पॅलेड, जॉर्ज एमील : (१९नोव्हेंबर १९१२– ). अमेरिकन कोशिकावैज्ञानिक (पेशींची संरचना, वर्तन, वृद्धी व प्रजनन आणि त्यांतील घटकांचे कार्य व रसायनशास्त्र यांचा अभ्यास करणाऱ्या जीवविज्ञानाच्या शाखेतील तज्ञ). त्यांनी रिबोसोम [जिवंत कोशिकेत प्रथिने तयार करण्याचे कार्य करणारे विशिष्ट जटिल कण ⟶ कोशिका] शोधून काढले व त्यासह कोशिकेतील इतर घटकांची सूक्ष्म संरचना विशद करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. तसेच ऊतकांवर (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांवर) प्रयोग करण्याच्या पद्धती विकसित केल्या. या कार्याबद्दल त्यांना ॲल्बर्ट क्लोड व ⇨ क्रिश्चन आर्. डी ड्यूव्हे यांच्याबरोबर १९७५चे वैद्यकाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
क्लोड यांनी केंद्रोत्सारक (उच्च गतीने फिरणाऱ्या व केंद्रापासून दूर ढकलणाऱ्या प्रेरणेच्या तत्त्वाचा उपयोग करून पदार्थ अलग करणाऱ्या ) उपकरणाच्या साहाय्याने कोशिकेतील घटक वेगळे केले व इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाने कोशिकेचा सविस्तर अभ्यास केला. नंतर क्लोड यांच्या तंत्रात पॅलेड व ड्यूव्हे यांनी सुधारणा केल्या आणि सूत्रकणिका, मायक्रोसोम, पेरॉक्सिसोम व लायसोसोम या कोशिका-घटकांच्या व्याख्या निश्चित करून त्यांची कार्ये कोणती, हे तपासून पाहिले. अशा प्रकारे या तिघांच्या कार्यामुळे कोशिकांमध्ये विशेषित असे अनेक घटक (ऑर्गॅनेल्स) असून ते पुढील कार्ये करू शकतात, हे समजून आले. पोषक द्रव्यांचे पचन, कोशिकेतील हानी भरून काढणे, कोशिका द्रव्याचे (कोशिकेचा केंद्रक– कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारा जटिल गोलसर पुंज–व बाह्य पटल यांतील आधरक द्रव्याचे) संश्लेषण, चयापचयाचे (कोशिकेत सतत होणाऱ्या रासायनिक-भौतिक घडामोडींचे) नियंत्रण आणि कोशिकेच्या बाह्य पटलावर हल्ला करणाऱ्या जंतूंचा नाश करणे ही ती कार्ये होत. कोशिकेचे कार्य व्यवस्थित न होण्यामुळे उद्भवणाऱ्या पुष्कळ रोगांवरील उपचार शोधण्यासाठी या माहितीचा उपयोग होत आहे.
पॅलेड यांचा जन्म यासी (रूमानिया) येथे झाला. १९४० साली त्यांनी बूकारेस्ट विद्यापीठाची पदवी मिळविली व १९४६ पर्यंत तेथेच अध्यापन केले. त्या वर्षी ते अमेरिकेतील रॉकफेलर इन्स्टिट्यूटमध्ये अभ्यागत अनुसंधानक म्हणून गेले व १९५६ साली तेथेच कोशिकाविज्ञानाचे प्राध्यापक झाले. १९५२ साली त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. पुढे ते येल विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये कोशिकाविज्ञानाचे विभागप्रमुख झाले(१९७२). रॉकफेलर इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी क्लोड यांच्याबरोबर काम केले. कलकणू, हरितकणू, गॉल्जी पिंड इ. कोशिकांगांच्या [⟶कोशिका] आंतरिक घटनेबद्दल पॅलेड यांनी अभ्यास केला. मायक्रोसोम हे पूर्वी कलकणूचे तुकडे मानीत परंतु प्रत्यक्षात ते अंतःप्राकल जालकाचे (अंतर्गत कोशिकीय परिवहन तंत्राचे) भाग असून त्यातील आरएनए चे [ रिबोन्यूक्लिइक अम्लाचे⟶ न्यूक्लिइक अम्ले] प्रमाण जास्त असते असे त्यांनी दाखविले. हा त्यांचा सर्वांत महत्त्वाचा शोध आहे.
अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसवर निवड(१९६१), वॉर्नर पारितोषिक (१९६४), पॅसानो फाउंडेशन बक्षीस (१९६४), लूइस ग्रॉस हार्विट्झ पारितोषिक इ. बहुमान त्यांना मिळाले आहेत.
ठाकूर, अ. ना.