परांजपे, रघुनाथ पुरुषोत्तम : ( १६ फेब्रु. १८७६– ६ मे १९६६). उदारमतवादी समाजसुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षणतज्ञ. जन्म मुर्डी (जि. रत्नागिरी) येथे. वडील पुरुषोत्तम केशव परांजपे (परांजप्ये) धार्मिक वृत्तीचे होते. आई गोपिकाबाई ह्या टिळक कुटुंबातील होत्या. परांजप्यांचे प्राथमिक शिक्षण अंजर्ला, मुर्डी व दापोली येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईस त्यांचे आतेभाऊ (महर्षी) धोंडो केशव कर्वे यांच्याकडे राहिले. १८९१ मध्ये मराठा हायस्कूलमधून मॅट्रिक परीक्षेत ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. १८९२ साली धोंडो केशव कर्व्यांची पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाल्यावर परांजपे त्यांच्याबरोबर पुण्यास आले. १८९६ मध्ये ते पहिल्या वर्गात बी. एस्सी. उत्तीर्ण झाले. पुढे भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळवून ते केंब्रिज विद्यापीठात दाखल झाले. तेथील मॅथेमॅटिकल ट्रायपॉस परीक्षेत जॉर्ज बर्थव्हिसल यांच्याबरोबर सर्वप्रथम येऊन त्यांनी ‘सीनियर रँग्लर’ हा बहुमान संपादन केला. त्यामुळे पाश्चात्त्यांमध्ये बौद्धिक श्रेष्ठत्वाच्या कल्पनेला पहिला धक्का बसला व पौर्वात्यांच्या बौद्धिक कार्यक्षमतेवर जगातील प्रगत राष्ट्रांतही विश्वास उत्पन्न झाला. १९०१ साली ते भारतात परतले आणि आय. सी. एस्. चा (इंडियन सिव्हिल सर्व्हिसचा) मोह टाळून त्यांनी गरिबी जीवनाचा स्वीकार केला. ते फर्ग्युसन कॉलेजात प्राचार्य व गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले (१९०२–२४). १८९९ ते १९०१ च्या दरम्यान पॅरिस व गटिंगेन विद्यापीठांत त्यांनी उच्च अध्ययन पूर्ण केले.
प्राचार्यपदावरील प्रदीर्घ काळात परांजप्यांनी फर्ग्युसन कॉलेजला राष्ट्रीय दर्जा प्राप्त करून दिला. तत्कालीन राजकीय, सामाजिक चळवळीतही त्यांनी भाग घेतला. ते स्वतःला बुद्धिवादी म्हणवून घेत. धार्मिक कर्मकांड, ईश्वर, परलोक, पुनर्जन्म इ. गोष्टींवर त्यांचा विश्वास नव्हता. ते पक्के इहवादी व समाजसुधारणेचे कडवे पुरस्कर्ते होते. नॅशनल लिबरल फेडरेशनच्या उभारणीत त्यांचा वाटा मोठा होता. न्यायमूर्ती रानडे व गोपाळ कृष्ण गोखले यांच्या नेमस्त राजकारणाचा त्यांनी पुरस्कार केला. प्रसंगविशेषी त्यांनी लो. टिळकांच्या जहाल मतप्रणालीस विरोधही केला. उदारमतवादी नेमस्त पुढारी व बुद्धिवादी समाजसुधारक म्हणून त्यांची खाती होती.
त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले : मुंबई प्रांताचे शिक्षणमंत्री (१९२१–२३), अबकारी खात्याचे मंत्री (१९२७), इंडियन कौन्सिलचे सभासद (१९२७–३२), लखनौ व पुणे विद्यापीठांचे कुलगुरू (अनुक्रमे १९३२–३८ व १९५६–५९) व ऑस्ट्रेलियातील भारताचे हाय कमिशनर (१९४४–४७) यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर त्यांनी यशस्वीपणे काम केले. पुणे नगरपालिकेचे ते काही काळ सदस्य होते. अनेक सरकारी समित्यांवर त्यांनी काम केले. ब्रिटिश सरकारने कैसर-इ-हिंद सुवर्णपदक (१९१६) व नाइटहूड (१९४२) देऊन त्यांचा गौरव केला.
परांजप्यांचा पहिला विवाह १८९२ साली भावे कुटुंबातील द्वारका यांच्याशी झाला. त्या १९०० साली मरण पावल्या. पाच वर्षांनी त्यांनी सीताबाई जोशी यांच्याशी विवाह केला. सीताबाई १९३१ साली इंग्लंडमध्ये निधन पावल्या.
परांजप्यांचा निवडक लेखन–भाषणांचा संग्रह बी. एम्. गोरे यांनी संपादित केला आहे. एटीफोर नॉट आउट [मराठी अनुवाद नाबाद ८९ (१९६५)] हे त्यांचे छोटेसे इंग्रजी आत्मचरित्र नॅशनल बुक ट्रस्टतर्फे १९६१ साली प्रसिद्ध झाले. यांशिवाय द क्रक्स ऑफ द इंडियन प्रॉब्लेम हे त्यांचे पुस्तक उल्लेखनीय आहे. त्यांनी केलेले स्फुट लेखनही विपुल आहे. परांजप्यांचे बहुतेक सर्व लेखन इंग्रजीतच आहे. पुणे येथे त्यांचे निधन झाले.
जाधव, रा. ग. मिसार, म. व्यं.