पाथरफोडी : (सं. शिलापुष्प लॅ. डायडिमोकार्पस पेडिसेलॅटा कुल-जेस्नेरिएसी). या लहान ⇨ ओषधीचा प्रसार उपोष्ण कटिबंधीय पश्चिम हिमालयात चंबा ते कुमाऊँ येथे ७७५–१,७०५ मी. उंचीपर्यंत आहे. खोड ऱ्हमसित (ऱ्हास पावलेले) व त्यावर समोरा-समोर पानांच्या २-३ जोड्या येतात. पाने गोलसर अंडाकृती, गुळगुळीत, प्रपिंडयुक्त (ग्रंथियुक्त), ७–१५ सेंमी. व्यासाची असतात. सुकलेल्या पानांना विशिष्ट मसाल्यासारखा वास येतो व त्यांवर तांबूस भुकटी पसरल्यासारखी दिसते. फुले पंचभागी, पाकळ्या जुळलेल्या, केसरदले बहुधा चार व द्व्योन्नत (दोन लांबट), किंजपुट ऊर्ध्वस्थ, दोन कप्प्यांचा [→ फूल]. फळात बिया अनेक असतात.
पाने अश्मरीवर (मूत्रपिंड व मूत्राशय यांतील खड्यांवर) उपयुक्त पानांमध्ये पेडिसीन, पेडिसेलीन, पेडिसिनीन इ. बरीच स्फटिकी रंगद्रव्ये असतात. वाळलेल्या पानांतील पेडिसीन (सु. १%) मत्स्यविष आहे. पानांतील बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) तेल पातळ, सुक्या गवताच्या रंगाचे व सुगंधी असून त्यात मुख्यतः डायडिमोकार्पेन (१·६%) असते.
पहा : जेस्नेरिएसी.
जमदाडे, ज. वि.
”