पापनिवेदन : (कन्फेशन). ख्रिस्ती धर्मातील एक महत्त्वाची संकल्पना. आपल्या हातून घडलेल्या लौकिक पापाची जाहीर वा धर्मगुरूजवळ त्या पापाचा उच्चार करून कबुली दिल्याने त्या पापापासून आपण मुक्त होतो, असा विश्वास या संकल्पनेत अभिप्रेत आहे. पापामुळे बंध निर्माण होतो व पाप नाहीसे झाल्याने बंध सुटतो, ह्या कल्पनेतून पश्चात्ताप, पापनिवेदन, प्रायश्चित्त म्हणजे तपाचरण, आत्मक्लेश इत्यादिकांचा अंतर्भाव पापक्षालनार्थ विविध धर्मांत केला गेल्याचे दिसते. ईश्वर हा परम दयाघन व क्षमाशील असल्यामुळे व्यक्तीच्या हातून घडलेल्या पापाची कबुली ईश्वराचे प्रतीक असलेल्या चर्चमध्ये व धर्मगुरूजवळ दिल्याने ह्या पापाचे क्षालन होते, ह्या विश्वासातून ख्रिस्ती धर्मात ही प्रथा सुरू झाली.

जाहीर वा खाजगी रीत्या प्रार्थनेच्या वेळी पापनिवेदन करण्याची प्रथा सर्वच ख्रिस्ती चर्चमध्ये आहे तथापि रोमन कॅथलिक चर्चमध्ये धर्मगुरूजवळ आपल्या पापाचे निवेदन वा कबुली दिल्याने आपण पापमुक्त होतो, अशा विश्वासातून ही प्रथा पडली. सर्वच व्यक्तींनी वर्षातून एकवेळ धर्मगुरूजवळ पापनिवेदन करण्याचे बंधन रोमन कॅथलिक चर्चमध्ये आहे. ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च वा पूर्वेकडील चर्चमध्ये मात्र धर्मगुरूजवळ पापनिवेदन करणे नुसते सुचविले आहे चर्च ऑफ इंग्लंडनेही धर्मगुरूजवळील पापनिवेदन बंधनकारक मानले नाही ज्या व्यक्तींना आध्यात्मिक मार्गदर्शनाची गरज आहे त्यांनाच फक्त ते करण्याबाबत सुचविले आहे.

रोमन कॅथलिक चर्चमध्ये धर्मगुरूजवळ चर्चसभासदाने पापनिवेदन करण्यासाठी एक वेगळीच कोठडी असते. तिला एक छोटासा झरोका असतो. त्यातून ती व्यक्ती पापनिवेदन करते. पूर्वी मात्र सर्व चर्चसभासदांच्या समोर पापनिवेदन करावे लागे. ह्या झरोक्याच्या पलीकडे धर्मगुरू बसून हे पापनिवेदन ऐकून घेतो. त्याने ह्या व्यक्तीला पहावयाचे नसते. तो फक्त त्याचे सांत्वन करतो, त्याला परत ती चूक न करण्याचा आदेश देतो व योग्य ते प्रायश्चित्तही सांगतो. कोणत्याही व्यक्तीने केलेल्या ह्या पापनिवेदनचा उल्लेख इतरांजवळ करावयाचा नाही, हे व्रत धर्मगुरूला पाळावे लागते.

संदर्भ : Routley, Erik, Creeds and Confessions, London, 1962.   

आयरन, जे. डब्ल्यू.