परिसर्प: (हरपिझ). लाल झालेल्या त्वचेवर उठणाऱ्या व खोल जाणाऱ्या, द्राक्षघडासारखा पुटिका समूहांना ‘परिसर्प’ म्हणतात. ही विकृती व्हायरसजन्य आणि तीव्र स्वरूपाची असते. तिचे दोन प्रकार आढळतात : (१) सामान्य परिसर्प आणि (२) मेखला परिसर्प किंवा ‘नागीण’ (हरपिझ झॉस्टर).
सामान्य परिसर्प: हा एक प्रकारचा व्हायरसजन्य त्वचारोग आहे. ओठ, हनुवटी, नाक, तोंड व बाह्य जननेंद्रिये या शरीरभागांवर तो बहुतकरून आढळतो. स्थानपरत्वे त्याला निरनिराळी नावेही देतात उदा., ओष्ठ परिसर्प, जननांग परिसर्प वगैरे. हरपिझ-व्हायरस होमिनिस नावाच्या मध्यम आकारमानाच्या (१८० मिलिमायक्रॉन व्यास १ मिलिमायक्रॉन= १०-६ मिमी.) व्हायरसाच्या संसर्गामुळे रोग उद्भवतो. हे व्हायरस दोन प्रकाचे असून त्यांपैकी पहिला प्रकार सामान्यतः ओठ, तोंड या ठिकाणी तर दुसरा प्रकार सामान्यतः ( पण नेहमी नव्हे) जननेंद्रियात आढळतो. हा रोग प्रत्यावर्ती स्वरुपाचा म्हणजे वारंवार त्याच जागी उद्भवणारा असून त्याच्या प्रथमोद्भवाचा परिपाक काल (व्हायरस शरीरात शिरल्यापासून रोगलक्षणे उत्पन्न होईपर्यंतचा काळ) ४ ते ५ दिवसांचा असतो. रोगाची सुरुवात थंडी, वारा किंवा ऊन यांच्या जादा संपर्कानंतर रोगाच्या जागी आग होण्याने किंवा खाज सुटून होते. नंतर त्वचेवर रंजिका दिसतात व त्यावर टाचणीच्या डोक्याच्या आकाराच्या पुटिकांचे समूह दिसू लागतात. सुरुवातीस पुटिकांत स्वच्छ द्रव असतो परंतु नंतर तो गढूळ बनतो. या पुटिका फुटतात किंवा सुकतात आणि त्यावर खपल्या धरतात. ७ ते १४ दिवसांत रोग संपूर्ण बरा होतो. पुटिकांमध्ये दुय्यम सूक्ष्मजंतुसंक्रामण झाल्यास व्रण तयार होतात. इलाजामध्ये जंतुनाशक आणि स्तंभक (आकुंचन करणारी) औषधे पुटिकांवर लावतात. टॅनिक अम्लचे घावन (लोशन) आणि ऑरिओमायसिनाचे मलम वापरतात. दुय्यम संक्रामण झाल्यास योग्य प्रतिजैव ( अँटिबायॉटिक) औषधे देतात.
मेखला परिसर्पः पश्चमूल गुच्छिकांच्या शोथामुळे ( दाहयुक्त सुजेमुळे) त्या ज्या भागात तंत्रिका (मज्जा) पुरवठा करतात, त्या त्वचा भागापुरत्या मर्यादित असणाऱ्या संसर्गजन्य परिसर्पाला मेखला परिसर्प किंवा नागीण म्हणतात. कधीकधी पाचव्या मस्तिष्क तंत्रिकेवरील ‘त्रिमूल गुच्धिका’ आणि सातव्या मस्तिष्क तंत्रिकेवरील ‘आनन गुच्धिका’ यांनाही ही विकृती होते ( या वर्णनातील निरनिराळ्या गुच्धिकांच्या स्पष्टीकरणासाठी ‘तंत्रिका तंत्र’ ही नोंद पहावी). मेखला परिसर्पाचे व्हायरस आणि ⇨ कांजिण्यांचे व्हयरस यांत अतिशय साम्य आहे. या परिसर्पाच्या रोग्याशी संपर्क आलेल्या व्यक्तीमध्ये कांजिण्या झाल्याचे अनेक वेळा आढळते. याउलट कांजिण्यांच्या रोग्याशी संपर्क आल्यामुळे परिसर्प झाल्याचे सहसा आढळत नाही. या दोन विकृतींमध्ये अन्योन्य प्रतिरक्षा ( रोगप्रतिकारक्षमता) नसते. मेखला परिसर्प ही विकृती तंत्रिका तंत्राच्या विकृतीत मोडते.
मेखला परिसर्पाचे कधीकधी ‘प्रथमिक’ आणि ‘दुय्यम’ असे वर्गाकरण करतात. यांशिवाय वर दिलेले मस्तिष्क तंत्रिकांसंबंधीचे प्रकार विशेष प्रकार म्हणून ओळखतात. पाठीच्या मणक्यांचा क्षयरोग, मेरुरज्जूसंबंधीत अर्बुद (नवीन पेशींची अत्यधिक वाढ होऊन निर्माण झालेली गाठ) किंवा कर्करोगाचा दुय्यम फैलाव या विकृतींच्या सोबत आढळणाऱ्या परिसर्पाला दुय्यम परिसर्प म्हणतात. दोन्ही प्रकारांत रोगप्रतिकारशक्तीचा ऱ्हास हेच मुख्य कारण असते. कोणत्याही प्रकारात व्हायरस संक्रामणामुळे गुच्छिकेत रक्तस्त्राव आणि ऊतकमृत्यू (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहाचा नाश) झाल्याचे आढळते.
मेरुरज्जूत प्रवेश करणाऱ्या पश्चमूलांना संसर्ग झाल्यामुळे त्या पश्चमूलाशी संबंधित असलेल्या त्वचाभागावर प्रथम त्वक् रक्तिमा येतो आणि नंतर पुटिका उमटतात. दोन बरगड्यांमधील अंतरापर्शुक तंत्रिका मार्गावर हा रोग बहुधा आढळतो. पाठीच्या मध्यापासून पुढे छातीच्या मध्यापर्यत त्वचेवर पुटिका दिसतात. शरीराच्या एकाच बाजूस वेढल्याप्रमाणे पुटिका उमटत जातात म्हणून त्यास ‘नागीण’ म्हणतात. रोगाच्या सुरुवातीस पट्ट्यासारखा त्वचाभाग अतिसंवेदनाक्षम बनतो, आग किंवा तीव्र वेदना होतात. दोन चार दिवसांतच पुटिका दिसू लागतात व सुरुवातीस त्यामधील द्रव स्वच्छ असतो. काही काळ पुटिका वेगवेगळ्या असतात परंतु त्यांत पू होऊन त्यांचा संगम होण्याची शक्यता असते. काही दिवसांनंतर या पूयिका (पूयुक्त पूटिका) कोरड्या पडून खपली धरते. खपल्या पडल्यानंतर छोटे छोटे व्रण होतात आणि त्या त्वचाभागाची संवेदना बिघडते. उपद्रवामध्ये मेरुरज्जुशोथ आणि मस्तिष्कशोथ यांचा समावेश होतो. कधीकधी उत्स्फोट(पुरळ) दिसेनासा झाल्यानंतरही तीव्र तंत्रिकाजन्य वेदना चालूच राहतात. अशा वेदना तीन महीन्यांपेक्षा जास्त काळ चालूच राहिल्यास त्या अनिश्चित काळपर्यंत चालूच राहण्याची शक्यता असते. रोगकालात मस्तिष्कमेरूद्रव [मेंदू व मेरुरज्जू यांना यांत्रिक आधार म्हणून उपयोगी पडणारा द्रव ⟶ तंत्रिका तंत्र] तपासल्यास लसीका-कोशिका-वृद्धी [⟶ लसीका तंत्र] झाल्याचे आढळते.
त्रिमूल गुच्छिका विकारात कपाळ, डोळे, जीभ, तालू या ठिकाणी पुटिका उमटतात. त्रिमुल तंत्रिकेच्या नेत्रशाखेच्या पुरवठा विभागात हा रोग बहुतकरून आढळतो. डोळ्याचे स्वच्छमंडल (बुबुळाच्या पुढचा पारदर्शक भाग) आणि नेत्रश्लेष्मकला (नेत्रगोलाच्या पुढील भागावरील बुळबुळीत पातळ पटल) या ठिकाणी पुटिका उमटतात. या विकृतीला ‘नेत्र परिसर्प’ म्हणतात. पुटिकांत दुय्यम सुक्ष्मजंतुसंक्रामणामुळे पु होऊन स्वच्छमंडल अपारदर्शक होण्याचा संभव असतो.
आनन गुच्छिका विकारात एकाच बाजूच्या बाह्य कर्णद्वार, कानामागील गंडवर्धाचा (कानाच्या पाठीमागे असलेल्या शंखास्थीच्या निमुळत्या वाढीचा) भाग आणि त्याच बाजूच्या घशातील स्तंभावर पुटिका उमटतात. अलीकडील संशोधनानुसार या विकृतीचे मूळ आनन गुच्छिका नसून आनन तंत्रिकेच्या प्रेरक भागाच्या शोथात असल्याचे सिद्ध झाले आहे.
मेखला परिसर्प आणि सामान्य परिसर्प यांमधील प्रमुख फरक पुढील प्रमाणे आहेत.
मेखला परिसर्प |
सामान्य परिसर्प |
प्रत्यावर्ती नसतो. |
प्रत्यावर्ती असतो. |
शरीराच्या अर्ध्या भागातच होतो. |
दोन्ही बाजूंस होतो |
नेहमी तंत्रिका मार्गाने पसरतो |
कोठेही पसरतो |
प्रतिरक्षा कायम उत्पन्न होते |
प्रतिरक्षा उत्पन्न होत नाही |
वेदना अती तीव्र असतात |
वेदना सौम्य असतात |
मस्तिष्क-मेरुद्रवात लसिका- कोशिका-वृद्धी बहुतकरून आढळते |
मस्तिष्क-मेरुद्रव नेहमीप्रमाणे असतो |
मेखला परिसर्पावर कोणताही विशिष्ट गुणकारी इलाज उपलब्ध नाही. ऑरिओमायसीन (टेट्रासायक्लीन गट) दररोज १ ग्रॅ. चार मात्रांतून विभागून देतात. अँस्पिरीन, कोडीन इ. वेदनाशामके देतात. अतिवेदनाशीलता कमी करण्याकरिता त्वचाभागावर सिंकोकेन (न्युपरकेन) सारखे स्थानीय संवेदनाहारक असलेले मलम लावतात. अलीकडे मोठ्या मात्रेत अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) ब१२ जीवसत्त्व आणि तोंडाने कॉर्टिकोस्टेरॉइडे देणे उपयुक्त ठरले आहे. रोगनिदान नक्की होताच कॉर्टिकोस्टेरॉइडे अंतःक्षेपणानेही द्यावीत असे काही तज्ञांचे मत आहे. सुक्ष्मजंतुसंक्रामावर योग्य प्रतिजैव औषधे वापरतात. नेत्र परिसर्पावर नेत्रविशादराकडूनच इलाज करून घेणे इष्ट असते.
संदर्भ: 1. Scott, R. B., Ed. Price’s Textbook of the Practice of Medicine, London, 1973.
2. Vakil, R. J. Ed. Textbook of Medicine, Bombay, 1969.
ढमढेरे, वा. रा. भालेराव, य. त्र्यं.
“