पानिपत : हरयाणा राज्याच्या कर्णाल जिल्ह्यातील इतिहास प्रसिद्ध शाहर. लोकसंख्या ८७,९८१ (१९७१). हे दिल्लीच्या वायव्येस ८५ किमी. दिल्ली-अंबाला हमरस्त्यावर व लोहमार्गावर यमुना नदी जवळ वसले आहे.
‘पाणिप्रस्थ’ हे त्याचे एक प्राचीन नाव. अज्ञातवासानंतरच्या वाटाघाटीत युधिष्ठिराने दुर्योधनास पाच गावे (प्रस्थे) मागितली होती. पानिपत हे त्यांपैकी एक असावे, हे पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कुरुक्षेत्रात मोडते. महाभारतकालीन इंद्रप्रस्थ व हस्तिनापूर या कौरव-पांडवांच्या राजधान्या कुरुक्षेत्राच्या ज्या परिसरात होत्या, त्याच परिसरात दिल्ली ही हिंदुस्थानची इतिहासकालीन राजधानी वसलेली आहे. त्यामुळे राजधानी जिंकण्याच्या उद्देशाने भारताच्या पश्चिमेकडून अथवा वायव्येकडून येणाऱ्या आक्रमकांना डाव्या बाजूस हिमालयाच्या रांगा व उजव्या बाजूस थरचे वाळवंट आणि अरवली पर्वत असल्याने पानिपतमार्गेच येणे शक्य होते. तसेच सैन्याची पाण्याची गरज पानिपताजवळील यमुना नदीमुले भागविली जात होती. आक्रमकांना राजधानीपासून शक्य तो लांबच थोपवून धरण्याच्या उद्देशाने कुरुक्षेत्राच्या परिसरात पानिपत, सोनेपत इ. ठिकाणी युद्धे झाल्याचे दिसून येते.
मुसलमानी अमदानीत पानिपतास फार महत्त्व होते. हुमायून तुघलकने येथेच तळ ठोकून दिल्ली शहर लुटले (१३९०). पानिपतची तीन युद्धे (१५२६, १५५६ आणि १७६१) इतिहासदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जातात.
पानिपत १८५४ पर्यंत जिल्ह्याचे ठिकाण होते. १८६७ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. येथे एक साखर कारखाना असून शहरात तांब्या-पितळेची भांडी, विद्युत् उपकरणे, काचसामान, विटा, हातमाग व लोकरीचे कापड इ. बनविण्याचे उद्योग चालतात. शहराजवळील खाणीतून सोराही काढला जातो. पानिपतमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या सोयींशिवाय पंजाब विद्यापीठाशी संलग्न अशी तीन महाविद्यालयेही आहेत. येथील इब्राहीम लोदीची कबर, कवाली बागेतील तलाव, मुसलमान साधू ‘कलंदर’ यांचा दर्गा इ. ऐतिहासिक वास्तू उल्लेखनीय आहेत. विद्यमान पानिपतजवळच ‘कालाआम’ या नावाचे एक स्थान दाखविले जाते. पूर्वी येथे आंब्याचे झाड असावे. येथे पानिपतच्या तिसऱ्या युद्धाची स्मारकशिळा बांधलेली असून तिच्याच आसपास सदाशिवरावभाऊ मरण पावले असावेत, असे मानले जाते.
चाँडे, मा. ल. सावंत, प्र. रा.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..