पारदमेल : पारा आणि दुसरी कोणतीही एक वा अनेक धातू यांच्यापासून तयार झालेल्या मिश्रधातूस पारदमेल असे म्हणतात. प्राचीन काळापासून लोकांना पारदमेलाची माहिती आहे. रोमन शास्त्रज्ञ थोरले प्लिनी (इ.स. पहिले शतक) यांनी आपल्या लिखाणात पारदमेलाचा उल्लेख केला आहे.

निसर्गतः चांदीचे पारदमेल बव्हेरियात मॉस्केलँड्सबर्ग, स्वीडनमधील झाला व फ्रान्समधील ईझेर येथे सोन्याचे पारदमेल कॅलिफोर्निया, कोलंबिया व बोर्निओ येथे आणि पॅलॅडियमाचे पारदमेल गियानामधील पोतारो नदीवरील हिरे धुण्याच्या कारखान्यात पोटॅराइट या स्वरूपात सापडते.

सोने, चांदी, कॅडमियम, कथिल, बिस्मथ, शिसे, जस्त, तांबे, आर्सेनिक, अँटिमनी, प्लॅटिनम, कोबाल्ट, निकेल, लोह इ. धातूंचे पारदमेल तयार होतात.

पारदमेल तयार करण्यासाठी सामान्यतः पुढील चार पद्धतींचा वापर करण्यात येतो : (१) धातूच्या विद्रावाची पाऱ्याशी विक्रिया करून, (२) पारा हा विद्युत् ऋणाग्र म्हणून वापरून त्यावर धातूचे निक्षेपण करून (विद्युत् प्रवाहाच्या साहाय्याने साचविण्याची क्रिया करून), (३) पार्यायहून जास्त क्रियाशील असलेल्या धातूच्या साहाय्याने पार्यागच्या संयुगातून पारा वेगळा करून आणि त्याची जादा धातूबरोबर विक्रीया करून व (४) इतर पारदमेलांबरोबर धातूची विक्रिया करून. चांदी, सोने, कथिल, कॅडमियम, शिसे, बिस्मथ व जस्त यांचे पारदमेल सर्वसाधारण तापमानाला सहज होतात. तांब्याच्या तुकड्याचा हळूहळू पारदमेल बनतो. आर्सेनिक, अँटिमनी व प्लॅटिनम यांचे पारदमेल अत्यंत कष्टाने तयार होतात तर कोबाल्ट, निकेल व लोखंड यांचे पारदमेल विशिष्ट परिस्थितींतच होतात.

बहुतेक पारदमेल स्फटिकीय असतात, तर जास्त पारा असलेले पारदमेल द्रवरूप असतात. भौतिकीय व संरचना या दृष्टीने पारदमेल मिश्रधातूसारखेच आहेत, पण मिश्रधातूंचे वर्तन⇨प्रावस्था नियमानुसार होते. पारदमेलाचा वितळबिंदू त्यातील घटकांच्या वैयक्तिक वितळबिंदूंपेक्षा जास्त असतो. उदा., सोडियमाचा वितळबिंदू ९८० से. व पार्यांचा वितळबिंदू -३९० से. आहे, तर त्यांच्यापासून तयार होणाऱ्या पारदमेलाचा वितळबिंदू ३६०० से. आहे. उच्च तापमानाला पारदमेलाचे अपघटन (घटक अलग होणे) होते.

सोडियम व पारा यांची विक्रिया जोरात होऊन सोडियम पारदमेल तयार होतो. याचा उपयोग कार्बनी रसायनशास्त्रात नवजात (रासायनिक विक्रियेने तयार केलेला, ताज्या स्थितीतील, अधिक क्रियाशील व अणूरूपातील) हायड्रोजनाच्या निर्मितीत व चांदी-सोने यांच्या निष्कर्षणासाठी (खनिजापासून धातू मिळविण्यासाठी) करतात. तांब्याच्या पारदमेल केल्यावर तो प्रथम प्लॅस्टिकसारखा असतो. काही काळानंतर आकारमानात बदल न होता तो घट्ट होतो. त्यामुळे त्याचा उपयोग भर म्हणून आणि प्लॅस्टर म्हणून करतात. दातात भरावयाचे सिमेंटही याच प्रकारचे असून ते चांदी-कथिल यांचा पारदमेल असते. जस्त-मर्क्युरिक ऑक्साइड विद्युत् घटात पारदमेलित जस्ताच्या चूर्णापासून दाब देऊन तयार केलेल्या चपट्या वडीचा (पेलेटचा) धनाग्र म्हणून उपयोग करतात. अँल्युमिनियमाचा पारदमेल कार्बनी रसायनशास्त्रात⇨क्षपणासाठी वापरतात. कथिलाच्या पारदमेलाचा उपयोग आरशावर पारा चढविण्यासाठी पूर्वी करीत असत. सोने-चांदी यांच्या खनिजांतून धातू वेगळ्या करण्यासाठी सोने-चांदीच्या पारदमेलाचा वापर पूर्वी मेक्सिकोत इंधनाअभावी करीत असत.

पहा : पारा.

कोवाडकर, सं. गो.