पॅटागोनिया: अर्जेंटिनामधील ३८० द. अक्षांशाच्या दक्षिणेकडील विस्तीर्ण प्रदेश. चिली व अर्जेंटिना या दोन्ही देशांचा दक्षिणेकडील भाग मिळून जो प्रदेश बनतो, त्यालाही काही वेळा या नावाने संबोधिले जाते. पूर्वीच्या स्पॅनिश समन्वेषकांनी या प्रदेशात राहणाऱ्या आदिवासींना दिलेल्या ‘पॅटॅगोन’ (मोठ्या पायांचे) या टोपणनावावरून या प्रदेशाला ते नाव पडले असावे. याचे क्षेत्रफळ सु. ८,०५,४९० चौ.किमी. व लोकसंख्या ५·५ लक्ष (१९७०) होती. पॅटागोनियात अर्जेंटिनाचे दक्षिण नेऊकेन, रीओ नेग्रो, चुबुत, सांताक्रूझ, कोमोदोरो रिव्हादाव्हिया हे प्रांत व टिएरा डेल फ्यूगो हा प्रदेश इ. भाग येत असून पॅटागोनियाच्या उत्तरेस कोलोरॅडो नदी, दक्षिणेकडे १,६१० किमी.वर केप हॉर्न बेट व चिलीचा काही भाग, पूर्वेस अटलांटिक महासागर व पश्चिमेस अँडीज पर्वतश्रेणी आहे. या प्रदेशातील बरेचसे नदीप्रवाह कोरडे असले, तरी रीओ नेग्रो, चुबुत, सांताक्रूझ, गायेगोस यांसारख्या नद्या वर्षभर वाहत राहून समुद्रास मिळतात.
या प्रदेशातील मूळचे प्राणी म्हणजे ग्वानाको, ऱ्ही, प्यूमा, हरिण हे होत. येथील मूळच्या रहिवाशांपैकी टेह्यूल्चेस (पॅटागोनियन राक्षस) हे सर्वांत महत्त्वाचे मानले जातात. चार्ल्स डार्विनच्या काळापासून अनेक शास्त्रीय संशोधन तुकड्या या प्रदेशात पुराजीवविज्ञानाभ्यासासाठी गेल्या आहेत.
पॅटागोनियाला प्रथम भेट बहुधा व्हेसपूचीने दिली असावी (१५०१). तथापि त्याच्या किनाऱ्याचा मॅगेलनने १५२० च्या सुमारास शोध लावला. अर्जेंटिनाचा अध्यक्ष हूल्यो ए. रॉका याने तेथील इंडियनांच्या कत्तली केल्यामुळे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अर्जेंटिनी मेंढपाळ पॅटागोनियात वसती करू लागले. त्यांच्याबरोबर वेल्श, स्कॉटिश व ब्रिटिश लोकही आले आणि त्यांनी मोठाली कुरणे व शेतवाड्या घेतल्या. चिली व अर्जेंटिना यांत याच्या स्वामित्वाबद्दल दीर्घकाळ वाद होता. तो १८८१ मध्ये मिटला. त्यास अंतिम मान्यता १९०२ मध्ये मिळून तीनुसार अँडीजच्या पूर्वेचा भाग अर्जेंटिनाकडे आणि त्याच्या पश्चिमेकडील भाग व टिएरा डेल फ्यूगोच्या उत्तरेकडील थोडासा भाग चिलीच्या वाट्यास आला. अँडीजच्या पायथ्याचा काही भाग व टिएरा डेल फ्यूगोचा भाग वगळता, पॅटागोनियात अनेक अर्धशुष्क पठारे आहेत. त्यांचा उतार पूर्वेकडे असून त्यांत बव्हंशी कोरड्या नद्यांची खोरी आढळतात. याच्या दक्षिण भागातील हवामान सागरी असून क्वचित ताशी ११२ किमी. वेगाचे वारे वाहतात. अँडीजच्या पायथ्याशी मात्र निसर्गसुंदर सरोवरे व मरूद्यानांची मालिका आहे. टिएरा डेल फ्यूगोमध्ये व चिली-पॅटागोनियात निसर्गरम्य स्थळे आढळतात. येथे पर्यटन केंद्रे विकसित करण्याचे प्रयत्न चालू आहेत. पॅटागोनियातील प्रमुख उद्योग मेंढपाळी असून तीमधील ऋतुचारण स्थलांतर महत्त्वाचे आहे. पॅटागोनियन लोकर जगप्रसिद्ध आहे. फळबागांचेही संवर्धन केले जात आहे. १९६१ च्या पुढे अनेक सर्वेक्षणे व अभ्यास अहवाल यांवरून पॅटागोनियात अनुत्खनित नैसर्गिक साधनसंपत्तीचे अनेक साठे असल्याचा शोध लागल्यामुळे याचे महत्त्व वाढू लागले आहे. रीओ नेग्रो नदीवर प्रचंड जलविद्युत् प्रकल्प उभारण्याच्या योजना आखण्यात आल्या आहेत. चुबुतपर्यंत लोहमार्ग आला असून अनेक विमानकंपन्या हवाईमार्गाने या सबंध प्रदेशाशी संपर्क साधतात. शहरी लोकसंख्या अल्प असली, तरी कोमोदोरो रिव्हादाव्हियाची लोकसंख्या मात्र २५,००० हून अधिक आहे.
खांडवे, म. अ. गद्रे, वि. रा.