परिविकासवाद: भ्रूणाचे परिवर्धन हे त्याच्या भागांची क्रमाक्रमाणे होणारी उत्पत्ती आणि इंद्रियीकरण होय असे प्रतिपादन करणाऱ्या सिद्धांताला परिविकासवाद म्हणतात. भ्रूणाची वाढ होते त्या वेळी त्याच्या रचनेत होणाऱ्या बदलांचा किंवा भ्रूणापासून निर्माण होणारा डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी आणि प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील असणारी अवस्था) किंवा प्रौढ प्राणी यांच्या शरीररचनेचा तुलनात्मक अभ्यास करून भ्रूणविज्ञानासंबंधी निर्माण होणाऱ्या शंका दूर होत नाहीत. भ्रूणाची वाढ आणि विकास कसा होतो, एका सूक्ष्म साध्या कोशिकारूपी (पेशीरूपी) अंडाणूपासून (स्त्री-जनन कोशिकेपासून) काही काळाने गुंतागुंतीची आणि उच्च शरीररचना असणारा प्राणी कसा तयार होतो इ. प्रश्न उभे राहतात.

भ्रूणविज्ञानाचा अभ्यास फार पुरातन कालापासून केलेला आढळतो परंतु यासंबंधीचे अनेक संशोधकांचे विचार काल्पनिक आहेत. ॲरिस्टॉटल या प्रसिद्ध ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी काही प्राण्यांच्या भ्रूणविकासाचा अभ्यास केल्याचे आढळते परंतु त्यांनी केलेले विवेचन तत्त्वज्ञानाच्या भूमिकेवर आधारित आहे. त्यांनी पदार्थ आणि आकार यांना भ्रूणविकासात फार महत्त्वाचे स्थान दिले आहे. त्यांच्या मते भ्रूणनिर्मितीला आवश्यक असणारा पदार्थ मातेकडूनच येतो. अंडाणूमध्ये असणारा हा पदार्थ भ्रूणाच्या पोषणासाठी आवश्यक असणारे अन्न पुरवितो. पित्याच्या रेतात असणाऱ्या असंख्य शुक्राणूंमध्ये (पुं-जनन कोशिकांमध्ये) भ्रूणाला आकार देणारी उत्पादक मूलतत्वे असतात. अंडाणु-शुक्राणु निषेचित (फलित) झाल्याशिवाय भ्रूणाची निर्मिती होत नाही, असे ॲरिस्टॉटल यांचे मत होते. जसजसा भ्रूण वाढत जातो तसतसे नवे अवयव भ्रूणावर निर्माण होऊ लागतात. जेव्हा प्राण्याचा जन्म होतो त्या वेळी हे सर्व अवयव पूर्णपणे वाढलेले असतात. विल्यम हार्वी या शास्त्रज्ञांनी १६५३ साली भ्रूणविकासाचा अभ्यास करून ॲरिस्टॉटल यांच्या निरीक्षणांना अनुमोदन दिले. 

सतराव्या व अठराव्या शतकांत सर्व शास्त्रीय जगतात खूप प्रगती झाली. प्राण्यांच्या भ्रूणविकासाचा बराच अभ्यास होऊन जे विचार मांडण्यात आले त्यांना ‘पूर्वनिर्माणवाद’ असे नाव दिले गेले. या विचारानुसार अंडाणूपासून ‘काही तरी’ निर्माण होते. हे ‘काही तरी’ आता दृश्य स्वरूपात असले, तरी अंडाणूत पूर्वीपासून अस्तित्वात असते. ते सूक्ष्म, पारदर्शक व घड्या पडलेल्या स्वरूपात असल्याने स्पष्ट दिसत नाही. जसजसा भ्रूण वाढतो तसतसे हे ‘काही तरी’ निरनिराळ्या अवयवांच्या रूपाने सरळ होऊन, ताणले जाऊन व घट्ट होऊन दिसू लागते. हे ‘काही तरी’ म्हणजे नंतर निर्माण होणाऱ्या प्राण्याची लघुप्रतिकृतीच असून ती अंडाणूत पूर्वनिर्मित स्वरूपात हजर असते, असे मानले गेले. या समजालाच ‘पूर्वनिर्माणवाद’ असे म्हणतात.

भ्रूणनिर्मितीसाठी अंडाणू आणि शुक्राणू या दोघांची गरज आहे याची शास्त्रज्ञांना जाणीव होती. शुक्राणू आणि अंडाणू या दोहोंतही एकाच प्राण्याची लघुप्रतिकृती असणे शक्य नाही. ही लघुप्रतिकृती अंडाणूत असते का शुक्राणूत असते, या प्रश्नावर बराच वाद होऊन अंडाणुवादी आणि शुक्राणुवादी असे दोन गट पडले. अंडाणुवाद्यांचे म्हणणे असे पडले की, अंडाणूत लघुप्रतिकृत असते शुक्राणू हे रेतामध्ये परजीवी (दुसऱ्या जीवावर जगणाऱ्या) प्राण्यासारखे असतात आणि भ्रूणनिर्मितीला ते अनावश्यक असतात. शुक्राणुवाद्यांच्या मते शुक्राणूत लघुप्रतिकृती असते आणि अंडाणूत आढळणारा पदार्थ या लघुप्रतिकृतीच्या वाढीसाठी आवश्यक ते अन्न पुरवितो. १७४५ साली सी. बॉने या शास्त्रज्ञांना मावा या कीटकाची प्रजा अनिषेचित अंडाणूपासूनही निर्माण होते असे आढळून आले म्हणजेच प्रजोत्पादनाला शुक्राणूची गरज नसते. या महत्त्वपूर्ण संशोधनामुळे अंडाणुवाद्यांचे पारडे जड झाले आणि काही काळ ‘पूर्वनिर्माणवाद’ मान्य झाला.

के. एफ्. व्होल्फ यांनी १७५९ साली कोंबडीच्या भ्रूणाची वाढ कशी होते यावर बरेच संशोधन केले. त्यांनी केलेल्या निरीक्षणावरून जे विचार जगापुढे मांडले त्यांना ‘परिविकासवाद’ असे म्हणतात. व्होल्फ यांना असे आढळले की, भ्रूणाच्या अतिपूर्व अवस्थेत त्याच्या कोणत्याही भागावर प्रौढावसस्थेत निर्माण होणाऱ्या अवयवांची चिन्हे दिसत नाहीत परंतु भ्रूण जसजसा दिवसेंदिवस वाढू लागतो तसतसे हे अवयव भ्रूणावर निर्माण झाल्याचे दिसून येते. भ्रूण हा अनेक सूक्ष्म कोशिकांचा बनलेला असतो. या कोशिका विशेष प्रकारच्या थरामध्ये मांडल्या जाऊन जननस्तर निर्माण होतात. या जननस्तरातील काही भाग जाड होतो, काही लांबट होतो, तर काही दुमडला जातो. या आकार बदललेल्या जननस्तरांच्या निरनिराळ्या भागांपासून प्राण्याचे निरनिराळे अवयव निर्माण होतात. जननस्तरात होणाऱ्या या अनेक बदलांना प्रभेदन असे म्हणतात. वरील निरीक्षणावरून व्होल्फ यांनी असे अनुमान काढले की, घर बांधण्यासाठी आणलेल्या विटा म्हणजे घर नव्हे. तसेच अंडाणूत निर्माण होणाऱ्या असंख्य कोशिका म्हणजे भ्रूण नाही. गवंडी ज्याप्रमाणे आपले कौशल्य व मनातील हेतू लक्षात ठेवून विटांचे घर बांधतो तसेच भ्रूणवाढीसाठी आवश्यक असणारा कारागीर म्हणजे जीवनशक्ती होय. ही शक्ती आपल्या प्रभावाने अंडाणूतील असंख्य कोशिकांची योग्य ठिकाणी योजना करून भ्रूण निर्माण करते, त्याची वाढ करते व त्यावर अवयव उत्पन्न करते.

एच्. ए. ई. ड्रीश यांनी सागरी अर्चिनाच्या भ्रूणावाढीचा अभ्यास केला परंतु त्यांचे विचार अनिश्चित होते. त्याउलट सी.एम्. चाइल्ड यांनी मांडलेले विचार व्होल्फ यांच्या विचारांना पाठिंबा देणारे होते. त्यांच्या मते भ्रूणावर बाह्य परिस्थितीचे व आंतरिक परिस्थितीचे परिणाम होऊन त्यावर अवयवांचे रूपांतरण अवलंबून असते. परिविकासवाद्यांनी पूर्वनिर्माणवाद्यांना विरोध करण्याचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे जर अंडाणूमध्ये प्रौढ प्राण्याची लघुप्रतिकृती असते, तर या लघुप्रतिकृतीतही पुढील पिढी निर्माण करणारे अंडाणू असतील. या अंडाणूतही प्रौढ प्राण्याच्या लघुप्रतिकृती असतील. अशा प्रकारे पुढील असंख्य पिढ्यांच्या लघुप्रतिकृती एकात एक अशा सामावलेल्या असतील. हे विचार विश्वास ठेवण्यालायक नाहीत, असे परिविकासवाद्यांचे म्हणणे पडले.

एकोणिसाव्या व विसाव्या शतकांत भ्रूणविज्ञानात खूप संशोधन झाले. या संशोधनामुळे असे सिद्ध झाले की, प्रभेदनामुळे भ्रूणविकास होतो व त्यामुळे परिविकासवादाला बळकटी आली. या संशोधनात असे सिद्ध झाले की, भ्रूणाची वाढ प्रभेदनामुळे होत असली, तरी जनुकांच्या [⟶ जीन] क्रियाशीलतेमुळे आनुवांशिक गुण पुढील पिढीत उतरतात.

पहा : आनुवंशिकी भ्रूणविज्ञान.

रानडे, द. र.