परवस्तु चिन्नय्य सूरि : (१८०६ – १८६२). तेलुगू व्याकरणकार, कोशकार व लेखक. त्यांचा जन्म चिंगलपुट जिल्ह्यात पेरंबुदूर येथे झाला. अनेक वर्षे मद्रास येथेच ते होते. तेलुगू, संस्कृत, तमिळ आणि प्राकृत भाषांचे त्यांनी सखोल अध्ययन केले. अलंकारशास्त्र, मीमांसा आणि संगीत यांचाही अभ्यास त्यांनी केला. बदलत्या कालमानानुसार त्यांनी इंग्रजीवरही प्रभुत्व मिळविले. पुढे त्यांनी मद्रासच्या पच्चयप्पा आणि प्रेसिडेन्सी या महाविद्यालयांत तेलुगूचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांच्या वरिष्ठांनी सुवर्णकंकण देऊन त्यांच्या विद्वत्तेचा गौरव केला.
बालव्याकरण, नीतिचंद्रिका, सूत्रांध्रव्याकरण, आंध्र धातुमाला, चिंतामणिवृत्ति, पद्यांध्रव्याकरण, शब्दलक्षणसंग्रह, विभक्तिबोधिनी, आदिपर्ववचनमु, आंध्रकौमुदी, आंध्र कादंबरी आणि यादवाभ्यूदयमु हे ग्रंथ त्यांनी लिहिले. सुजन-रंजनी या मासिकाचेही ते काही वर्षे संपादक होते. ‘वाणी-दर्पण’ नावाचे मुद्रणालयही त्यांनी सुरू केले.
याप्रमाणे अनेक साहित्यसंवर्धक उपक्रमांचा त्यांनी पाया घातला. तेलुगूमध्ये चिन्नय्यपूर्व कालखंडात काही गद्यवाङ्मय निर्माण झाले होते पण त्याला सौष्ठव आणि प्रमाणभूत स्वरूप प्राप्त झाले नव्हते. त्यामुळेच आधुनिक गद्यशैलीचे जनकत्व त्यांच्याकडे दिले जाते.
त्यांचे विशेष महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे नीतिचंद्रिका (१८५३) आणि बालव्याकरण (१८५५) हे होत. बालव्याकरण हे विषयचर्चेच्या दृष्टीने प्रौढच आहे. तेलुगू भाषेचे प्रमाणभूत व्याकरण म्हणून त्यांच्या ह्या ग्रंथास मान्यता लाभली. त्याच्या गुणवत्तेमुळे चिन्नय्यांना ‘आंध्रपाणिनी’ ही पदवी मिळाली. नीतिचंद्रिका हा त्यांचा नावाजलेला गद्यग्रंथ पंचतंत्रावर आधारलेला आहे. त्याची दोनच प्रकरणे त्यांनी लिहिली. नीतिचंद्रिका लयबद्ध अशा गद्यात असून अलंकृत मधुर भाषाशैलीचा त्यात उत्कृष्ट आविष्कार आढळतो. हा त्यांचा लहानसा ग्रंथ असला, तरी तो गुणदृष्ट्या श्रेष्ठ प्रतीचा आहे. त्यातील उतारे आंध्र प्रदेशातील माध्यमिक शाळांच्या पाठ्यपुस्तकांत घेतले जातात. त्यातील कथा विस्तृत असून, भाषा नावीन्यपूर्ण, प्रगल्भ आणि अलंकारप्रचुर आहे. त्यांनी एका शब्दकोशरचनेचे कामही आरंभिले होते तथापि त्यांच्या अचानक निधनाने ते अपूर्णच राहिले.
त्यांचे शिष्य बहुजनपल्ली सीतारामाचार्य यांनी शब्दरत्नाकर (१८८५) या मोठ्या ग्रंथाची रचना केली. नीतिचंद्रिकेच्या धर्तीवर सी. पी. ब्राउनने आपल्या ताताचार्युला कथा लिहिल्या. त्यांच्या गद्यशैलीचा नंतरच्या अनेक लेखकांवर प्रदीर्घकाल प्रभाव पडत राहिला.
टिळक, व्यं. द.