यूरोपियम : धातूरूपमूलद्रव्य.रासायनिकचिन्ह Eu. अणुक्रमांक(अणुकेंद्रातीलप्रोटॉनांचीसंख्या) ६३ अणुभार १५१·९६ आवर्तसारणीतील [मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉनरचने नुसार केलेल्या कोष्टकरूप मांडणीतील ⟶ आवर्तसारणी] संक्रमणी गट ३ मधील विरल मृत्तिका धातू [आवर्त सारणीतील क्र.५७ ते ७१ मधील अथवा लँथॅनाइड श्रेणीतील सहावे मूलद्रव्य ⟶ विरलमृत्तिका] वितळबिंदू ८२२° से. उकळबिंदू १,५९७° से. वि.गु. ५·२५३ (२५° से.ला) निसर्गात आढळणारे यूरोपियम हे १५१ (४७·८%) व १५३ (५२·२%) या द्रव्यमानांकांच्या (अणुकेंद्रातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकूण संख्या दर्शविणाऱ्या अंकांच्या) दोन स्थिरसमस्थानिकांचे (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांचे) बनलेले आहे. किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) समस्थानिकांचे द्रव्यमानांक १४७ ते १५०, १५२, १५४ ते १५८ पैकी यूरोपियम (१५८) चा अर्धायुकाल (किरणोत्सर्गी पदार्थाची मूळची क्रियाशीलता निम्मी होण्यास लागणारा काळ) ६० मिनिटे, यूरोपियम (१५४) चा १६ वर्षे व यूरोपियम (१५२) चा १३ वर्षे आहे. विद्युत्‌विन्यास (अणूतील इलेक्ट्रॉनांची मांडणी) २, ८, १८, २५, ८, २ संयुजा (इतर अणूंशी संयोग पावण्याची क्षमता दर्शविणारे अंक) २, ३ पृथ्वीच्या कवचातील प्रमाण ०·२ X १०-५ टक्के असते.

इतिहास व आढळ : १८८९ साली समर्स्काइट या खनिजाचा शोषण वर्णपट [⟶ वर्णपटविज्ञान] अभ्यासताना सर विल्यम क्रुक्सयांनी एका नव्या धातूचे (यूरोपियमचे) अस्तित्व जाहीर केले होते. १८९६ साली ई.ए.दमार्सेयांनी या धातूचा शोध लावला आणि यूरोप खंडावरून याला यूरोपियम हे नाव दिले. १९०१ साली त्यांनी ही धातू शुद्धरूपात मिळविली. १९०४ साली जी.यूर्बी व एच्‌.लाकाँब यांनी हिची शुद्ध संयुगे तयार केली. मोनॅझाइट, समर्स्काइटइ.विरल मृत्तिकायुक्त खनिजांत, तसेच अणुभंजनातून मिळालेल्या पदार्थात यूरोपियम आढळते. सूर्य व इतर काही ताऱ्यांत यूरोपियम असल्याचे त्यांच्या वर्णपटांवरून दिसून आले आहे.

गुणधर्म : १९३६–४१ याकाळात एन्‌.एच्‌.मकॉय यांनी बरीच धातू मिळविली व तिचे गुणधर्म निश्चित केले. ही रुपेरी, तन्य धातू सर्व विरलमृत्तिका धातूंमध्ये सर्वांत हलकी व मऊ आहे. हवेत व पाण्यातही लवकर गंजते व ऑक्सिजनाशी ही हिची सहजपणे विक्रिया होते. ही समचुंबकीय [⟶ चुंबकत्व] आहे. गुणधर्मांच्या बाबतीत यूरोपियमाचे लँथॅनाइड श्रेणीतील मूलद्रव्यांपेक्षा कॅल्शियम, स्ट्राँशियम व बेरियम या दुसऱ्या गटातील मूलद्रव्यांशी अधिक साम्य आहे.

निर्मिती : हिच्या हॅलाइडांचे विद्युत्‌विच्छेदन (विजेच्या साहाय्याने रेणूचे तुकडे करण्याची क्रिया) करून किंवा त्यांचे क्षारीय (आवर्तसारणीतील १ अ गटातील लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम व फ्रान्सियमया) अथवा विरल मृत्तिका धातूंनी ऊष्मीयक्षपण [⟶ क्षपण] करून यूरोपियम धातू मिळते. यूरोपियम ऑक्साइडाचे (Eu2O3) लँथॅनम धातूने क्षपण करून व नंतर ऊर्ध्वपातन करूनही यूरोपियम मिळते.

संयुगे : द्विसंयुजा हे यूरोपियमाचे वैशिष्ट्य आहे. हिची त्रिसंयुजी संयुगे फिकट गुलाबी रंगाची असून त्यांच्या विद्रावांचे जस्त वा हायड्रोक्लोरिक अम्लाने क्षपण करून द्विसंयुजी संयुगे मिळतात. यूरोपियम क्लोराइड (EuCl2), यूरोपियम ब्रोमाइड (EuBr2), यूरोपियम सल्फेट (EuSO4), यूरोपियम हायड्रॉक्साइड [Eu(OH)2] व यूरोपियम कार्बोनेट (EuCO3) ही यूरोपियमाची द्विसंयुजी संयुगे तयार करण्यात आली आहेत.

उपयोग : यूरोपियमाचा शोषण काटच्छेद (प्रक्षेपित न्यूट्रॉनाला लक्ष्य म्हणून उपलब्ध असलेल्या अणुकेंद्राचे परिणामी क्षेत्रफळ) मोठा आहे तसेच त्यावर आदळणाऱ्या न्यूट्रॉनांमुळे त्याचे पुष्कळ समस्थानिक निर्माण होतात. या गुणधर्मांमुळे अणुकेंद्रीय विक्रियांना प्रतिरोध करणारे द्रव्य म्हणून (उदा., अणुभट्टीतील नियंत्रण दंडांमध्ये) याचा उपयोग होऊ शकेल. प्रस्फुरकस क्रियाकारक (शोषलेल्या ऊर्जेपैकी थोड्या ऊर्जेचे उत्सर्जित दीप्त प्रारणात रूपांतर करणारे द्रव्य), विशिष्ट इलेक्ट्रॉनीय द्रव्याचा घटक व अनुस्फुरक (विद्युत‌्‌भारित कणांचा भडिमार चालू असताना प्रकाशणाऱ्या) काच निर्मितीतील एककारक म्हणून, तसेच ⇨ लेसरमध्ये यूरोपियमाचा वापर होतो.१९६४ पासून यूरोपियम ऑक्साइडाचा रंगीत दूरचित्रवाणीचे पडदे, चित्रनलिका तयार करण्याच्या दृष्टीने उपयोग होऊ लागला आहे.

पहा : विरलमृत्तिका.

संदर्भ : 1. Spedding, F.H. Daane, A. H. The Rare Earths, New York, 1961.

          2. Trifonov, D. N. The Rare-Earth Elements, New York,1964.

ठाकूर, अ. ना. घाटे, रा. वि.