परीक्षित् : परिक्षित् असाही नामनिर्देश आहे. पुराणानुसार होऊन गेलेल्या पाच राजांचे नाव. (१) एफ्. ई. पार्जिटरच्या मते, कुरूला जे तीन मुलगे झाले, त्यांपैकी सर्वांत थोरला मुलगा परीक्षित्. हा वैदिक कालात होऊन गेला. त्याचा उल्लेख अथर्ववेदात (२०·१२७·७–१०) आला आहे. त्यात म्हटले आहे की, परीक्षिताने कुरू देशात सुरक्षितता व सुबत्ता प्रस्थापित केली. याचे उदाहरण म्हणजे, एक गृहपत्नी आपल्या पतीला विचारते, ‘मी आपणास दही, मंथन केलेले पेय, आणि मद्य यांपैकी काय देऊ? हे पहा, शिजलेले यव भांड्यातून उतू जात आहेत. परीक्षित् राजाच्या राज्यात लोक आनंदाने राहत आहेत’. ऐतरेय ब्राह्यणात परीक्षिताचा पुत्र जनमेजय याला तुरकावषेय याने ऐंद्र महाभिषेक केल्याचा उल्लेख आहे. शांतिपर्वात याच्या जनमेजयनामक पुत्राने ब्रह्यहत्या केल्याचा उल्लेख आहे. हा पांडवांच्या पूर्वी होऊन गेला असावा. (२) अयोध्येचा इक्ष्वाकू राजा. मंडूक वंशातील आयुराजाच्या सुशोभना या कन्येशी त्याचा विवाह झाला होता. त्याला विवाहसमयी तिने अट घातली की, मला पाण्याचे दर्शन तुझ्याकडून होता कामा नये. तसे झाल्यास मी तुझा त्याग करीन. एकदा सुशोभनेला परीक्षित् मृगयेकरिता वनात घेऊन गेला. त्या वेळी एका विहिरीपाशी तिला चुकून घेऊन गेला. त्याबरोबर ती गुप्त झाली. परीक्षिताने क्रुद्ध होऊन मंडूक वंशाचा नाश आरंभिला. तेव्हा आयुराजा परीक्षितास शरण आला आणि सुशोभनेला परत परीक्षिताच्या स्वाधीन केले (महाभारत, वनपर्व १९०). (३) कुरुवंशीय आविक्षित राजाच्या आठ पुत्रांपैकी ज्येष्ठ पुत्र. माता वाहिनी. त्याचीच अश्वत् व अभिष्यंत अशी दुसरी नावे होती ( महाभारत, आदिपर्व ८९). (४) कुरुवंशीय अरुग्वत राजाचा पुत्र. माता मागधी अमृता. परीक्षिताचा पुत्र भीमसेन, भीमसेनाचा प्रतीप आणि प्रतीपाचा शंतनु, असा वंशक्रम (महाभारत, आदिपर्व ९०).(५) अर्जुनपुत्र अभिमन्यू याचा उत्तरेपासून झालेला मुलगा. उत्तरेच्या गर्भात असताना याचे अश्वत्थाम्याने सोडलेल्या ब्रह्यास्त्रापासून कृष्णाने रक्षण केले. भारतीय युद्धानंतर युधिष्ठिराने ३६ वर्षे राज्य करून नंतर याला अभिषेक केला. याचे राज्य सरस्वती नदीपासून गंगेपर्यंत पसरले होते. याने आपल्या राज्यातून कलीला हद्दपार केले होते, असे म्हटले आहे. त्यावरून त्याच्या सुराज्याचे अनुमान करता येते. एकदा हा मृगया करीत असता वाट चुकला तेव्हा त्याने तेथील एका शमीकनामक ऋषीला मार्ग विचारला पण त्या ध्यानस्थ ऋषीने त्याला उत्तर दिले नाही. तेव्हा रागावून परीक्षिताने त्याच्या गळ्यात एक मृत सर्प अडकवून तेथून प्रयाण केले. ते पाहून त्या ऋषीच्या शृंगीनामक पुत्राने क्रुद्ध होऊन ‘एका आठवड्यात तुला नागाधिपती तक्षकाच्या हातून मृत्यू येईल’, असा शाप दिला. त्याप्रमाणे घडून आले. नंतर त्याचा पुत्र जनमेजय याने सर्पसत्र आरंभून त्याचा सूड घेतला, अशी कथा महाभारतात (आदिपर्व) आली आहे.

परीक्षिताचे शत्रू सर्प नसून गांधार देशातील नागवंशी लोक होते. भारतीय युद्धात पांडवांची शक्ती क्षीण झाल्याचा फायदा घेऊन त्यांनी हस्तिनापुरावर चाल करून तेथील परीक्षित राजाला ठार केले, असा इतिहास या कथेत अभिप्रेत दिसतो.

द्वैपायन व्यासाचा पुत्र शुकमुनी याने परीक्षित राजाला श्रीमद‌्भागवत सांगितले, असा भागवतात उल्लेख आहे. परीक्षित् हा तक्षकाने दंश केल्यानंतर सात दिवसांनी मरण पावला. या सात दिवसांत शुकमुनीने त्यास भागवताचा उपदेश केला.

मिराशी, वा. वि. जोशी, लक्ष्मणशास्त्री