पाचुंदा: (कौंतेल, कातर्णी हिं., गु. धुती क. तोरटे, रेवपी सं. पत्तर, कुंतल लॅ. कॅपॅरिस ग्रँडिस कुल-कॅपॅरिडेसी). हा सु. ४·५ मी. उंच पानझड़ी वृक्ष भारतातील डोंगराळ भागात, विशेषतः प. घाट व जवळचा दक्षिण पठाराचा भाग, राजस्थान, श्रीलंका व ब्रह्मदेश येथे आढळतो. कोवळ्या फांद्या व पाने यांवर पिवळट लव आणि जून खोडावर जा़ड भेगाळ साल असते. पाने साधी व लांबट (२·५-५ x २·५-३·५ सेंमी.) उपपर्णी काटे असल्यास वाकडे फुलोरे गुलुच्छ किंवा मंजरी [⟶ पुष्पबंध] फुले पांढरी (२·५ सेंमी. व्यासाची) व सच्छद असून एप्रिल ते मेमध्ये येतात. संदले ४ व सुटी पाकळ्या ४, परिहित केसरदले अनेक व लहान आखूड दांड्यावर (पुष्पस्थलीवर) किंजपुट ऊर्ध्वस्थ २·५ सेंमी. लांब दांड्यावर (किंजधरावर), लंबगोल व टोकदार [⟶ फूल] मृदुफळ जायफळाएवढे, गोल, जांभळे व गुळगुळीत असून बिया २–६ असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ कॅपॅरिडेसी कुलात (वरुण कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. या वृक्षाचे लाकूड पांढरे अगर करडे, मध्यम कठीण, जड आणि टिकाऊ असून कातीव कामास चांगले असते नांगराचे फाळ व छपराचे वासे यांकरिता वापरतात. साल व पाने यांता फांट (थंड पाण्यात भिजवून काढलेला रस) सूज व फोड यांवर पोटात देतात.
धवधवे, व.ग.