पल्लियन युवक

पल्लियन : केरळ राज्यातील एक आदिवासी जमात. पल्लियनांची थोडी वस्ती कर्नाटक व तमिळनाडू राज्यांतही आढळते. यांना पल्लेयार किंवा पल्लियार असेही म्हणतात. त्यांची वस्ती मुख्यत्वे कोट‌्टयम् जिल्ह्यात आहे. यांची लोकसंख्या ४,०२० होती ( १९७१ ). हळूहळू त्यांची लोकसंख्या घटत आहे.‘पालीचा अंमल’ या देवतेला पूजणारे म्हणून त्यांना पल्लियन म्हणतात, असे एक मत आहे. हे लोक काळे, मध्यम उंचीचे असून कुरळे केस, बसके नाक, किंचित जाड ओठ ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये होत. तमिळ व मलयाळम् या दोन्ही भाषांतील शब्दांचा ते आपल्या बोली भाषेत उपयोग करतात. ते मांसाहारी आहेत. शेती हाच त्यांचा मुख्य धंदा आहे. शिवाय जंगलातील लाकूड तोडून तेेही विकतात. ते बांबूच्या झोपडीत राहतात व कमरेला सदैव कट्यार बाळगतात. पुरुषाचा पोशाख साधा असून स्त्रिया पोलके, साडी व विविध प्रकारचे दागिने घालतात.

जमातीच्या मुख्याला‘कन्नीकारन’ म्हणतात. त्याची नेमणूक वंशपरंपरागत असते. या जमातीचे लोक जडप्राणवादी व कुळीचिन्हवादी आहेत.मरीअम्मा, कुरुपुस्वामी आणि कालीदेवी या तीन देवता त्यांच्यात अधिक लोकप्रिय आहेत. मृतात्मे व भुताखेतांचीही ते पूजा करतात. आत्म्याचे अस्तित्व तसेच पुनर्जन्म यांवर त्यांचा विश्वास आहे. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान असले, तरी धार्मिक विधींमध्ये त्यांना भाग घेता येत नाही.

या जमातीत युवागृहे आढळतात. ती गावाच्या एका टोकाला असतात. वयात आल्यानंतर मुलामुलींची लग्ने होतात. ती बहुधा वडीलधाऱ्‍या व्यक्तींनी ठरविलेली असतात. आते-मामे भावंडांच्या लग्नाला जमातीत प्राधान्य आहे. मुलाला नियोजित सासऱ्‍याच्या घरी लग्नाअगोदर काम करावे लागते. देवर-विवाह पद्धतीही रूढ आहे. विधवा वहिनीबरोबर तिचा धाकटा दीर लग्न करतो. संतती नाही या सबबीवर काडीमोड घेण्याचे प्रमाण बरेच आहे.

फार पूर्वी मृताला राहत्या झोपडीत ठेवून इतरांनी गाव सोडून जाण्याची पद्धत प्रचलित होती तथापि स्थायिक शेतीमुळे गाव सोडणे शक्य होत नाही, म्हणून मृताला गावाबाहेर पुरण्याची प्रथा रूढ झाली आहे.

संदर्भ :Luiz, A. A. D. Tribes of Keral, New Delhi, 1961.

कीर्तने, सुमति