पक्ष्यांना अन्नोदक अर्पण करणारा पुजारी, पक्षितीर्थ

पक्षितीर्थ : तमिळनाडू राज्याच्या चिंगलपुट जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. चिंगलपुट–महाबलीपुर मार्गावर, चिंगलपुटच्या आग्नेयीस सु. ११ किमी. वर वेदगिरी या सु. १५२ मी. उंचीच्या टेकडीवर हे पवित्र क्षेत्र असून टेकडीच्या पायथ्याशी पक्षितीर्थ गाव आहे. तमिळ भाषेत त्याला ‘तिरूक्कळुक्कूनरम्’ (मृत्यु-संजीवन) म्हणतात. टेकडीवर शिवमंदिर व एका गुहेत पार्वतीची मूर्ती असून शिवलिंग स्वयंभू समजले जाते. या स्थानाविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. दररोज मध्यान्हकाळी येथील पुजारी थाळी वाजवून गरुडासारख्या दिसणाऱ्या पांढऱ्या पक्ष्यांना बोलावतो व ते त्याच्या हातून अन्न व पाणी ग्रहण करतात. हे पक्षी म्हणजे शापित ऋषी असून, ते रोज काशी ते रामेश्वर असा प्रवास करताना या क्षेत्री विश्रांती घेतात. त्यांच्या दर्शनाने मनोरथ पूर्ण होतात, असा भाविकांचा समज आहे. काही विद्वानांच्या मते हे पक्षी पाळीव असून, ते गावापासून लांब, पर्वतावर ठेवलेले असतात. या पक्ष्यांना पाहण्यासाठी खूप लोक येतात. या टेकडीवर अनेक तीर्थकुंडे असून, पायथ्याशीही एक प्रेक्षणीय शिवमंदिर, तलाव व शतस्तंभी मंडप आहे.

चौंडे, मा. ल. दातार, नीला