पाणकोंबडी (गॅलिन्यूला क्लोरोपस)पाणकोंबडी : पाणकोंबडीचा समावेश रॅलिडी या पक्षी कुलात होत असून तिचे शास्त्रीय नाव गॅलिन्यूला क्लोरोपस  असे आहे. ती यूरोप, आफ्रिका, आशिया, अमेरिका आणि हवाई व इतर बेटांत आढळते. तिच्या कित्येक उपजाती असून त्यांपैकी भारतात एकच आढळते व तिचे शास्त्रीय नाव गॅलिन्यूला क्लोरोपस इंडिका असे आहे. ती भारतात सगळीकडे सपाट त्याचप्रमाणे डोंगराळ भागात आढळते. ती १,८३० मी. पेक्षा जास्त उंचीवर सापडत नाही.

पाणकोंबडी साधारणपणे ⇨ तितराएवढी असते. डोके व मान काळसर करड्या रंगाची असते छाती आणि बाजू गर्द स्लेटी करड्या रंगाच्या (पाटीच्या दगडाच्या रंगाच्या) असतात व बाजूंवर पांढरे पट्टे असतात. पाठ तपकिरी व पोट पांढुरके असते. पंख काळसर तपकिरी असून मिटलेल्या स्थितीत त्यांच्या कडा पांढऱ्या असतात. शेपटीच्या बुडाखालची पिसे पांढरी असून त्यांच्या मध्यभागी काळा डाग असतो डोळे तांबडे असून चोचीचे बूड व कपाळ लाल रंगाचे असते पायांचा रंग हिरवा व बोटे अतिशय लांब असतात.

पाण्याच्या काठावर उंच वाढलेले गवत, लव्हाळ्यांची बेटे किंवा झुडपे असलेल्या तलावात पाणथळ जागेत पाणकोंबडी राहते. तिच्या जीवनाला पाणी आवश्यक असल्यामुळे आटणारे तलाव, नद्या, ओढे इ. ठिकाणी ती क्वचितच असते. ती उत्तम पोहणारी आहे जमिनीवर देखील ती लांब टांगा टाकीत चालते. पोहताना किंवा चालताना एकसारखे डोके हालविण्याची व झटका देऊन शेपटी वर करण्याची तिला सवय असते. पाण्यात अर्धवट बुडालेल्या किंवा काठावर असलेल्या लव्हाळ्यांमधून यांची जोडपी किंवा टोळकी भक्ष्य शोधीत असतात. किडे, कृमी, मृदुकाय प्राणी, धान्य, पाणवनस्पतींचे कोंब इ. यांचे भक्ष्य होय.

पाणकोंबडी उडू शकते, पण ती मोठ्या कष्टाने उडत असल्यासारखी दिसते. बहुधा झपाझप पंख हालवीत ती पाण्यासरशी उडत जाते. धोक्याचे चिन्ह दिसताच ती लव्हाळ्यात लपते वा पाण्यात बुडी मारते. 

हिचा विणीचा हंगाम मैदानी प्रदेशात जुलैपासून सप्टेंबरपर्यंत असतो पण डोंगराळ भागात तो मेपासून सुरू होतो. घरटे म्हणजे पाणवनस्पती व लव्हाळ्यांचा ढीग असून त्यात अंड्यांकरिता एक खळगा केलेला असतो. घरटे बहुधा पाण्यातील वनस्पतींवर किंवा काठावरील झुडपात असते. मादी ५–१२ अंडी घालते. ती फिकट पिवळ्या रंगाची किंवा पिवळसर दगडी रंगाची असून त्यांच्यावर तांबूस तपकिरी रंगाचे डाग असतात.

भारतात हिमालयाच्या पायथ्यापासून खाली सगळीकडे आणखी एक प्रकारची पाणकोंबडी आढळते, हिचा आकार, सवयी, निवासस्थान इ. वर वर्णन केलेल्या पाणकोंबडीप्रमाणेच असतात पण तिचा चेहरा, मान, छाती आणि पोट पांढरे असते, शेपटीच्या खालच्या बाजूचा रंग विटकरी असतो. हिला पांढऱ्या छातीची पाणकोंबडी म्हणतात.

कर्वे, ज. नी.