक अभियांत्रिकी

औद्योगिक प्रक्रियांचे शास्त्रीय व्यवस्थापन. कारखान्यांचीव्यवस्था माणसे व सामग्री यांचा योग्य समन्वय.

मोटारगाड्या, गृहोपयोगी उपकरणे, कापड अशा मोठ्या प्रमाणावर उत्पादित केल्या जाणाऱ्या वस्तू.

कृषी अभियांत्रिकी

शेतजमिनीचा विकास, शेतीच्या पद्धतीत सुधारणा,शेतजमिनीचे धूप-नियंत्रण, सिंचाई.

शेतीसंबंधीची बांधकामे व यंत्रसामग्री.

खनिज तेल अभियांत्रिकी

खनिज तेलाच्या साठ्यांचा शोध, तेलविहिरी खणणे,उत्पादित तेल व नैसर्गिक वायू यांची वाहतूक वसाठवण.

खनिज तेलापासून मिळणारे विविध रासायनिक पदार्थ,नैसर्गिक इंधन-वायू.

खाणकाम अभियांत्रिकी

खनिजांचा शोध करणे ती जमिनीतून बाहेर काढणे त्यांवर प्रक्रिया करणे.

लोखंड, तांबे वगैरे धातूंची धातुकेॲस्बेस्टस, ग्रॅफाइटअशी अधातवीय खनिजे दगडी कोळसा.

धातुविज्ञानीय अभियांत्रिकी

धातुकांपासून धातूंचे निष्कर्षण, धातूंचा विविध कार्यासाठी विकास करणे व कसोट्या घेणे.

सर्व प्रकारच्या शुद्ध धातू आणि मिश्रधातू.

नाविक वास्तुशिल्प व अभियांत्रिकी

जहाजांचे अभिकल्प व बांधणी.

प्रवासी व मालवाहू जहाजे, पाणबुड्या, युद्धनौका,बॅथिस्कॅफ.

प्रदीपन अभियांत्रिकी 

प्रकाशयोजना, साधनसामग्री व त्यांचा अभिकल्प. 

मोठे रस्ते, नाटकगृहे, क्रीडांगणे, कारखाने अशाठिकणाची प्रकाशयोजना. 

मृत्तिका अभियांत्रिकी 

अपघर्षक, विटा पोर्सेलीन अशा अधातवीय पदार्थांचेउत्पादन व विकास. 

विद्युत् निरोधक, इलेक्ट्रॉनीय साहित्य, जेट व रॉकेटएंजिनातील काही भाग. 

यांत्रिक अभियांत्रिकी

यांत्रिक शक्तीचे उत्पादन व उपयोग. एंजिनांचा अभिकल्प,बांधणी व चाचणी. सर्वसाधारण यंत्रनिर्मिती.

सर्व प्रकारची एंजिने, यंत्रे व उपकरणे. 

रासयनिक अभियांत्रिकी

रासायनिक प्रक्रियांचा विकास करणे. कच्च्या रासायनिकमालापासून उपयुक्त वस्तूंचे उत्पादन करणे.

स्फोटक द्रव्ये, खते, रंग, प्लॅस्टिक, रबर, वैद्यकीयरसायने इ. 

वस्त्र अभियांत्रिकी

वस्त्र-निर्मितीसाठी यांत्रिक व रासायनिक अभियांत्रिकीतत्त्वांचा उपयोग.

नैसर्गिक व कृत्रिम धागे व त्यांपासून बनलेले कापड. 

वास्तुशिल्प अभियांत्रिकी

निरनिराळ्या इमारतींच्या योजना तयार करणे व त्याबांधणे.

नाट्यगृहे, बोलपटगृहे, रुग्णालये, बाजार, बँकांच्याइमारती इ. 

वाहतूक अभियांत्रिकी

वाहतुकीचे मार्ग आखणे व ते बांधणे व त्यांची देखभाल ठेवणे.

हमरस्ते, रूळमार्ग, पूल, विमानतळ व तेथील विशेषइमारती. 

विद्युत् अभियांत्रिकी

विद्युत् शक्तीचे प्रेषण, वितरण. विद्युत् सामग्रीचे उत्पादनव विकास. विजेचा उपयोग

विद्युत् जनित्रे, चलित्रे, रोहित्रे, प्रेषण, नियंत्रण-साहित्य इ. 

वैमानिकीय व अवकाश अभियांत्रिकी

विमाने व अवकाशयानांचे अभिकल्प. वातविवरासारख्याचाचणी-सामग्रीचे अभिकल्प व बांधणी.

विमाने, हेलिकॉप्टर, रॉकेट, अवकाशयाने इ. 

संदेशवहन अभियांत्रिकीसैनिकी अभियांत्रिकी

संदेशवहनाच्या विविध पद्धतींचे अभिकल्प व विकास.युद्धोपयोगी साहित्याचे उत्पादन. लष्करी उपयोगाचेपूल, रस्ते वगैरे बांधकामांचा अभिकल्प व विकास.

तारायंत्र, दूरध्वनी, दूरमुद्रक, संदेशवहन उपग्रह इ.विविध प्रकारची शस्त्रे, स्फोटक पदार्थ, प्रक्षेपणास्त्रे. 

स्थापत्य अभियांत्रिकी

सर्वसाधारण बांधकामांचे अभिकल्प व प्रत्यक्ष बांधकाम,नगररचना, पाणीपुरवठा.

इमारती, पूल, धरणे, कालवे, बोगदे, रूळमार्ग,विमानतळ इ. 

स्वयंचल अभियांत्रिकी

स्वयंचलित वाहनांचा व त्यांना लागणाऱ्या भागांचाअभिकल्प व उत्पादन.

मोटारगाड्या, स्कूटर, ट्रॅक्टर इ. वाहने 

 

अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या व्यक्तीस विविध प्रकारची कामे करावी लागतात. अर्थात ज्या विशिष्ट शाखेतील शिक्षण त्याने घेतलेले असेल, त्यावर त्या कामाचे स्वरूप अवलंबून असते. कारखाने, धरणे, पूल अशा प्रकारच्या बांधकामांचे मार्गदर्शन करणे व त्याकरिता योग्य मालाची व सामग्रीची निवड करणे एखाद्या कारखान्यातील विशिष्ट उत्पादनाकरिता अभिकल्प (डिझाइन) व व्यवस्थापन यांसंबंधी सल्ला देणेविशिष्ट कार्याकरिता एखादे यंत्र बनवणे नवीन तंत्रांचा उपयोग करून प्रचलित

कार्यपद्धतीत सुधारणा घडवून आणणे, अशा प्रकारची कामे अभियंत्यांना करावी लागतात. यांशिवाय एखाद्या औद्योगिक प्रक्रियेवर देखरेख ठेवणे व योग्य दुरुस्तीसंबंधी सूचना करणे उपलब्ध सामग्रीचा जास्तीत जास्त कार्यक्षमतेने उपयोग करणे उत्पादित यंत्रसामग्रीच्या विक्रीकरिता ग्राहकांना त्या यंत्रसामग्रीचा अभिकल्प, रचना, कार्यपद्धती व देखभाल यांसंबंधी माहिती देणे कच्च्या मालाची तपासणी करणे व यंत्रसामग्रीच्या कार्यक्षमतेची वारंवार चाचणी घेणे अशा स्वरूपाची कामेही अभियंते करतात.

अमेरिका व ब्रिटन यांसारख्या देशांप्रमाणेच भारतामध्येही काही अभियांत्रिकीय व्यवसाय करण्यासाठी सरकारी परवाना आवश्यक असतो. सर्वसाधारणपणे समाजाच्या आरोग्यास, सुरक्षिततेस व मालमत्तेस धोका होण्याचा संभव असेल अशा स्वरूपाचा अभियांत्रिकीय व्यवसाय करण्यासाठी अभियंत्याला सरकारी परवाना असणे आवश्यक आहे, असे ठरविण्यात आलेले आहे. उदा., विद्युत् सामग्रीची स्थापना करणे, इमारतीचा वास्तुशिल्पदृष्ट्या आराखडा बनविणे.

अभियांत्रिकीच्या निरनिराळ्या शाखांतील शिक्षणक्रम व संघटना यांसंबंधीची माहिती त्या त्या शाखेच्या स्वतंत्र नोंदीत दिलेली आहे.

पहा : अणुकेंद्रीय अभियांत्रिकी उत्पादन अभियांत्रिकी उद्योग अभियांत्रिकीकृषि अभियांत्रिकी खाणकाम धातुविज्ञान नाविक वास्तुशिल्पनाविक अभियांत्रिकीप्रदीपन अभियांत्रिकी स्वयंचल अभियांत्रिकी यांत्रिक अभियांत्रिकी रासायनिक अभियांत्रिकी विद्युत् अभियांत्रिकी वैमानिकीय अभियांत्रिकीसंदेशवहन अभियांत्रिकी सैनिकी अभियांत्रिकी.

ओक, वा. रा. भदे, व. ग.