रश : (सं. प्रनड इं. सॉफ्ट, कॉमन वा मॅटिंग रश लॅ. जुंकस एफ्युसस, जुं. कॉम्युनिस कुल-जुंकेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ही सु. ३०–९० सेंमी. उंच, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी), दंडगोलाकृती, झुबकेदार व नरम ⇨ओषधी समशीतोष्ण कटिबंधात आढळते. सिक्किम हिमालय (१,८००–३,००० मी.), खासी (१,५००–१,६५० मी.) व आका टेकड्यांवर ओल्या व दलदलीच्या जागी ही दिसते. हिची लागवडही करतात. हिची पाने आखूड व साधी असून त्यांच्या देठाचे खोडावर आवरण असते. जुकंस प्रजातीतील बहुतेक जातींमध्ये खोडात आणि पानात ⇨ वायूतक असते. हिरवट किंवा तपकिरी फुले झुबक्याने विरळ किंवा पसरट, लोंबत्या फुलोऱ्यावर येतात. फळ (बोंड) भोवऱ्यासारखे व बिया बारीक असतात. हिची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ जुंकेसीत वा प्रनड कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.

ह्या वनस्पतीपासून काढलेल्या धाग्यांचा उपयोग चटया, टोपल्या व खुर्च्यांच्या बैठकी विणण्यासाठी होतो. खोडातील भेंड दिव्याच्या व मेणबत्तीच्या वातींकरिता वापरतात. चीनमध्ये भेंड मूत्रल (लघवी साफ करणारे) व शुद्धिकारक म्हणून वापरात आहे. भेंडाचा काढा अश्मरीरोधक (मुतखडा न होऊ देणारा), सूज आणि गुल्म (गाठ) कमी करणारा असून लघवीच्या विकारांत मूळ उपयुक्त्त असते. पाळीव जनावरांना ह्या वनस्पतीमुळे विषबाधा होते.

संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. V, New Delhi, 1959.

जमदाडे, ज. वि.