पारियात्र : पारीपात्र, पारिपात. सात कुलपर्वतांपैकी एक पर्वत. याच्या स्थाननिश्चयाविषयी विद्वानांत मतभेद आहेत. बौधायन धर्म सूत्राप्रमाणे हा आर्यावर्ताच्या दक्षिण सरहद्दीवर होता, तर तो पश्चिम समुद्रकाठी असल्याचा उल्लेख रामायणात आढळतो. काही विद्वानांच्या मते प्राचीन अवंती राज्याची पश्चिम सीमा असलेला, सध्याच्या विंध्य पर्वताचा पश्चिम फाटा म्हणजेच पारियात्र पर्वत आणि सध्याचा आरवली पर्वत म्हणजे पारियात्र पर्वताचा पुढे ईशान्येस गेलेला भाग असावा. वेदस्मृती ( सध्याची बनास ), वेदवती, सिंधू ( काली सिंध ), वेण्वा, स्यांदनी ( सानंदिनी ), सादानिरा, मही, चर्मण्वती ( चंबळ ), विदिशा, वेत्रवती ( बेटवा ) इ. नद्या या पर्वतात उगम पावत असल्याचा मार्केडेय पुराणातील उल्लेख वरील विधानास पुष्टी देणारा आहे.
खरे, ग . ह.